बायकोला मारुन १५ वर्ष पोलिसांना घुमवत होता, पण आईला केलेल्या एका फोनमुळं घावला

१४ फेब्रुवारी २००३, व्हॅलेंटाईन डेचा दिवस. अनेकांचं प्रेम फुलायचं दिवस. अहमदाबादमध्ये अशीच एक प्रेम करणाऱ्यांची जोडी राहत होती, तरुण जिनराज आणि त्याची बायको सजनी जिनराज. तरुण बास्केटबॉल कोच होता आणि बायको सजनी बँक कर्मचारी होती. त्यांच्या लग्नाला फक्त तीन महिने झाले होते. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तरुणनं अचानक सजनीच्या घरच्यांना फोन केला आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचायला सांगितलं.
तिथं पोहोचल्यावर त्यांना समजलं की, तरुण-सजनीच्या घरावर चोरांनी दरोडा टाकला आणि सजनीवर हल्ला केला. तिला हॉस्पिटलमध्ये आणण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
आपल्या बायकोच्या मृत्यूमुळं तरुण इतका रडायला लागला की, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं, त्याची हालत इतकी नाजूक होती की आपल्या बायकोचे अंतिम संस्कार करायलाही त्याला जमलं नाही. त्याच्या मोठ्या भावानं ही जबाबदारी पार पाडली.
गुन्हा गंभीर होता, त्यामुळं पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली. अवघ्या दोन दिवसात त्यांना एक फोन आला, तो होता तरुणच्या मोठ्या भावाचा, त्यानं सांगितलं की तरुण हॉस्पिटलमधून गायब झालाय.
बायकोचा संशयास्पद मृत्यू, लगेचच आलेलं आजारपण आणि मग हॉस्पिटलमधून पसार, यामुळं पोलिसांचा संशय तरुणवरच बळावला.
तपासाची सूत्र झटपट हलली, अनेक ठिकाणी नाकाबंदी झाली. पोलिसांनी इतर राज्यातले कॉन्टॅक्ट वापरले, खबऱ्यांचं जाळंही पसरलं मात्र हाती काहीच आलं नाही. या सगळ्याला ३ वर्ष लोटली. २००६ मध्ये सजनीच्या कुटुंबीयांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. सोबतच तरुणच्या कुटुंबीयांविरुद्ध हुंडा मागितल्याची तक्रारही दाखल केली.
या संशयातून मूळचे केरळचे असलेले तरुणचे आई-वडील आणि भावाला अटक झाली, मात्र चौकशीतून काहीच निष्पन्न झालं नाही. पोलिसांना कळून चुकलं होतं की आरोपी तरुणच असणार. याला पुष्टी देणारी आणखी एक गोष्ट पोलिसांच्या तपासात समोर आली.
तरुणचं लग्नाआधीचं अफेअर…
तरुण कॉलेजमध्ये असताना त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते, दोघांना लग्नही करायचं होतं. मात्र ते शक्य झालं नाही, सजनीच्या मृत्यूच्या दोनच दिवसानंतर तरुणनं या मुलीशी संपर्क केला आणि लग्नाबद्दल विचारलं. मात्र मीडियामुळं तिच्यापर्यंत सजनीच्या मृत्यूची बातमी पोहोचली होती. त्यामुळं तिनं लग्नाला नकार दिला. तरुणचा ठावठिकाणा मात्र तिला माहिती नव्हता.
पोलिसांना आणखी एक गोष्ट समजली की, तरुण छोट्या छोट्या गोष्टींवरुन सजनीला त्रास द्यायचा. त्याचं आधीचं प्रेम हेच सजनीवरच्या रागाचं कारण होतं. सोबतच हे सुद्धा समजलं की, बास्केटबॉल खेळताना त्याच्या हाताचं एक बोट तुटलं होतं. संशय अगदी पक्का असला, तरी पोलिसांना तरुण काही सापडत नव्हता. अखेर पोलिसांकडून ही केस बंद करण्यात आली.
आता सुरू होतो दुसरा पार्ट, २०१८ मध्ये…
देशाचं आयटी हब अशी ओळख असणाऱ्या बंगळुरूमधल्या ओरॅकल कंपनीमधला सिन. साध्या वेशातले पोलिस तिथं पोहोचले. तिथल्या कर्मचाऱ्यांच्या लिस्टमध्ये त्यांनी तरुणचं नाव चेक केलं पण अशा नावाचा कोणताही माणूस तिथं कामाला नव्हता. पण एका नावानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं, ते नाव म्हणजे प्रवीण भटेले.
ते प्रवीणला भेटले, त्याच्याशी शेकहँड केलं आणि त्याचवेळी त्याचं एक बोट गंडलेलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हा माणूस प्रवीण नसून तरुण जिनराज होता, यावर पोलिसांनी शिक्कामोर्तब केलं. स्वतः तरुणकडून पण याची खात्री पटली आणि १५ वर्षांनंतर सजनीचा खुनी पोलिसांना सापडला.
सीआयडीमध्ये ज्याप्रकारे पोलिस सापळा रचून एखाद्या आरोपीला पकडायचे, त्याची खरी ओळख उघड करायचे अगदी तसाच सीन तरुणच्या बाबतीत घडला होता.
पण प्रश्न हा होता की, १५ वर्षानंतर तरुण पोलिसांना सापडला कसा ? तो प्रवीण भटेले हेच नाव घेऊन का आणि कसा जगत होता ?
सजनीच्या खुनानंतर तरुण पसार झाला. साधारण एप्रिल-मे मध्ये त्यानं भोपाळ गाठलं. तिथं त्याचे कॉलेजमधले मित्र राहायचे. ज्यांची नावं होती, प्रवीण भटेले आणि त्याची बायको बिट्टू शर्मा. प्रवीण आणि बिट्टू तरुणसोबत ग्वालियरच्या फिजिकल एज्युकेशन कॉलेजमध्ये शिकायला होते. त्यानं या ओळखीचा फायदा घेतला आणि त्यांच्याकडे कामाची मागणी केली. प्रवीणनं नुकतंच एक कोचिंग सेंटर सुरू केलं होतं, तिथं तरुणला स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेण्याची संधी दिली. मात्र लवकरच हे कोचिंग सेंटर बंद पडलं आणि तरुणचा जॉब गेला.
इथून निघताना त्यानं प्रवीणचं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट स्कॅन करुन घेतले. तो दिल्लीला पोहोचला, तिथं ओळख बदलून कॉल सेंटरमध्ये जॉबही मिळवला. तिथून तो आला पुण्याला. पुण्यात त्यानं काही काळ काम केलं आणि इथंच त्याला भेटली निशा मेनन.
त्यानं निशाला आपण अनाथ असल्याचं सांगितलं आणि दोघांचं सूत जुळलं. पुढं जाऊन त्यांनी लग्नही केलं. हे जोडपं बंगळुरूला शिफ्ट झालं, तिथं तरुणला २२ लाख वर्षाला मिळेल असं पॅकेज मिळालं. एकदम निवांत आयुष्य सुरू होतं.
मग तरुण पोलिसांना सापडला कसा..?
२०११ मध्ये केस पुन्हा ओपन केल्यानंतर पोलिसांनी वेगानं चक्र हलवली, पण तरीही हाती काय लागेना. एक गोष्ट समजली ती म्हणजे तरुण २००९ मध्ये केरळला आपल्या आई-वडिलांना भेटला आणि त्यानंतर लगेचच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. याचा अर्थ तरुण भारतातच होता.
त्यात तरुणची लग्नाआधीची गर्लफ्रेंड म्हणून जिचं नाव पुढं आलेलं, तिनं पोलिसांना सांगितलं की २०१६ मध्ये तिच्या ओळखीतल्या कुणीतरी तरुणला दिल्लीत पाहिलं. आता शोधायचं कसं म्हणून पोलिसांनी तरुणच्या नातेवाईकांचे फोन कॉल्स तपासले, पण ४००० फोन कॉलमधून काहीच मिळालं नाही.
मग पोलिसांच्या लक्षात आलं की, बाकी कुणाला नाही पण तरुण आईला फोन करत असणारच.
मग फक्त त्याच्या आईचे फोन कॉल चेक केले जाऊ लागले, बाकी सगळं नॉर्मल वाटत होतं, पण एकदा एक फोन बंगळुरुच्या ओरॅकल कॉल सेंटरच्या लँडलाईनवरुन आला होता. झालं असं होतं की, तरुणची आई आजारी होती त्यामुळं त्यानं काळजीपोटी ऑफिसच्या फोनवरुन फोन केला. हाच फोन पोलिसांनी ट्रॅक केला आणि तरुण सापडला.
पोलीस जेव्हा तपास करायला आले तेव्हा, कर्मचाऱ्यांच्या यादीत प्रवीण भटेले हे नाव सापडलं आणि तरुणच्या आईच्या कॉल लिस्टमध्ये निशा प्रवीण भटेले हे नाव होतं पोलिसांनी लिंक जोडली आणि प्रवीणच्या हाताचं तुटलेलं बोट तपासत त्यांनी १५ वर्ष घुमवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
आधीचं प्रेम प्रकरण, सजनीवरचा राग यातून त्यानं निष्पाप बायकोची हत्या केली, पण एवढं करुन त्याला ना प्रेम मिळालं ना शांती. पळून जाताना तरुणनं सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या होत्या, पण आईच्या काळजीपोटी केलेला एक फोन त्याला चांगलाच महागात पडला.
हे ही वाच भिडू:
- कर्नाटकचा सिरीअल किलर महिलांवर बलात्कार करुन खून करायचा, तेही त्यांच्या अंतर्वस्त्रांसाठी
- दंडुपाल्या गॅंग : दक्षिण भारताच्या आजवरच्या इतिहासात ही टोळी सर्वात क्रुर समजली गेली..
- ‘दुपट्टा किलर’च्या भीतीमुळं गोव्यातल्या पोरी ओळखीच्या लोकांशी बोलायलाही घाबरायच्या…