भूकंपामुळे जपानमध्ये क्रांती झाली आणि त्यातूनच टोयोटा कारचा उदय झाला….

१ डिसेंबर १९२३ चं साल होतं. जपान एरवी तसं काही ना काही घडतं म्हणून प्रसिद्ध होतं, पण त्या दिवशी जपानमध्ये इतका भयंकर भूकंप झाला की मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. लोकांची जीव वाचवायला सुरक्षित स्थळी जायला पळापळ सुरू झाली. या भूकंपाने सगळं जनजीवन विस्कळीत करून टाकलं. आता या भूकंपात काहीही झालं तरी आपला जीव महत्वाचा अशी लोकांची मानसिकता झाली आणि लोकं तिथल्या उरल्यासुरल्या कार मध्ये जाऊन जीव जपू लागली.

जेव्हा भूकंपाच्या घटनेतून जपान सावरू लागलं तेव्हा मात्र अनेक लोकांनी कारमुळे जीव वाचला या धोरणातून कार खरेदी करण्याचा सपाटा लावला. या अचानक आलेल्या भूकंपाने जपानमध्ये वाहन उद्योगात मोठी क्रांती आणली आणि वाहन व्यवसाय या घटनेमुळे तेजीत आला. हीच घटना होती ज्यातून उदय झाला टोयोटा कारचा. चारचाकी वाहन अर्थात कारच्या निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अग्रगण्य कंपन्यांमध्ये टोयोटाचा समावेश आवर्जून करावा लागतो. आजघडीला ही कंपनी जगात सगळ्यात जास्त कार विकते. टोयोटा कंपनीने वाहन विक्रीतील आपला अव्वल क्रमांक टिकवून ठेवला. तर याच यादीत दुसऱ्या क्रमांकावर जर्मनीची Volkswagen कंपनी आहे.

प्रदीप ठाकूर यांनी टोयोटा कंपनीच्या या अविस्मरणीय प्रवासावर एक पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी टोयोटाच्या निर्मितीपासून ते बाजारपेठेतील टॉपची कंपनी असा सगळा प्रवास मांडलेला आहे. 1933 टोयोटाचे संस्थापक किइचिरो यांनी एक हातमाग यंत्र तयार केलं होतं, पण त्यांचा मुख्य ओढा हा कारकडे होता. त्यांना कार बनवायची होती आणि तेच त्यांचं स्वप्न होतं. याच ध्यासातून त्यांनी प्रोटोटाईप मॉडेल AA1932 तयार केले. त्यांनी सुरुवातीच्या काळात कार असेब्लिंगचे काम केले. त्यानंतर त्यांनी 1936 मध्ये टोयोटा कंपनीची मुहूर्तमेढ रोवली.

दुसऱ्या महायुद्धात टोयोटाची गाडी घसरली, सुरुवातीच्या काळात टोयोटा कंपनीने लष्करी ट्रक तयार करण्याचे काम हाती घेतले होते. 1945 साली दुसरे महायुद्ध झाले तेव्हा जपान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. नुकसान इतकं झालं की वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. त्याच काळात टोयोटा कंपनी दिवाळखोरीत निघाली होती.

मात्र, किइचिरो यांनी बँकांशी बोलणी करुन टोयोटा कंपनी कशीबशी वाचवली. मात्र, बँकेने लादलेल्या अटींमुळे कंपनीला अनेक निर्बंध लागू करावे लागले. त्यामुळे टोयोटाच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष उत्पन्न झाला आणि त्यांनी संप पुकारला. अखेर दोन महिन्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. त्यावेळी आइची यांनी टोयोटा मोटर्सची सूत्रे हाती घेतली.

आइची यांनी टोयोटा कंपनीला रुळावर आणण्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले. त्याच काळात जगाच्या काही भागांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाले होते आणि युद्धाची चिन्हे दिसू लागली होती. त्यामुळे अमेरिकेसह अन्य देशांकडून लष्करी ट्रक्ससाठीची मागणी वाढली. या घटनेने टोयोटा भरपूर नफा कमवू लागली आणि यातूनच टोयोटाचं शोरूम उभं राहिलं.

1951 साली टोयोटानं पहिल्यांदा लँड क्रुझर या जगप्रसिद्ध गाडीचे मॉडेल लाँच केले. तोपर्यंत टोयोटा कंपनीने महिन्याला 500 गाड्यांचे उत्पादन सुरु केले होते. या काळात किइचिरो यांनी वाहनांची गुणवत्ता आणि उत्पादन खर्च कमी ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे नंतरच्या काळात टोयोटा ही कंपनी नावारुपाला आली आणि कंपनीच्या गाड्यांचा खप वाढतच गेला. 1963 साली टोयोटा ब्रँड बनण्याकडे वाटचाल सुरू झाली, 1991 पर्यंत अमेरिकेत टोयोटाने एक लाख गाड्या विकल्या होत्या. याच काळात टोयाटाने लॅटिन अमेरिका आणि दक्षिण पूर्व आशियातही आपला व्यवसाय सुरु केला.

तोपर्यंत टोयोटा केवळ सगळ्यांना परवडणारी आणि किफायतशीर गाडी म्हणून ओळखली जायची. मात्र, त्यानंतर टोयोटाने लक्झरी कार्सच्या उत्पादनाला सुरुवात केली. 2000 साली टोयोटाने अनेक विदेशी कंपन्यांशी करार करून आपला नफा प्रचंड वाढवला. तर 2017 साली टोयोटाने रोबोट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या साहाय्याने कारनिर्मितीला प्रारंभ केला.

आज घडीला टेस्लानंतरची सगळ्यात मोठी कंपनी म्हणून टोयोटाला ओळखलं जातं. कार निर्मिती आणि बाजारपेठेत व्यवस्थित विक्री,ग्राहकांचं समाधान यावर टोयोटा अनेक वर्षांपासून टॉप गियरमध्ये पळते आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.