अंगावर बेतलं होतं तरिही, मंडल आयोगाच्या विरोधात बोलायला त्यांनी नकार दिला होता..

“आता अशी वेळ येऊन ठेपली आहे की, एका मोठ्या कारणासाठी मला पक्षातून बाहेर पडून विरोधी एकजुटीसाठी काम करावे लागेल”

मंगळवारी असं ट्विट करत साधारण दीड वर्षापूर्वी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या यशवंत सिन्हांनी एका मोठ्या जबाबदारीसाठी पक्षातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.

आणि लगोलग बातमी येऊन धडकली की, विरोधी पक्षाकडून राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांचे नाव जाहीर..

दिल्लीत शरद पवार यांच्या घरी विरोधकांच्या झालेल्या बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या नावाला विरोधी पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून एकमताने मंजुरी देण्यात आली.

कोण आहेत सिन्हा? त्यांच्या बद्दल थोडक्यात पाहू.. 

यशवंत सिन्हा मूळचे बिहार मधल्या पाटण्याचे. 1958 साली त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले. सैन्यात जाऊन देशसेवा करावी असं त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी एकदा ते सैन्य भरतीसाठी जाऊन आले आणि त्यांची सैन्यात निवड देखील झाली होती. परंतु त्यांच्या आई वडिलांना त्यांचा हा निर्णय विशेष आवडला नाही. त्यांनी आयएएस व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मग त्यांनी सैन्यभरतीचा विचार सोडून आयएएस ची तयारी केली. 

आणि 1960 साली ते आयएएस झाले. त्यानंतर त्यांनी जवळपास 25 वर्षे भारतीय प्रशासकीय सेवेत नोकरी केली. 

त्यांनी बिहार सरकारच्या वित्त मंत्रालयात सचिव आणि उपसचिव म्हणून काम पाहिलं. नंतर त्यांची भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात उपसचिव पदावर नियुक्ती झाली. 1971 ते 1974 या काळात त्यांनी जर्मनीतील भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव म्हणून काम पाहिलं.

सिन्हा यांच्या राजकीय प्रवासाबद्दल थोडं जाणून घेऊ.. 

यशवंत सिन्हा यांनी 25 वर्षे प्रशासकीय सेवेत काम केल्या नंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांना पहिल्या पासून समाजसेवा करण्याची मोठी  इच्छा होती. राजकारणाबद्दल त्यांना विशेष आवड नव्हती. ते म्हणतात,

‘मी अगदी अपघाताने राजकरणात आलो’.

जेव्हा माजी पंतप्रधान चन्द्रशेखर यांच्याशी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाने सिन्हा प्रभावित झाले. आणि त्यांनी राजकरणात जाण्याचा निर्णय घेतला. 1986 साली ते पाहिल्यांदा राजकरणात आले त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 2 वर्षांनी ते राज्यसभेवर निवडून गेले.

1990 -91 मध्ये त्यांनी चन्द्रशेखर यांच्या पक्षात अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी 4 वर्षे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले.

काही कारणास्तव पुढे 2018 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन 2019 साली त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 

यशवंत सिन्हा यांनी त्यांच्या एकूण सगळ्या कारकिर्दीत प्रशासकीय, राजकीय आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रात बहुमूल्य काम केले, हे काम करत असताना त्यांना विविध प्रकारचे अनुभव आले.

असाच एक अनुभव त्यांनी एका चॅनेलला मुलाखत देताना सांगितला होता. त्यांच्यासाठी हा एक जीवघेणा अनुभव होता. 

नक्की काय होता हा अनुभव सविस्तर पाहूया..

झालं असं होतं की 1990 मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंग यांनी मंडल आयोगाचा आधार घेऊन इतर मागासवर्गीयांसाठी केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये 27% आरक्षण जाहीर केलं होतं. परिणामी देशभरात आरक्षण समर्थक आणि आरक्षण विरोधक असे दोन गट पडले.

त्यावेळी दिल्ली विश्वविद्यालयातल्या एका विद्यार्थी गटाने यशवंत सिन्हांना मॉरिस नगर चौक येथे एक दिवशी एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं.

तो काळ मंडल कमिशनचा असल्याने त्यावेळी दिल्ली मध्ये आरक्षणाच्या मुद्द्या वरुन खूप सारी आंदोलनं होत असत.

सिन्हा सांगतात की,

“मी मंडल कमिशनच्या विरोधात कधीही नव्हतो. राजकीय दृष्टया नाही तर सामजिक दृष्ट्या आरक्षण लागू व्हावं अशा मताचा मी होतो”. 

मग ठरल्या दिवशी, ठरल्या वेळेला यशवंत सिन्हा दिल्लीच्या मॉरिस नगर चौकात पोहचले. पण ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना तिथे बोलावलं होतं तेच तिथून गायब होते. तिथे आरक्षण विरोधी आंदोलन चालू होतं. विद्यार्थी जोशात येऊन जोर जोरात आरक्षण विरोधी घोषणा देत होते.

जसे यशवंत सिन्हा गाडीतून बाहेर पडले तसे तिथल्या घोषणा देणार्‍र्‍या जमावातल्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना ओळखलं. त्या दिवसात ते आरक्षणाच्या बाजूने बोलायचे त्यामुळे सारखे टीव्ही, वृत्तपत्रातून दिसत असायचे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी त्यांना लगेच ओळखले. आणि काही विद्यार्थ्यांच्या घोळक्याने त्यांना घेरलं आणि तुम्ही इथे का आला आहात? अशी विचारपूस करू लागले.

यशवंत सिन्हांनी त्यांना शांतपणे सांगितलं की मला इथे बोलावलं गेलं होतं म्हणून मि आलोय. मुलं त्यांच्याशी वाद घालू लागली, तुम्ही इथे यायला नको होतं, तुम्ही का आलात? असं म्हणून ते यशवंत यांना धक्का देऊ लागले.

अचानक त्यांच्या अंगावर काही विद्यार्थ्यानी शाई फेकली, त्यांचा पांढरा कुर्ता शाईने अक्षरष: काळा झाला. विद्यार्थ्यांनी सिन्हांना चारही बाजूने घेरलं होतं आणि ती मुलं यशवंत सिन्हांना धक्का देत देत कुठे तरी घेऊन जात होती.

काही वेळाने तिथे काही प्रोफेसर्स आले आणि त्यांनी मुलांना थोडसं हटकलं, त्यानंतर काही मुलं बाजूला पांगली. पण एका गटाने त्यांना रस्त्याच्या थोडसं बाजूला घेऊन गेले. आणि त्यांना जबरदस्तीने असं म्हणायला लावलं की,

“मी राज्यसभेचा राजीनामा दिलाय.. मी जनता पार्टीचा राजीनामा दिलाय..”

आम्ही सांगतोय तसं जेव्हा म्हणाल तेव्हाच आम्ही तुम्हाला इथून जाऊ देऊ, अन्यथा आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. परिस्थिति खूपच ताणली गेली होती. वातावरण एकदम तापलेलं..कुठल्याही क्षणी जमाव त्यांना घेरून त्यांच्या सोबत काय करेल हे सांगता येत नव्हतं. पोरांची माथी भडकली होती. ते म्हणतात ना “जमावाला ना चेहरा असतो.. ना भावना..”

अशी अत्यंत अवघड परिस्थिती असताना सुद्धा यशवंत सिन्हा यांनी त्या झुंडीच्या धमकीला न घाबरता त्या मुलांच्या डोळ्यात डोळे घालून या दोन्हीही गोष्टी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले मि असं काहीही बोलणार नाही..!

“मी तुमच्या समोर उभा आहे माझ्या सोबत तुम्हाला जे करायचय ते तुम्ही करू शकता! मि आत्ता या क्षणी अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये असं काहीही बोलणार नाही जेणेकरून मि इथून निघून गेल्यानंतर मला माझा शब्द फिरवावा लागेल”.

हे ऐकल्या नंतर त्या मुलांनी यशवंत सिन्हांना सोडून दिलं. कदाचित त्यांच्या अशा करारी, निडर बोलण्याने मुलांच्या विचारात परिवर्तन झालं असावं. आपण चुकीच्या माणसाला भिडलो अशी त्यांची धारणा झाली असावी. आणि अशा तर्‍हेने ते या जीवघेण्या प्रसंगात सुद्धा आपल्या विचारांवर ठाम राहिले आणि त्यातून सही सलामत बाहेर पडले..!

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.