बिचुकले तर किरकोळ ; राष्ट्रपती पदासाठी पहिल्यांदा अपक्ष फाईट देणारे गणेश थत्ते माहितायत का.?

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी शंभर आमदार आणि शंभर खासदारांची मला गरज असून महाराष्ट्राबाहेरील लोकप्रतिनिधींच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य अभिजीत बिचकुले यांनी केलं. आत्ता अभिजीत बिचुकले माहित नसणारा माणूस महाराष्ट्रात तर नाही. थेट सलमान खानला हाग्या दम दिल्याने ते भारतात देखील प्रसिद्ध झाले आहेत. 

आत्ता अभिजीत बिचुकले यांचा मुळ धर्म निवडणूक लढवणे, ते कोणत्याही निवडणूकीत कोणाच्याही विरोधात उभा राहतात. अगदी सुरवातीपासूनच उभा राहतात. त्यामुळेच एका पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी मी फक्त अभिजीत बिचुकले यांना भितो अस वक्तव्य केलेलं त्यानंतर ते प्रसिद्ध झाले. पुढे मराठी बिगबॉस मध्ये प्रवेश झाला आणि पेज थ्री वर बिचकुले विराजमान झाले. 

आत्ता राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार असल्याचं घोषीत केल्यानंतर, लोकं म्हणायला लागली असं पुर्वी नव्हतं. पुर्वी खूप छान होतं…

पण कसं असतं, जून्या माणसांना सवयच असते पूर्वी खूप छान होतं सांगण्याची. पुर्वी पण काही छान वगैरे नव्हतं. पुर्वी पण अशी लोकं स्टंट मारायची, पडायची, राडा करायची.. फक्त तेव्हा सोशल मिडीया नव्हतं त्यामुळे आजच्या इतकी त्यांची हवा झाली नाही इतकचं.. 

असो तर ही गोष्ट आहे बिचकुलेंच्या हजार पट डेंजर असणाऱ्या लक्ष्मण थत्तेंची.. 

तर गोष्टीची सुरवात होते पहिल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीपासून.. 

राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक झाली ती ०२ मे १९५२ रोजी. 

भारताच्या संविधान निर्मीतीनंतरची ही पहिली निवडणूक. त्यामुळे अनेक कार्यकर्ते उत्साहात होते. कॉंग्रेसचं भारताच्या स्वातंत्रलढ्यात योगदान होतं त्यामुळे साहजिकच कॉंग्रेस म्हणले तो पंतप्रधान आणि कॉंग्रेस म्हणेल तो राष्ट्रपती होणार होता. १९५० साली संविधान लागू झाल्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती झाले होते. तेच १९५२ च्या पहिल्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवार असणार होते. 

पण त्यांच्या विरोधात कोण..? 

विरोधी पक्ष सक्षम नव्हता. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार हे फिक्स होतं.. 

अशा वेळी मैदानात आले ते “गणेश लक्ष्मण थत्ते”.. 

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी ते राजेंद्र प्रसाद यांच्या विरोधात अपक्ष लढलेले. बर राष्ट्रपतीपदासाठी लढवलेली ही त्यांची पहिली निवडणूक होती. त्यानंतरही त्यांनी अनेकदा निवडणूक लढवली. प्रत्येक निवडणूक ते लढवायचे. आणि दिग्गज नेत्यांना ते फाईट द्यायचे. अगदी पंतप्रधान नेहरूंपासून हा क्रम चालू होतो. ते स्वत:चा बद्दल सांगताना म्हणायचे, 

मी निवडणूकीच्या राजकारणात पडलो.. 

गणेश लक्ष्मण थत्तेंची अतिरिक्त माहिती म्हणजे ते हिंदू महासभेशी संबंधित होते. त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे जेष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांना मारहाण केल्यामुळे ते प्रसिद्ध झाले होते. 

आत्ता फक्त निवडणूक लढवणं आणि पडणं, यामुळेच ते प्रसिद्ध होते का? तर नाही.. तर बिचकुले यांच्यापेक्षा जबराट होते कारण फक्त किरपान वापरता यावं म्हणून त्यांनी शीख धर्म स्वीकारला होता. शीख समाजाला शस्त्र वापरता येतं म्हणून त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला पण होते ते मात्र प्रखर हिंदूत्ववादीच.

शीख धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी आपलं गणेश लक्ष्मण थत्ते हे नाव सोडून दिलं आणि कर्तारसिंग थत्ते हे नाव स्वीकारलं. पण हा खेळ जास्त काळ टिकला नाही. ते पुन्हा हिंदू धर्मात आले. आणि परत आपले जुने नाव स्वीकारलं.. 

राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या निवडणूकीत त्यांना २ हजार ६७२ मते मिळाली होती. आत्ता हे ही काय कमीय. बाकी कर्तारसिंग थत्ते यांच्याबाबत अजून अधिकची माहिती मिळत नाही, त्यांचा फोटोही मिळत नाही. मिळते ती इतकीच माहिती. त्याकाळात सोशल मिडीया असता तर मात्र गणेश थत्ते यांच्याबद्दल तुफान माहिती असती हे मात्र नक्की.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.