दस का दम : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची दहा खास वैशिष्ट्ये

महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या चर्चेत असणारे दोन नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. आता तर दोन्ही नेते उपमुख्यमंत्री पदावर. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या दोन्ही नेत्यांचा आज २२ जुलैला एकसाथ जन्मदिवस असतो. याच निमित्ताने दोन्ही नेत्यांची काही वैशिष्ट्ये बघूया… 

१) फडणवीस – सलग ५ वर्ष मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पुर्ण करणारे दूसरे नेते

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा इतिहास बघितला तर फक्त दोन नेते असे आहेत ज्यांनी त्यांचा ५ वर्षांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पूर्ण केला आहे. यात पाहिलं नाव आहे वसंतराव नाईक यांचं. वसंतदादांकडे  नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याची जबाबदारी आली होती. 

डिसेंबर १९६३ ते फेब्रुवारी १९७५ असा तब्बल ११ वर्षांहून जास्त काळ ते पदावर होते. त्याआधी कुणालाच ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही तर त्यानंतर डायरेक्ट देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ असा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. 

२) फडणवीस – मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री होणारे पहिले नेते 

तसं महाराष्ट्राच्या इतिहासात उच्च पदावरून खालच्या पदावर आलेले नेते झाले आहेत. जसं शंकरराव चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर, नारायण राणे, छगन भूजबळ, अशोक चव्हाण. देवेंद्र फडणवीस यांनी या रांगेमध्ये आता स्थान मिळवलं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अजून एक स्वतंत्र स्थान स्वतःसाठी तयार केलंय.

२०१४ -२०१९ अशी पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून परतले आहेत. मुख्यमंती ते उपमुख्यमंत्री होणारे ते पहिले आणि एकमेव नेते आहेत. 

३) अजित पवार – सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले नेते 

महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पद भूषविणारे अजित पवार हे एकमेव नेते आहेत. १९९९ ते २०१४ या काळात महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या १५ वर्षांच्या राजवटीत अजित पवार दोन वेळा उपमुख्यमंत्री होते.

त्यानंतर २०१९ मध्ये २३ नोव्हेंबरला राष्ट्रवादी विरोधात बंड करून भाजपशी हात मिळवणी केल्यानंतर त्यांनी पुन्हा या पदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनच दिवसांत म्हणजे २६ नोव्हेंबरला त्यांनी राजीनामा दिला. परत राष्ट्रवादीमध्ये आले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ३० डिसेंबर २०१९ ला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी चौथ्यांदा तर आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये पाचव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

४) अजित पवार – आधी खासदार नंतर आमदार  

अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली १९८२ मध्ये जेव्हा ते सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर निवडून आले. १९९१ मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या (पीडीसी) अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्याच वर्षी दादा बारामती संसदीय मतदारसंघातून लोकसभेला खासदार म्हणून निवडून गेले.

पण शरद पवार यांच्यासाठी त्यांनी ताबडतोब लोकसभेची जागा रिकामी केली आणि त्यानंतर ते बारामती मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले.

५) फडणवीस – आधी नगरसेवक मग महापौर आणि मग आमदार 

नव्वदच्या दशकात फडणवीसांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. महाविद्यालयात विद्यार्थी असताना फडणवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य होते. वयाच्या अवघ्या २२ वर्षी म्हणजे १९९२ साली ते नगरसेवक झाले. त्यानंतर ५ वर्षांनी म्हणजे १९९७ मध्ये फडणवीस नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले.

त्यानंतर फडणवीस हे १९९९ मध्ये विधानसभेचे आमदार झाले.

६) अजित पवार – शेती करून राजकारणात आले

अजित पवारांना शेतकऱ्यांसाठी हिरीरीने काम करणारा नेता म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे ते स्वतः शेतकरी कुटुंबातून येतात आणि त्यांनी स्वतः शेतकरी म्हणून काम केलं आहे. दादा जेव्हा पदवीचं शिक्षण घेत होते तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्यांनी शिक्षण सोडलं आणि शेती देखील केली होती.

त्यांच्या अनुभवांमुळेच सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये १९९१ साली त्यांना कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री पद देण्यात आलं होतं. पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांना शेती खातं देण्यात आलं होतं.

अजित दादांच्या शेतीतला एक भन्नाट किस्सा देतोय नक्की वाचा…

ऐंशीच्या दशकात अजित पवारांनी टॉमेटोचं एकरी 80 हजाराचं उत्पन्न घेवून विक्रम केलेला.

७) फडणवीस – आधी वकिली मग मॉडेलिंग आणि मग राजकारण

१२ वी नंतरचं शिक्षण घेताना फडणवीस यांनी वकिली करण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार नागपूर विद्यापीठाच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती.  कॉलेजमध्ये शिकत असताना ते मॉडेलिंग सुद्धा करत होते.

 देवेंद्र फडणवीस हे पहिल्यावेळेस आमदार झाले तेव्हा त्यांचे पोश्टर एका कपड्यांच्या जाहिरातीमध्ये संपुर्ण नागपूर शहरात झळकले होते. मॉडेल आमदार म्हणून वर्तमान पत्रांचे रकानेच्या रकाने भरले होते.

त्यांचा मॉडेलिंग किस्सा संपूर्ण इथे वाचू शकतात… 

फडणवीसांना पाहताच वाजपेयी म्हणाले, “व्वा व्वा ! क्या स्मार्ट मॉडेल है ये…”

आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील समान वैशिष्ट्ये बघूया… 

८) कधीच पक्षांतर केलेलं नाही 

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवातच विद्यार्थी असताना केली होती. महाविद्यालयात असताना त्यांनी भाजपच्या विद्यार्थी विद्यार्थी परिषदेचे सदस्य म्हणून सुरुवात केली होती. मगरसेवक झाले तेही भाजपच्याच तिकिटावर आणि मुख्यमंत्री झाले तेही भाजप नेते म्हणूनच. २०१९ मध्ये सत्ता गेली तरीही त्यांनी पक्ष सोडला नाही. तर आता त्याच पक्षाच्या आदेशाने मुख्यमंत्रीपदाची योग्यता असतानाही उपमुख्यमंत्री पद भूषवत आहेत.

पवार हे देवळाली प्रवरा इथे प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांचे काका शरद पवार यांनी त्यांना राजकारणात प्रवेश दिला होता. तेव्हापासून ते शरद पवारांच्या सोबत आहेत. १९९९ साली जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हा देखील दादा शरद पवारांसोबत बाहेर पडले. त्यांनी पक्षाच्या विस्तारासाठी आणि एकजुटीची नेहमीच कार्य केलं.

२०१९ मध्ये बंद करून बाहेर गेले आणि तीनच दिवसांत परत पक्षात आले. आता तर पक्षातील एक मोठा गट घेऊन त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. इतकंच नाही तर अजित पवार राष्ट्रवादी पक्षावर दावा करत आहेत.

९) प्रशासनावर पकड

२०१९ मध्ये जेव्हा या दोन्ही नेत्यांनी मिळून सत्ता स्थापन करायची तयारी दाखवली होती आणि केवळ तीन दिवस का असेना सत्तेत राहिले होते, त्यावरून अनेकांना त्यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज आला होता. त्यांच्या या ताकदीचं रहस्य म्हणजे त्यांची प्रशासनावर असलेला वचक.

२०१४ ते २०१९ या काळातील फडणवीसांनी प्रशासनावरील पकड दाखवून दिली होती. त्यांनी आपल्या या कारकिर्दीत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मागील १५ वर्षाच्या राजवटीतील कागदावर असणारे अनेक प्रकल्प प्रत्यक्षात उतरवले. शिवडी- न्हावाशेवा ट्रान्सहार्बर हे त्याचं मोठं उदाहरण आहे. याशिवाय मुंबईतील मेट्रो, नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पांना त्यांनी गती दिली.

मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या कल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिलं. मुंबई- नवी मुंबईला जोडणारा वाशी इथला तिसरा पूल यासारखे अनेक प्रकल्प त्यांनी सुरू केले. 

दादांची देखील प्रशासनावरील पकड जबरदस्त आहे. कामासाठी ते अधिकाऱ्यांवर कधीही दबाव टाकत नाहीत मात्र अधिकाऱ्यांना त्यांची आदरयुक्त भीती आहे, असं सांगितलं जातं. एखाद्या योग्य कामाला अन्य कोणाचा कितीही विरोध असला तरी अशावेळी ते अधिकाऱ्यांच्याच बाजूने उभे राहतात. भोसरीतून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणास भोसरीकरांचा तसंच सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध होता.

मात्र, रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज लक्षात घेत सर्वांचा विरोध डावलून अजितदादा तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांच्या मागे ठामपणे उभे राहिले होते. पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा आणि भामा आसखेडचे पाणी अजितदादांनीच मंजूर केलं होतं. 

मंत्रालयात गेल्यास मुख्यमंत्री कोणीही असो, गर्दी ही अजितदादादांकडेच असल्याचं दिसतं, असं सांगितलं जातं.

१०) याच दोन्ही नेत्यांमुळे राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले.

सध्या राज्यात शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचं सरकार आहे. राज्यात भाजपचे १५२ आमदार असून सुद्धा फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर राहावं लागलं. तर अजित पवारांनी अलीकडेच बंड करून आमदारांच्या एका गटाच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सर्वच जण अलीकडच्या काळातील परिस्थिती जाणून आहेत…

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.