अक्षय कुमारच्या ओ माय गॉड-2ला सेन्सॉर बोर्डाने ‘फक्त प्रौढांसाठी’ कॅटगरीत ठेवलंय

गेली काही वर्ष अक्षय कुमारचे ग्रहच फिरले आहेत असं वाटतंय. दादा कोंडकेंचा जसा सलग नऊ चित्रपट हिट देण्याचा रेकॉर्ड आहे तसा अक्षय कुमारचा आता पर्यंत सलग फ्लॉप चित्रपट बनवण्याचा रेकॉर्ड झाला असेल. आता अक्षय कुमारचा OMG2 येतोय. OMG1 तर खूपच चांगला चालला. पण कदाचित अक्षय कुमारचं नशिबच खराब असल्यामुळे OMG 2 चं पोस्टर आल्यापासून काही ना काही वाद चालूच आहेत. आता OMG2 साठीचं नवीन संकट म्हणजे OMG2 मधले ऑडीओ आणि व्हिडीओ सिन्स सकट एकूण २० सिन्स सेन्सॉर बोर्डने कापण्यासाठी सांगितलं आहे आणि चित्रपटाला A सर्टिफिकेट देण्यात आलं आहे.

मुळात OMG2 चा ट्रेलर लॉंच झाला तेव्हाच नेटकाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. 

अमित राय यांनी दिग्दर्शित केलेल्या OMG 2 अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यमी गौतमी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. याच्या ट्रेलर मध्ये किसिंग सीन दाखवण्यात आल्यामुळे ट्रेलरसुद्धा वादात होता. त्यात अक्षय कुमार शंकराच्या भूमिकेत दाखवल्याने, “शंकराचा अपमान होईल असं काही चित्रपटात करू नकोस” अशी ताकीद नेटकाऱ्यांनी आधीच दिली होती. 

त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने सुद्धा सामान्य जनतेच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची जास्त काळजी घेतली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या रिवायजिंग टीमनं चित्रपट पाहिला आहे आणि यातून २० सिन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री मारली आहे आणि चित्रपटाला A सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. 

चित्रपटाला सर्टिफिकेट A मिळणं म्हणजे या चित्रपटामध्ये अशी काही दृश्ये आहेत जी लहान वयाच्या मुलांसाठी नाहीत तर फक्त १८ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे लोकच हा चित्रपट पाहू शकतात. पण OMG2 सारख्या काहीसा धार्मिक गोष्टींवर आधारलेल्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने A सर्टिफिकेट का दिलं गेलं. 

OMG 2 सारख्या धार्मिक वाटणाऱ्या चित्रपटाला A सर्टिफिकेट का दिलं?

याआधी अक्षय कुमार ‘ओह माय गॉड’ मध्ये श्रीकृष्ण बनला होता, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता त्याच्या सिक्वेलमध्ये अक्षय भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग हिट झाला होता आणि लोक त्याच्या दुसऱ्या भागाकडूनसुद्धा तशीच अपेक्षा करत आहेत. पण आदिपुरुषनंतर झालेल्या गदारोळामुळे बऱ्याच रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.

त्यामुळे OMG 2 मधून सुद्धा कोणत्याही शिवभक्ताच्या भावना दुखावल्या जाऊ नये यासाठी OMG 2 आधीपासूनच सेन्सॉर बोर्डाच्या रडारवर होता आणि आदिपुरुष सारखी परिस्थिती टाळण्यासाठी CBFC म्हणजेच सेन्सॉर बोर्डने OMG 2 च्या रिलीजपूर्वी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे.

चित्रपटाचं कथानक काय आहे?

या चित्रपटाचं कथानक होमोफोबियावर आधारित आहे. चित्रपटाच्या कथेत एक मुलगा आहे, जो समलैंगिकतेच्या टोमण्यांना कंटाळून आत्महत्या करतो. पंकज त्रिपाठी जे शिवभक्त असतात, ते लोकांना होमोफोबियाबद्दल जागरूक करण्याचा वसा घेतात. पंकज त्रीपाठींच्या या लढ्यात महादेव स्वतः अवतार घेतात आणि आपल्या भक्ताला मदत करतात असं काहीसं याचं कथानक असल्याचं म्हटलं जातंय. थोडक्यात हा चित्रपट लैंगिक शिक्षणावर आधारित असणार आहे. त्यादृष्टीने यात तसेच सिन्स दाखवले आहेत.

आदिपुरुष आणि ओपनहायमरमुळे बरेच धार्मिक प्रश्न उभे राहिले होते. हीच रिस्क आता सेन्सॉर बोर्डला OMG 2 साठी नाही घ्यायची आहे.

या चित्रपटाची सुद्धा पार्श्वभूमी देवावर अवलंबून आहे आणि चित्रपटाचा विषय सुद्धा संवेदनशील आहे. त्यामुळे भविष्यात कोणतेही वाद होऊ नयेत यासाठी चित्रपटाला A सर्टिफिकेट देण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाने घेतला आहे.

मग चित्रपट कधी आणि कुठे प्रदर्शित होईल?

पण चित्रपटाच्या निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला हा निर्णय मान्य नाही. त्यामुळे चित्रपटाचे निर्माते दिल्लीत असलेल्या फिल्म सर्टिफिकेट अपिलेट ट्रिब्युनल (FCAT) कडे दाद मागू शकतात. आणि चित्रपटातले २० सिन्स काढले तर चित्रपटाला काही अर्थच उरणार नाही असंही निर्मात्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे ११ ऑगस्टवर आलेल्या चित्रपटाचं रीलीजिंग पुढे ढकलण्यात येऊ शकतं असं बोललं जातंय आणि जर FCAT ने सुद्धा यात अपेक्षित निर्णय दिला नाही तर OMG 2 ओटीटी वर प्रदर्शित केला जाऊ शकतो असं म्हटलं जातंय.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.