रमेश पोवारला ‘कबीर खान’ बनता आलं नाही, म्हणून भारताला विश्वचषक गमवावा लागला !

“मला भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकायचा होता, पण आपण सुवर्णसंधी गमावली”

भारतीय महिला क्रिकेटच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राज हिने दिलेली ही प्रतिक्रिया फक्त मितालीचीच नाही, तर भारतीय क्रिकेटमधल्या अंतर्गत राजकारणामुळे देशाने गमावलेल्या विश्वविजयाच्या संधीची देखील शोकांतिका आहे.

मिताली दोराई राज.

केवळ भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटच्या आजपर्यतच्या इतिहासातलं सर्वात प्रभावशाली नाव. महिला क्रिकेटमधील वन-डे प्रकारात सर्वाधिक रन्स काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ती जगात पहिल्या क्रमांकावर आहे. महिलांच्या वन-डे क्रिकेटमध्ये ६००० रन्सचा टप्पा पार करणारी ती जगातली एकमेव खेळाडू.

टी-ट्वेंटी प्रकारात तर तीने सर्वाधिक रन्स बनवणारी भारतीय खेळाडू ठरताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला देखील मागे टाकलंय. म्हणजेच पुरुष आणि महिला असं दोन्हीही एकत्रितरित्या जरी बघितलं तर मिताली टी-ट्वेंटीत सर्वाधिक रन्स काढणारी भारतीय आहे.

हिटमॅन रोहित शर्मा हा पुरुषांच्या टी-ट्वेंटी प्रकारात सर्वाधिक रन्स फटकावणारा भारतीय खेळाडू. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९० मॅचेसमधल्या ८२ इनिंग्जमध्ये २२३७ रन्स काढलेत. त्यात त्याचं अॅव्हरेज आहे साधारण ३३ इतकं. याउलट मितालीच्या नावावर आहेत ८५ मॅचेसमधल्या ८० इनिंग्जमधले २२८३ रन्स. साधारणतः ३७ च्या अॅव्हरेजसह.

mithalli raj
मिताली राज

रोहित शर्मा आणि मिताली राज यांची तुलना करून मिताली रोहितपेक्षा सरस आहे का, हे सांगण्याचा हा प्रयत्न नाही. (किंबहुना तशी तुलना करणं फारसं न्यायोचित नाही, याची कल्पना प्रस्तुत लेखकास आहे) ही तुलना फक्त मिताली टी-ट्वेंटी क्रिकेटर म्हणून किती उत्तम खेळाडू आहे, हे सांगण्यासाठी.

आजघडीला हे सगळं सांगण्याचं प्रयोजन असं की गेल्या आठवडाभरात भारतीय महिला क्रिकेटमध्ये उभा राहिलेला मोठा वाद. २२ नोव्हेंबर २०१८ रोजी महिलांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सेमी-फायनलमध्ये इंग्लडच्या संघाने भारताचा ८ विकेट्सने दारूण पराभव केला आणि भारताच्या विश्वविजयाचं स्वप्न भंगलं.

वादाला सुरुवात झाली ती याच घटनेपासून. सेमी-फायनलसारख्या इतक्या महत्वाच्या सामन्यासाठी संघातील सर्वात सिनिअर खेळाडू असलेल्या मिताली राजला वगळण्यात आलं होतं. खरं तर मितालीला इंज्युरीमुळे साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यातच संघातून बाहेर बसविण्यात आलं होतं. परंतु सेमी-फायनलपर्यंत ती सामन्यासाठी फिट झाली होती.

अशा परिस्थितीत मितालीला संघातून वगळण्याचा निर्णय धक्कादायकच होता. कारण साखळी फेरीत मितालीची कामगिरी अतिशय चमकदार राहिली होती. पाकिस्तान आणि आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात फिफ्टीज ठोकून तिने संघाच्या विजयात महत्वाची भूमिका निभावलेली होती. दोन वेळा ती ‘मॅन ऑफ द मॅच’ देखील ठरली होती.

हे असं सगळं असताना देखील मितालीला संघातून वगळण्यात आलं आणि सेमी-फायनलमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाने तर या मितालीच्या जखमेवर मीठ चोळल गेलं. मितालीला संघाच्या बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले.

harman
टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर

इंग्लंडविरुद्धचा सेमीफायनल संपल्यानंतरच पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ‘मिलातीला न खेळवण्याच्या निर्णयावर कुठलाही पश्चाताप होत नाही. आम्ही जो काही निर्णय घेतला, तो संघासाठी घेतला. कधी गोष्टी तुम्ही ठरवल्याप्रमाणे होतात, कधी होत नाहीत” अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतरच सगळ्या वादाला तोंड फुटलं.

मितालीच्या मॅनेजर अनिष्ठा गुप्ता यांनी हरमनप्रीत कौरवर ट्विटरच्या माध्यमातून ती खोटारडी, धोकेबाज आणि स्वार्थी असल्याचा आरोप केला. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामी हिने सेमीफायनलच्या वेळी मितालीला डगआउटमध्ये बसल्याचं बघून वाईट वाटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

खुद्द माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली देखील मितालीच्या समर्थनात उतरला आणि हा वाद वाढतच गेला. लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनी मितालीला बाहेर बसवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना प्रशिक्षक रमेश पोवार यांना आपल्या टिकेचं लक्ष्य बनवलं.

या सगळ्या प्रकरणावर मितालीने बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी आणि संचालक प्रमुख साबा करीम यांना पत्र लिहून संपूर्ण आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या पत्रातून संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार आणि  डायना एडूल्जी यांच्यावर निशाणा साधला. प्रशिक्षक रमेश पोवार यांनी जाणीवपूर्वक आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली. पोवार यांनी आपला आत्मविश्वास कमी करण्यासाठी प्रयत्न केल्याचे, मितालीने आपल्या पत्रात म्हंटलं.

ramesh powar
भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मितालीशी वैयक्तिक पातळीवर आपले संबंध बिघडल्याची कबुली देतानाच तिला वागळण्याचा निर्णय मात्र कामगिरीच्या आधारेच घेण्यात आल्याचं पोवार यांनी सांगितलं. मितालीचा स्ट्राईक रेट खराब असल्याचं कारण त्यांनी आपल्या विधानाच्या समर्थनात दिलं.

सेमीफायनलमध्ये भारताला मितालीची सर्वाधिक उणीव भासली ती ज्यावेळी संघाचा डाव  ८९ रन्सवर २ विकेट अशा सुस्थितीत असताना अवघ्या ११२ रन्समध्ये कोसळला. विश्वचषकासारख्या इतक्या महत्वाच्या इंव्हेटमध्ये खेळताना टॅलेंटशिवाय अनुभवाची देखील गरज असते. दबावाच्या परिस्थितीत हाच अनुभव कामाला येतो. जो मितालीकडे पुरेपूर होता. पण केवळ प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याशी तिचं पटत नव्हतं, म्हणून तिला संघातून वगळण्यात आलं आणि इतक्या महत्वाच्या सामन्यात भारताला मितालीच्या अनुभवाचा फायदा उठवता आला नाही.

क्रिकेटसारख्या खेळात जर-तरला काही अर्थ नसला तरी वैयक्तिक हेवेदाव्यांपोटी ज्यावेळी देशहितचं फाट्यावर मारलं जातं, त्यावेळी या गोष्टींचा विचार करावाच लागतो. मितालीच्या विश्वचषकातील कामगिरीवर जरी एक नजर टाकली तरी आपल्याला लक्षात येईल की तिला वगळण्यासाठी कुठलंही वैध कारण सापडत नाही. रमेश पोवार यांनी केवळ आपला वैयक्तिक आकस म्हणून मितालीला लक्ष्य बनवलं आणि त्याची किंमत भारतीय संघाला विश्वचषक गमावून मोजावी लागली.

या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर मला ‘चक दे इंडिया’ सिनेमात शाहरुख खानने निभावलेला प्रशिक्षक कबीर खान आणि भारताच्या महिला हॉकी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू  बिंदिया नाईकची भूमिका निभावलेली शिल्पा शुक्ला आठवतात.

या संपूर्ण सिनेमात संघाचा प्रशिक्षक कबीर खान आणि संघातील सर्वात अनुभवी खेळाडू बिंदिया नाईक यांच्यात एक प्रकारच शीतयुद्ध दाखवण्यात आलंय. परंतु ज्यावेळी भारतीय संघाला आपल्या सर्वात अनुभवी खेळाडूची सर्वाधिक गरज असते, त्यावेळी कबीर खान आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवतो आणि संघहिताच्या दृष्टीकोनातून सर्वात महत्वाच्या मॅचमध्ये बिंदिया नाईकला मैदनावर पाठवतो. बिंदिया नाईक संघाच्या विजयात महत्वाची भूमिका निभावते आणि विश्व चँम्पियन बनण्याचा संघाचा रस्ता सुकर करते.

अर्थात, हा झाला सिनेमा म्हणून तिथे सुखांत होतो. ‘पोवार-मिताली’ प्रकरणात मात्र रमेश पोवार कबीर खान इतका मनाचा उमदेपणा दाखवत नाहीत आणि मितालीला संघाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतात. पोवार यांच्या या निर्णयाची परिनिती करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या विश्चचषक विजयाचं स्वप्न चक्काचूर होण्यात झाली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.