रेखाकडे सेटिंग लागावी म्हणून बच्चनने तिच्या पप्पांना खासदार करायचा प्लॅन केला होता.

निवडणूकांचा काळ आहे. तिकिटांची खरेदी विक्री सुरु झाली आहे. कुठून काय सेटिंग लागेल यासाठी मोठेमोठे लोक पक्षाच्या दारात दीनवाणे उभे आहेत. यात मोठे मोठे फिल्मस्टार देखील असतात. सिनेमाच्या ग्लॅमरपेक्षा सत्तेच्या खुर्चीच ग्लॅमर त्यांना आकर्षित करत असते.

विशेषतः दक्षिणेत. 

तिकडे पब्लिकसाठी फिल्मस्टार हे खऱ्या आयुष्यातही देव असतात. अगदी भक्तीभावाने या सुपरस्टारनां राजकारणातही देव बनवून टाकल जात. यात शिवाजी गणेसन पासून ते एमजी रामचन्द्रनपर्यंत अनेक हिरोंनी राजकारणात यश मिळवलं. यांच्या काळातच अजून एक सुपरस्टार होता जो राजकारणाच्या दलदलीपासून दूर होता. नाव जेमिनी गणेसन.

तामिळ फिल्मइंडस्ट्रीचे रोमांटिक हिरो म्हणून जेमिनी गणेसन खूप सुपरहिट होते. त्यांचे राजेश खन्ना. त्यांना पडद्यावर बघून पोरी घायाळ व्हायच्या. पोरं त्यांची स्टाईल कॉपी करायची. खऱ्या आयुष्यात देखील ते रोमांटिक होते. फिल्म मधल्या हिरोईनशी त्यांच्या लफड्याची देखील खूप चवीने चर्चा व्हायची. त्यांची बरीच लग्ने झाली, बरेच अफेअर झाले. अशाच कारनाम्यातून एक मुलगी झाली, तीच नाव भानुमती रेखा.

रेखा अगदी लहान वयात सिनेमामध्ये आली. तमिळ सिनेमातून थेट बॉलीवूड मध्ये पोहचली. तिथे अडखळत अडखळत सुरवात केली मात्र अमिताभच्या मुकद्दर का सिकंदर सिनेमापासून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या नावावर पिक्चर खपत होते. सुरवातीला हिंदी बोलताही न येणारी रेखा हिंदी सिनेमात सुपररस्टार झाली होती.

इतके होऊनही जेमिनी साहेबांनी कधीच तिला आपली मुलगी म्हणून ओळख दिली नाही. ते दक्षिणेत आपल्या सेलीब्रेटी लाईफ मध्ये खुश होते. आपली मुलगी आपल्या पेक्षाही मोठे यश मिळवतेय याकड कौतुकाने सोडाच तर ढुंकूनही त्यांनी बघितल नाही.

रेखा सुपरस्टार तर झाली मात्र तिच्या आयुष्यात एका वडीलधार्या व्यक्तीची कमी होती. तिला लहानपणापासून पितृप्रेमाची आसक्ती होती. वडिलांनी कधी तरी चार शब्द चांगले बोलावेत यासाठी ती झुरायची. याच काळात तिच्या आयुष्यात आला बच्चन अमिताभ.

अमिताभ तेव्हा सर्वात मोठा सुपरस्टार होता. त्याची फाईट त्याची स्टाईल त्याचा वॉक भारतासाठी एक दंतकथाच होऊन गेली होती. अनेक रूपगर्विता त्याच्यावर मरत होत्या. मात्र अमिताभ जया भादुरीबरोबर लग्न करून संसारात सेटल झालेला होता.

त्याची ही विश्वामित्री तपश्चर्या मात्र रेखासारख्या अप्सरेपुढे विरघळून गेली. रेखासाठी काहीही करायला तो तयार होता. रेखासुद्धा त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. दोघांच्या लव्हस्टोरीचे किस्से मगझिनमधून बाहेर येऊ लागले. पिक्चरमध्येही दोघांची केमिस्ट्री दिसून येत होती.

पण रेखा खुश नव्हती…

वडीलानी आपल्याला स्वीकारावं यासाठी काय कराव या विचारानं रेखा रात्रभर रडायची. अमिताभला तिची ही अवस्था बघवायची नाही. रेखाला तिचे वडील मिळवून द्यायचे म्हणजे ती कायमची आपली होईल हा हिशोब त्याने मनाशी ठरवून टाकला होता. पण काय करता येईल त्याला आयडिया सुचत नव्हती. घरची बायको सोडून लष्कराच्या भाकऱ्या भजने यातच हा सुपरस्टार बिझी झाला होता.

अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी एकदम खास दोस्त होते. जो पर्यंत संजय गांधी होते तो पर्यंत राजीव गांधीचा आणि राजकारणाचा काही संबंध नव्हता. मात्र संजय गांधीच्या अकाली निधनानंतर राजीव गांधीनी पायलटच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आईच्या मदतीसाठी ते राजकारणात आले. इंदिराजी तेव्हा पंतप्रधान होत्या. बच्चन ने ठरवलं आपल्या रेखाच्या बापाला आपल वजन दाखवून इम्प्रेस करायच.

अमिताभ सरळ राजीव गांधींच्याकडे गेला. दोस्ताला सांगितल की काहीतरी मार्ग काढ. दोघ विचारात पडले. काय करता येईल. अखेर असा निष्कर्ष निघाला की तमिळच्या हिरोंना राजकारणच आकर्षण असते तर जेमिनी गणेसननां राज्यसभेची खासदारकी ऑफर करू. बच्चन खुश झाला. रेखाला लगेच फोन करून सांगितल असणार. 

टिपिकल हिंदी सिनेमाप्रमाणे पोरीचा व्हिलन बाप हिरोच्या हिरोगिरी मुळे खुश होऊन जुनं सगळ विसरून त्यांना स्वीकारतो असच होईल असा अंदाज बच्चनने लावला.

काही दिवसात बातमी आली की दक्षिणेतील सुपरस्टार जेमिनी गणेसण यांना कॉंग्रेसने राज्यसभेचा खासदार होण्यासाठीच पत्र पाठवल आहे. इंडस्ट्रीच्या खबऱ्याना वास लागला की यामागे बच्चन आणि राजीव गांधी यांची मैत्री आहे. आता रेखा बच्चनची गाडी स्पीड पकडणार असच वाटत होतं.

पण तेवढ्यात जेमिनी गणेशन यांनी राजीव गांधींच्या ऑफरला लाथ मारली. त्यांना आपल्यावर कोणाच्याच उपकाराची गरज नव्हती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारण त्यांना नको होत. बच्चनचा वशिला वाया गेला. पुढे सिलसिला सिनेमावेळी जया बच्चनने दोघांचे कान धरले आणि ही लव्हस्टोरी मागे पडत गेली.

रेखाने मात्र आपल्या वडिलाना कधीच माफ केल नाही. त्यांच्या निधनानंतर ही ती अंत्यदर्शनाला गेली नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.