सगळं जुळून आलं असतं, तर ती सौ. माधुरी सुरेश वाडकर झाली असती पण…
काही भिडू म्हणतात की अरेंज मॅरेज ही एक लॉटरी आहे. कधीकधी ती लागते. कधीकधी गण्डते. पण कधीकधी लॉटरी आपल्या हातात येऊन निघून जाते पण आपण मिस करतो. असच काहीस घडलं होत सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांच्या बाबतीत.
सुरेश वाडकर ठाऊक नाहीत असं कोणी आहे का आपल्यात? हां तेच ते जरा डोक्यावरच्या केसांनी थोडीशी पिछाडी पकडलेले गोरेगोमटे सुरेशजी. ओमकार स्वरूपा सारख्या मनाला भुरळ घालणाऱ्या भक्तीगीतापासून ते कमीनेमधल्या रात के ढाई बजे पर्यंत जबरदस्त गाणी गाणारे पट्टीचे व्हर्साटाईल गायक. आवाज म्हणजे काय एकदम मख्खन.
गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. सुरेश वाडकर यांचं लाईफ तोपर्यंत सेट झालेलं. मुळचे कोल्हापुरचे. गाण्याची स्पर्धा वगैरे जिंकून सिनेमामध्ये आले. लता मंगेशकरांना त्यांचा आवाज खूप आवडला. त्यांनी सगळीकडे त्यांच नाव रेक्म्नेड केलं.
कल्याणजी आनंदजीपासून ते आरडी बर्मन यांच्या पर्यंत सगळी कडे सुरेश वाडकरांचा आवाज ऐकू येऊ लागला. विशेषतः चॉकलेट बॉय ऋषी कपूरचा आवाज म्हणून सुरेश वाडकर चमकू लागले होते. त्याच्या प्रेमरोगची सगळी गाणी त्यांनीच गायली होती.
सदमामधलं ऐ जिंदगी गले लगाले आणि शेखर कपूरच्या मासूममधलं हुजूर इस कदर भी ही गाणी गाजली त्यापेक्षाही त्यांच समीक्षकांनी कौतुक केलं.
आता करीयरने व्यवस्थित स्पीड पकडली आहे, पैसे चांगले कमवतोय, दिसायला ही देखणा आहे, वय देखील २८-३० वर्षांचं झालंय. एवढ सगळ असल्यावर प्रत्येक मराठी पालकांना वाटेल तशी सुरेशजींच्या घरच्यांनाही त्यांच्या लग्नाची चिंता लागली होती.
वधुवर सूचक मंडळात नाव नोंदवलं होतं का माहित नाही पण बऱ्याच मुलींच्या बायोडाटाचा ढीग त्यांच्या घरी रोज येऊ लागला.
एवढा सुप्रसिध्द गायक, त्याच्याबरोबर लग्न करायची संधी कोण गमावणार? अशातच एक मुंबईचं स्थळ आलं होतं, मुलीच नाव माधुरी दिक्षीत. सुरेशजीना फोटोत ती मुलगी बरी वाटली. कांदेपोह्यांचा कार्यक्रम फिक्स झाला.
पोरगी स्वैपाक चांगला करते, आवाज चांगला आहे, अभिनयाची आवड आहे वगैरे सगळे टिपिकल प्रश्नोत्तरे झाली. पण राहून राहून सुरेशजीना एकचं शंका छळत होती की मुलगी दिसायला सुंदर तर आहे, स्माईल वगैरी एकदम भारी आहे पण अंगकाठी खूप बारीक आहे. दोघांच्या वयातही तब्बल बारा वर्षांचा फरक होता. माधुरी अजून कॉलेजमध्ये जात होती.
एवढा सगळा विचार करून सुरेश वाडकर यांनी पोक्तपणाचा विचार केला की नकोच ही मुलगी, दुसरी बघू.
सुरेश वाडकरांच्या सारखं चांगलं स्थळ गेलं म्हणून तिच्या आईवडीलांनी हळहळ व्यक्त केली. आईने जरा पोटाला खात जा असा इशारा वजा धमकी देऊन झाली. पण अल्लड वयाच्या माधुरीला एवढ काही विशेष जाणवलं नाही. तिला स्वतःला सुद्धा माहित होतं की आपण खूपच बारीक आहे. आता आपल्याला मनाप्रमाणे अॅक्टिंगमध्ये काम करण्यापासून कोणी अडवणार नाही हाच विचार करून ती खुश होती.
आणि झालंही तसचं. राजश्री प्रोडक्शनच्या अबोध पासून तिने अॅक्टिंग सुरु केली. तेजाबच्या एक दो तीन पासून सुपरहिट झाली. हम आपके है कौनच्या ठुमक्यांनी रसिकांना घायाळ केलं. रेखा, श्रीदेवी नंतर रिकाम्या झालेल्या बॉलीवूडची सम्राज्ञीची खुर्चीवर आपल नाव कोरलं. संजू बाबा सोबतच्या तिच्या अफेअरच्या वादळी चर्चा रंगल्या पण अमेरिकेतील डॉक्टर श्रीराम नेने यांच्याबरोबर अरेंज मरेजचा संसार तिने थाटला.
इकडे सुरेश वाडकरांचं करीयर देखील त्यांच्या आवाजाप्रमाणे स्मूथ सुरु राहिलं. त्यांच्याचं पद्मा नावाच्या एका शिष्येसोबत त्यांचा लव्ह कम अरेंज लग्न झालं. ती सुद्धा त्यांच्या पेक्षा बरीच वयाने छोटी आहे पण प्रेमात कधी असे छोटे इश्यू मॅटर करत नाहीत. दोघांचा संसार सुखी चालू आहे.
पुढे जाऊन सुरेशजींनी माधुरीने काम केलेल्या परिंदा, संगीत अशा सिनेमांसाठी गाणी देखील म्हणली. काश माधुरी बरोबर आपलं लग्न झालं असतं, तर किती मस्त झालं हा विचार त्याकाळातल्या प्रत्येक भारतीयाच्या मनात धकधकत होता तो विचार थोडक्यात चान्स हुकलेल्या सुरेशजींच्या मनात येऊन गेला असेल का माहित नाही.
हे ही वाच भिडू.
- माधुरीचं हे गाणं जन्माला येतानाच पत्रिकेत राजयोग घेऊन आलं होतं.
- लग्न झालेलं नसूनसुद्धा माधुरीला नो प्रेग्नंसी क्लॉजवर सही करावी लागली होती.
- तेव्हा माधुरीला सलमान खान पेक्षा जास्त मानधन मिळालं होतं.
- तडप तडप हे फक्त सलमानचं नाही तर आमच्या संपुर्ण पिढीचं ब्रेकअप सॉंग होतं.