बलुचिस्तानचे हल्ले म्हणजे, पाकिस्तान इतरांसाठी खड्डा खोदत होता अन स्वतःच त्या खड्ड्यात पडला

पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील पंजगूर आणि नुष्की भागात फ्रंटियर कॉर्प्स आणि लष्कराच्या तळावर भीषण हल्ला झाल्याचं समोर येतंय. पाकिस्तानी लष्करासाठी काळ ठरलेल्या बलूच बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. या हल्ल्यात १०० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा दावा बलूच बंडखोरांनी केला आहे. तर दुसरीकडे, बलुचांचा हा हल्ला उधळून लावल्याचा दावा पाकिस्तानी लष्करानं केलाय.

येथील सततचे हल्ले बघायला गेलं तर ….

नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील जाफराबाद जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलिसांसह १७ जण जखमी झाले होते. इराण आणि अफगाणिस्तानच्या बॉर्डरला लागून असलेल्या बलुचिस्तानमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या प्रदेशातील चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला टार्गेट करून बलुच दहशतवादी गटांनी अनेक हल्ले केलेत. मागच्याच शुक्रवारी प्रांतातील सुई भागात सुरक्षा दलांचे एक वाहन सुरुंगाखाली आलं अन या स्फोटात किमान चार जवान ठार झाले हिते अन डझनभर कर्मचारी जखमी झाले होते. २५-२६ जानेवारीच्या रात्री अशांत प्रांतातील केच जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १० पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते.

 पाकिस्तानात दरमहा दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे, पण का ?

त्यासाठी इतिहास बघायला पाहिजे…

आता पाकिस्तान देश म्हणलं कि आपला समज पक्का आहे कि, हा देश सरळ सरळ दहशतवादाला आश्रय देतो. पण ते म्हणतात की जे इतरांसाठी खड्डा खणतात ते स्वतः त्या खड्ड्यात पडतात. असंच  पाकिस्तान  सोबत झालं…तो खड्डा म्हणजे पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत.

Balochistan Province of Pakistan: Facts on its Geography and Economy

या फोटोत जे लाल रंगात दाखवलं आहे ते म्हणजे पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांत.  

थोडक्यात सांगायचं तर आशियातील साउथ वेस्टमधील पाकिस्तानी प्रांत म्हणजे बलुचिस्तान. बलुचिस्तान, पाकिस्तानच्या चार प्रांतांपैकी एक आहे. बलुच लोकांमुळे येथील नाव बलुचिस्तान आहे. अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तानच्या सीमा एकमेकांना मिळतात.  १९४७ मध्ये, तीन संस्थानांचा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात समावेश करण्यात आला. तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी ५३५ संस्थानांना स्वतंत्र राहण्याचे स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळे कलातचा राजा अहमद यार खान याने स्वातंत्र्य हा ऑप्शन निवडला आणि पाकिस्तानमध्ये विलीन होण्यास नकार दिला, पण तसं शक्य झालंच नाही.  कलातच्या राजाची स्वतंत्र राहण्याची इच्छा १९५५ मध्ये पूर्णपणे नाकारली गेली. जेव्हा कलात बलुचिस्तान प्रांतात म्हणजेच पाकिस्तानमध्ये सामील झाला. पाकिस्तानने बलुचिस्तानच्या भल्यासाठी कधीही पावले उचलली नाहीत.

अन येथूनच स्वातंत्र्याची ठिणगी पडली. 

अगदी सुरुवातीपासूनच बलुच लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. बलुचिस्तानच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे कि, पाकिस्तानने सुरुवातीपासून फक्त पंजाब आणि सिंध प्रांतातला विकास झाला आहे….आणि काही गटांनी स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी दहशतीचा मार्ग स्वीकारलाय….आता कळलं ना कि, पाकिस्तानने कसा स्वतः साठी भला मोठा खड्डा खोदला…

पण हा बलुचिस्तानचा संघर्ष इथेच थांबला नाही…तर दुसरी ठिणगी पडली. त्याचं नाव म्हणजे, नवाब नवरोज खान. ज्यांना आझाद बलुचिस्तान चळवळीचे प्रतीक मानलं जातं. नवरोज खानने कलतच्या बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रे उचलून पाकिस्तानविरुद्ध गनिमी युद्ध सुरू केले होते. त्यांना  अटक देखील झालेली तसेच त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना फाशी देण्यात आली. तर नवाब नवरोज खान यांचा पाकिस्तानात कैदेत असताना मृत्यू झाला.

तसेच १९६३ ते ६९ दरम्यानफुटीरतावादी नेत्यांनी बलुचिस्तानसाठी नवीन संविधानाची मागणी केली होती. 

शेर मुहम्मद बिजरानी खान सारख्या नेत्यांनी आक्रमकपणे सुई गॅस फील्डमधून मिळणाऱ्या कमाईच्या वाटणीच्या मागण्या मांडल्या. १९७० मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष याह्या खान यांनी ‘वन युनिट पॉलिसी’ स्वीकारून बलुच नेत्यांसोबत युद्धाला विराम करण्यास सहमती दिल्याने हा लढा थांबला. त्यांनी ‘वन युनिट पॉलिसी’ म्हणजेच जियोपॉलिटिकल प्रोग्राम, ज्याद्वारे दोन धोरणांमुळे प्रशासनातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला होता.

पण १९७३ मध्ये बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानची लष्करी कारवाई सुरु झाली. तत्कालीन राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांनी बलुचिस्तानचे सरकार बरखास्त केले. बलुचिस्तानचे नेते खैर बक्ष मारी यांनी पाकिस्तान सरकारच्या विरोधात एकत्र येऊन बलुचिस्तान पीपल्स लिबरेशन फ्रंटची स्थापना केली. लष्कर आणि बलुच सैनिकांच्या या हिंसाचारात सुमारे ४०० पाकिस्तानी आणि सुमारे ८ हजार बलूच आंदोलक नागरिक मारले गेल्याचे सांगण्यात येते. 

आणि अजूनही ‘फ्री बलुचिस्तान’ ची चळवळ चालूच आहे…

स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या बलूच संघटनांनी २००३ मध्ये पुन्हा गनिमी हल्ल्याचा मार्ग निवडला. बलुचिस्तान चळवळीतील बहुतांश नेते पाकिस्तानबाहेर राहून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. असे म्हटले जाते की पूर्वी बलुचिस्तानचे आंदोलक फक्त पाकिस्तान लष्करावरच हल्ले करायचे पण आता नॉन-बलूच लोकं देखील त्यांच्या निशाण्यावर आहेत.

२००५ मध्ये, बलुचिस्तानी नेते नवाब अकबर खान बुगती आणि मीर बालच मेरी यांनी पाकिस्तान सरकारसमोर १५ -सूत्री अजेंडा ठेवला होता. जे कि, ते बलुचिस्तानचे १३वे राज्यपाल आणि पाचवे मुख्यमंत्री देखील होते. त्यांनी मांडलेल्या अजेंड्यामध्ये बलुच प्रांतासाठी अधिक अधिकारांची मागणी करण्यात आली होती. बुगती यांच्यावर पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. ऑगस्ट २००६ मध्ये पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबारात बुगती मारला गेला होता. पाकिस्तानी लष्कराच्या ६० हून अधिक अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले होते. ऑगस्ट २००९ मध्ये मीर सुलेमान दाऊदने स्वत:ला स्वतंत्र बलुचिस्तानचा शासक म्हणून घोषित केले.

या मध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA), ही बलुच फुटीरतावाद्यांची सर्वात मोठी संघटना आहे. २००० पासून आतापर्यंत BLA ने पाकिस्तानवर अनेक हल्ले केले आहेत. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या संघटनांची आणखी काही नावे म्हणजे बलुचिस्तान रिपब्लिकन पार्टी, लष्कर-ए-बलुचिस्तान आणि बलुच लिबरेशन फ्रंट. अशा संघटनाही आहेत ज्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमधील बलुच भागांचा समावेश करून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आणि विरळ लोकसंख्या असलेला बलुचिस्तान गेल्या ७० वर्षांपासून स्वातंत्र्य आणि हक्कांसाठी लढत आला आणि अजूनही लढत आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.