भारताच्या पोरांनी आधी कोविड आणि आता ऑस्ट्रेलियाचा पण बल्ल्या केलाय…

अंडर-१९ वर्ल्डकप. फक्त भारतालाच नाही, तर जगाला क्रिकेटचे सुपरस्टार्स देणारी स्पर्धा. पार युवराज सिंगपासून विराट कोहलीपर्यंत कित्येक हिरे याच स्पर्धेमुळं समोर आले. २०१८ मध्ये भारतानं पृथ्वी शॉच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली, २०२० मध्ये फायनलपर्यंतचा प्रवास अगदी लोण्यासारख्या झाला, पण बांगलादेशकडून पराभव स्विकारावा लागला.

त्यामुळे यंदाच्या अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये भारतीय भिडू कशी कामगिरी करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. भारताच्या टीमनं एशिया कप जिंकत, वर्ल्डकप मोहीमेची पूर्वतयारी अगदी जोरदार केली होती. त्यानंतर, वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्याच सामन्यात साऊथ आफ्रिकेला पराभवाचं पाणी पाजलं. ज्या प्रकारे भारतानं सुरुवात केली होती, ते पाहूनच संघाचं नाव संभाव्य विजेत्यांच्या यादीत घेतलं जाऊ लागलं.

पण तेवढ्यात टीमला एक मोठा धक्का बसला, कॅप्टन यश धूल, वाईस कॅप्टन शैक राशीद आणि आणखी चार खेळाडूंना कोविडची लागण झाली. संघातले हुकमी एक्केच बाहेर बसणार म्हणल्यावर संघात थोडं टेन्शनचं वातावरण होतं. पण आयर्लंड विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये आपल्या पोरांनी थेट १७४ रन्सनी विजय मिळवला. युगांडा तशी किरकोळ टीम पण, त्यांचा पार बाजार उठवत भारतानं बोर्डावर लावले ४०५ रन्स. बरं हाणामारी करुन फलंदाजांचं मन भरलं होतं, पण मग बॉलर्सचं काय? म्हणून त्यांनीही युगांडाचा ७९ रन्सवर खुर्दा उडवला.

क्वार्टर फायनलमध्ये भारताचा सामना होता बांगलादेशशी. सध्याची टीम वेगळी असली, तरी फायनल गमावल्याची जखम भळभळती होतीच. यश, राशीद पुन्हा एकदा संघात आल्यानं, साहजिकच संघाची ताकद वाढली होती. बांगलादेशला आरामात हरवत, भारतानं सेमीफायनल गाठली. आता होती, खरी अग्नीपरीक्षा.

कारण समोर होता, खडूस ऑस्ट्रेलियन्सचा संघ.

ऑस्ट्रेलियन टीमला हारताना बघण्यात एक वेगळंच समाधान असतं. त्यात हरवणारी टीम भारताची असली, की सोने पे सुहागा. पण ऑस्ट्रेलियाला हरवणं काय सोपं नसतं. त्यात पहिल्यांदा बॅटिंग असलेल्या भारताची अवस्था झाली होती, २ आऊट ३७ रन्स. क्रीझवर होती कॅप्टन यश धूल आणि शैक रशीद ही जोडी. ऑस्ट्रेलियन बॉलर्सला सळो की पळो करत या जोडीनं २०४ रन्सची पार्टनरशिप केली.

विराट कोहली आणि उन्मुक्त चंदनंतर, अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये सेंच्युरी मारणारा यश धूल हा तिसरा भारतीय कॅप्टन ठरला. त्यानं ११० रन्स मारले, तर वाईस कॅप्टन राशीदनं ९४ रन फोडले. एवढी हाणामारी झाली, तरी भारताची धावसंख्या ४९ ओव्हर्सनंतर २७० रन्सवर अडखळली होती. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये दिनेश बानानं ४ बॉलमध्ये २० रन्स मारले आणि २९० ची मॅजिक फिगर गाठली.

बॉलर्सनं ऑस्ट्रेलियाला फक्त १९४ रन्सवर रोखलं आणि भारतानं फायनलमध्ये धडक मारली. आता इंग्लंडचा बल्ल्या केला की, वेस्ट इंडिजमधून फक्त प्लेअर्सच नाही… तर कपही भारतात येणार हे फिक्स.

कोविड होऊन गेल्यावर पूर्णपणे बरं व्हायला भरपूर वेळ लागतो. कित्येकांना साधं आयुष्य जगण्यातही अडचणी येतात, तिथं दमसास लावून खेळणाऱ्या खेळाडूंना तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असेल. तरीही यश धूल, शैक राशिद आणि सगळ्याच खेळाडूंनी जिगरबाज खेळ केला आणि दुबळ्या युगांडापासून बलाढ्य ऑस्ट्रेलियापर्यंत सगळ्यांना पाणी पाजलंय.

आता इंग्लंडला हरवलं की कप मिळेल… जिगरबाज सुपरस्टार्स तर आपल्याला मिळालेच आहेत…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.