राहुल गांधींनी शहांवर आरोप लावल्याने संसदेत झालेला तंटा आता सोशल मीडियावर आलाय

नुकतंच १ फेब्रुवारीला संसदेत देशाचं अर्थसंकल्प सादर झालं. त्यानंतर आता संसदेचा कार्यकाळ सुरु झाला आहे. यामध्ये अर्थसंकल्पावर, त्यातील मुद्द्यावर चर्चा केली जात आहे. वेगवेगळ्या पक्षाचे नेते संसदेमध्ये अर्थसंकल्पाबद्दल आपली मतं मांडत तर आहेत मात्र संसदेचं नियमित कामकाजही चालू आहे. यातच काल २ फेब्रुवारीला संसदेत मोठा राडा झाला आहे.

हा राडा झाला आहे तो काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात.

आता अमित शहा आणि राहुल गांधी यांच्यामध्ये समोरासमोर वादावादी झाली नसली तरी संसदेत राहुल गांधींनी अमित शहांवर टीका केलीये आणि त्यामुळेच संसदेत आरोप-प्रत्यारोपांचं वादळ तयार झालंय.

हे सर्व झालं ते बुधवारी दोन फेब्रुवारीला राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाची चर्चा करताना. राहुल गांधी २०२२ च्या बजेटवर त्यांचं काय म्हणणं आहे हे लोकसभेत मांडत होते. त्यांनी नोकरी, अर्थव्यवस्था अशा अनेक मुद्द्यांवर मत मांडलं. मात्र यादरम्यान त्यांनी अमित शहांवर खूप मोठा आरोप लावला, ज्यामुळे संसदेत कल्ला झाला.

या आरोपाचा विषय म्हणजे मणिपूरचे नेता

राहुल गांधी म्हणाले, काही दिवसांपूर्वी मणिपूरचे काही राजकीय नेते त्यांना भेटायला आले होते. त्यांचं नाव मी घेणार नाही पण ते खूप नाराज होते. तेव्हा राहुल गांधींनी त्यांना विचारलं की, काय झालं? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा  खूप मोठा अपमान झाला आणि तोही गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून.

झालं असं की, मणिपूरचे नेता गृहमंत्र्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांना घराबाहेर चप्पल – बूट काढायला सांगितलं गेलं. त्यानुसार आम्ही चपला उतरवल्या आणि घरात गेलो पण बघतो तर काय, खुद्द अमित शहा त्यांच्यासमोर चप्पल घालून बसले होते. आता याचा अर्थ काय समजावा? गृहमंत्री त्यांच्या घरी चपला घालू शकतात पण मणिपूरचे नेते चपला घालू शकत नाही, असं का? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला.

यानंतर राहुल गांधींवर संसदेतील बीजेपीचे नेते खूप भडकले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यावर म्हणाले की, ही आपली धार्मिक परंपरा आहे आणि राहुल गांधींचं असं बोलणं म्हणजे धार्मिक परंपरांवर घाला घातल्यासारखं आहे.

पियुष गोयल बोलतच होते की राहुल गांधी परत बोलते झाले. ते म्हणाले की, गृहमंत्र्यांचा असं वागणं हे दाखवून देतं की, मी मोठा आहे आणि तुम्ही छोटे आहात. म्हणूनच त्यांनी चपला काढायला सांगितलं होतं.

त्यांच्या बोलण्यावर परत बीजेपी नेता प्रल्हाद जोशी यांनी बीजेपीची पास घेत सांगितलं, आम्ही सगळेच भेटायला जातो तेव्हा चपला बाहेरच काढतो. त्यामुळे राहुल गांधीचं बोलणं एकदम चुकीचं आहे.

असे आरोप आणि प्रत्यारोप चालूच राहीले परिणामी संसदेत हंगामा सुरू झाला. संसदेचं सत्र संपल्यावर हा हंगामा शांत होईल असं वाटलं मात्र आता संसदेत सुरू झालेला हा कल्ला सोशल मीडियावर आल्याचं दिसतं आहे आणि याची सुरुवात झाली आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांच्या ट्विटवरून.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी संसदेत राहुल गांधींनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. पण त्यांनीही ही प्रतिक्रिया देण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, राहुल गांधी, जे आसामचे नेता त्यांच्या समोर असताना कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालतात आणि नंतर तेच बिस्कीट त्या नेत्यांना खायला देतात, अशांनी राजनैतिक आचरणावर बोलू नये. हायकमांडची मानसिकता ही काँग्रेसची आहे आणि भारताच्या लोकांना हे चांगलंच माहिती आहे.

हिंमत बिस्वा यांचं ट्विट माध्यमांमध्ये आलं आहे म्हणजे आता यावर चर्चा होणारंच, ते व्हायरल होणारच. सोशल मीडियावर आता इतरही नेते बोलते होणार. शिवाय ज्यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहे ते अमित शहा यावर कधी बोलते होणार, याकडेही सगळ्यांच्या नजर आहेतच. तेव्हा कोणत्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतात आणि हे प्रकरण कुठपर्यंत लांबतंय हे येणाऱ्या दिवसांतच कळेल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.