‘बलुतं’ उपेक्षिलेल्या जगाचा प्रतिनायक !

‘हा दगड इमारतीच्या बांधकामातून निकामी केलेला’ हे ‘बलुतं’च्या आरंभी येणारं विधान बरंच बोलकं आहे, खूप काही सांगणारं आहे.

माणसासारखी मानसं या व्यवस्थेने दगडासारखी जायबंदी करून टाकली होती. पण दगड इमारतीच्या बांधकामात गिणल्या गेला नाही, हे एकाअर्थी बरेच झाले. नसता हा दगड व्यवस्थेच्या टाळक्यात कसा जाऊन लागला असता..?

तो उगारला गेल्यामुळे पिढ्यानपिढ्या शिवलेली वाचा, चोख्याची ओवी आणि नाम्याची शिवी एकाच सुरात मिसळून नव्या क्रांतीचे गीत गाऊ लागली. खरं तर बाजूला सारलेली ओबडधोबड दगडंच अस्तित्व युद्धाच्या लढाईत शस्त्र  म्हणून सज्ज होत असतात, हे अनेकवार सिद्ध झालेय. निर्णायक क्षणी अशीच दगडं व्यवस्थेच्या अंगावर निर्धास्तपणे उगारली जातात.

जो दगड दगडूच्या हातून ‘बलुतं’ने भिरकावला, तसाच दगड माझ्या पिढीतल्या नागराज मंजुळेने ‘फँड्री’तून उद्याच्या पिढीचा प्रतिनिधी असलेल्या जब्याच्या हातून भिरकावला. जो व्यवस्थेच्या वर्मावर जाऊन लागला. हा आहे ‘बलुतं’चा आजच्या पिढीशी असलेला वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक बांधिलकीचा अनुबंध.

‘बलुतं’पासून प्रेरणा घेऊन गेल्या चाळीस वर्षात तरुणांच्या अनेक पिढ्या तयार होत गेल्या. त्याच पिढ्यांमधले माझ्यासारखे अगणित बिनीचे शिलेदार उभे राहिलेत. गावगाड्यातल्या महारवाड्यापासून तांडे, पाडे, वाड्या, वस्त्या पालांपर्यंत युगानुयुगे तापत असलेली दगडं तडकू लागली. तडकून आपल्या अस्तित्वाला तीक्ष्ण धार लावून परजू लागली. त्याची असंख्य उदाहरणं देता येतील. तो प्रत्येकजण एक आत्मकथन बनूनच या जगडव्याळ पसाऱ्यात उभा आहे.

दया पवारने ‘दगडू मारुती पवार’ला सांगितलेली त्याच्या जगण्याच्या वाताहतीची कैफियत मी ऐन वीसीत असताना माझ्या हाती पडली आणि ही आर्तव्याकूळ कहाणी माझीच असल्याचा प्रत्येय मला आला. बहुधा परिघाबाहेरच्या प्रत्येकाचाच हा अनुभव असावा. परंतु या पहिल्या भेटीतच ‘बलुतं’मधला दगडू आणि माझं एक अनामिक असलेलं परंतु एकरूप झालेलं जैविक नातं तयार झालं. त्याला कारण म्हणजे दया पवारांचं जे एकाकीपण होतं, तोच जीवनानुभव दुर्दैवाने माझ्याही वाट्याला आलेला.

दगडू जसा महारवाड्यातला, तसा मी ही गावकुसाबाहेर अव्हेरलेला, शापित जगणे जगणारा. दगडूच्या बापाला जसे दारूचे व्यसन, तशीच माझ्याही बापाची गत. दगडू जसा दहावीत इंग्रजीत नापास झालेला, तसाच मी देखील बारावीला इंग्रजीत नापास झालेलो. दगडू जसा मामा आणि आईच्या धीराने शिकला, तसेच माझे झालेले. अशा एकूणच सामाजिक, कौटुंबिक अभावाच्या परिस्थितीतून वाटचाल करीत मी पदवी वर्गाला प्रवेश घेतला नि ‘बलुतं’ हाताशी आलं. त्यातून मीच मला भेटल्याचा प्रत्येय आला आणि ‘बलुतं’ने मला पुरतं आपलंसं करून घेतलं नि अस्वस्थ देखील.

पडेल ती कामं करून माझ्या जगण्याला रेटा देणाऱ्या माझ्या याडीला (आईला) मी दया पवारांची प्रसिद्ध ‘बाई मी धरण धरण बांधिते, माझं मरण मरण कांडीते’ ही कविता ऐकवली. ती जणू तिच्याच कष्टावर मी लिहिलीय, असं तिला वाटलं अन तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. त्याला आवरण्यासाठी मात्र मला मनाचा बांध घालता आला नाही. तेव्हाचपासून  मी बलुतं आणि दया पवार यांच्या जगण्याशी, लिहिण्याशी समरस होत गेलो. योगायोग असा की चाळीशीच्या उंबरठ्यावर मी कवितेतून व्यक्त केलेल्या माझ्या एकाकीपणाला, घुसमटीला दया पवार पुरस्काराने सन्मानित झालो,  ही माझ्यासाठी विलक्षण आनंदाची घटना होती.

आता समजतंय की ही कहाणी दया पवारांनी दगडूला सांगितलेली कहाणी नसून दगडूच्या माध्यमातून समाजाला सांगितलेली कारुण्यमय व्यथा आहे, जी फक्त दगडूचीच न राहता व्यवस्थेने टाकलेल्या अगणित दगडूंची महागाथा ठरून जाते. असे अनेकार्थाने थोरपण ‘बलुतं’ला लाभलेलं आहे.

हजारो वर्षांपासून छातीत उकळत्या लाव्हारसाला दया पवार नावाच्या ज्वालामुखीने वाट मोकळी करून दिली. ज्वालामुखीचा स्फोट व्हावा तसं ‘बलुतं’चं येणं सारस्वतांपासून समाजसंस्कृतीला खूप मोठा धक्का होता. पिढ्यानपिढ्या उपेक्षिलेल्या माणसांचं जगणं उजागर झालं. दारिद्र्यात, अज्ञानात, अंधश्रद्धेत, वासना विकारात, नाना प्रकारच्या घाणीत डबडबलेलं हे जग होतं, जे पहिल्यांदाच साहित्याचा विषय बनू पाहत होतं. ‘बलुतं’ हे रूढार्थाने मराठी भाषेतीलच नाही तर भारतीय साहित्यातील पहिलं दलित आत्मकथन मानलं जातं. ज्याने प्रतिनायक बनून नवी पाऊलवाट निर्माण केली, तो आज प्रशस्त क्रांती मार्ग म्हणून ओळखला जातोय.

भारतीय भाषांपासून इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आदी भाषांमधून जगभर जिथे जिथे ‘बलुतं’ पोहोचलं त्या सर्वांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. या पथदर्शक कलाकृतीने साहित्याला नवीन जाणीवा, नवा अनुभव, आशय, भाषा, शब्दकळा, लेखनरूप असं बरच काही दिलं, हे जितकं खरंय तितकच हे देखील खरंय की, ज्यांचं जगणं, ज्यांचं भोगणं, ज्यांची संस्कृती, ज्यांची भाषा इ. साहित्यबद्ध झालेली नव्हती त्या प्रदेशातील अनुभवविश्वाला ‘बलुतं’ने साहित्याचा रस्ता दाखवला.

आपल्या पद्धतीने, आपल्या भाषेत सर्व काही निर्भीडपणे सांगण्याचं बळ त्यांच्या मागून येणाऱ्या अनेक पिढ्यांना दिलं आणि दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या आत्मकथनांची जोरकस लाटच भारतीय साहित्यात येऊन धडकली. ही ‘बलुतं’ची दृश्य उपलब्धी म्हणता येईल.

काळाच्या पटलावर ‘बलुतं’ची चाळीशी साजरी करत असताना एक गोष्ट आपल्याला आवर्जून ध्यानात घ्यावी लागेल ती म्हणजे ‘बलुतं’ची व्याप्ती ही काही केवळ चाळीस वर्षे एवढी मर्यादित नाही, तर चाळीशीच्या उंबरठ्यावर दया पवारांनी लिहिलेल्या ‘बलुतं’चा कालमान हा चाळीस वर्षे मागे व चाळीस वर्षे पुढे असा शतकाच्या जवळ जाणारा आहे. म्हणजेच अवघ्या विसाव्या शतकातल्या भारतीय समाज-संस्कृतीला  व्यापून असलेला आहे.

दुसरी गोष्ट ‘बलुतं’ची चाळीशी हे काही सेलिब्रेशन नाही वा एका आंबेडकरी विचाराने प्रेरित होऊन गतिमान झालेल्या परिवर्तन चक्राचा केवळ आढावा किंवा स्मृती जागवण्याचा सोहळा देखील नाही, तर स्वातंत्र्याची सत्तरी उलटून गेलेल्या देशात दलित-वंचितांचा प्रतिनायक ठरलेल्या ‘बलुतं’ने काय दिलेय या समाजघटकांची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक स्थिती-गती काय आहे? आणि ती का आहे? याची चिंतनमीमांसा आहे, म्हणूनही ‘बलुतं’बद्दल बोललं पाहिजे.

जोपर्यंत व्यवस्थेनं लादलेलं पराकोटीचं दारिद्र्य आहे, तोपर्यंत ‘बलुतं’ नवनव्या अन्वयार्थाला जन्म देत राहील. आंबेडकरी विचार प्रेरणेनं महारांनी बलुती नाकारली खरी, पण आजही तशीच गुलामी रूप बदलून शोषण करतेय. वंचित-उपेक्षितांना मग तो गावातला असो वा शहरातला, त्याला आजही राजकीय शहाणपण आलेलं नाही. ते राजकीयदृष्ट्या जागरूक होत नाहीत, तोपर्यंत ‘बलुतं’ची आठवण आपल्याला होतच राहणार.

गुरं राखणे, शेण मूत काढणे, दवंडी देणे, मेलेलं जनावर ओढणे, सांगावा पोहचवणे अशी कामं आजही गावागावातून करवून घेतली जातात. गटार साफ करण्याचं, घाण-कचरा साफ करण्याचं काम दलितांनाच करावं लागतं. फरक एवढाच की त्यावेळी जाती-धर्माच्या उतरंडीने ती करवून घेतली आणि आज भाकरीच्या तुकड्याची लालच फेकून  करवून घेतली जातात. या निमित्ताने ‘पाणी कुठवर आलं ग बाई’ हेच बघायचं आहे.

सामाजिक पटलावर एका सुशिक्षित, संवेदनशील मनाच्या घुसमटीचे विदारक चित्र आणि सामाजिक प्रवाहातून अव्हेरलेली संस्कृती आजही भेदाच्या भिंती पोसून आहे. जिने दगडूला जे आकाश पोरके केले तसेच आजही लक्ष लक्ष दगडू आपलं आकाश शोधण्यासाठी तिष्ठत बसले आहेत, म्हणून ‘बलुतं’ची आठवण करणं गरजेचं आहे. ज्यातून पुन्हा एकदा जोखडाच्या बंदीखाण्याचे चिरे खिळखिळे करता येतील असे वाटते.

  • विरा राठोड 
1 Comment
  1. Prakash dalvi says

    बलुत अप्रतिम आहे अतिशय परखडपणे आपण विश्लेषण केले आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.