मराठवाड्यातल्या या गावात ना मंदीरावर भोंगा वाजतो ना मशिदीवर..

एक गाव. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातलं. उमरखेड तालुका. गावाचं नाव बारड. या गावात सगळ्या जाती-धर्माचे लोकं तुम्हाला सापडतील.  इथं १५-१६ हिंदू मंदिरे आहेत, बौद्ध विहार, जैन मंदिरे आणि मशिदी देखील आहेत. पण इथलं वातावरण अगदी शांत आहे. 

ना देवळांतून आरतीचा आवाज येतो, ना मशिदींमधून अजान ऐकू येते. इतकंच नाही तर लग्न आणि राजकीय मेळाव्यातही लाऊडस्पीकर वाजत नाहीत. 

कारण या गावात गेल्या ५ वर्षांपासून लाऊडस्पीकरवर बंदी आहे. 

हो..खरंच. विश्वास कसा बसणार कारण सद्या देशभरात या भोंग्यांचा वाद वरचे-वर वाढतच चाललाय. अनेक राज्यांमध्ये यावरून हिंसाचार उसळतोय. 

आधीच कोरोनाने सगळ्यांच्या घरातले बजेट कोलमडले, कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या. राजकारणी मात्र विनाकारण वाद निर्माण करून, वातावरण अस्थिर करून आपली राजकीय पोळी भाजून घेतायेत.

त्यांना काय फरक पडतो वाद कोणत्या टोकाला जातोय…त्या हिंसाचारात कित्येक बेरोजगार तरुण होरपळून निघतील. सामान्य जनता महागाईशी अजूनही तोंड देतेय..असो ये सब पॉलिटिक्स हैं भाई…

पण याच धार्मिक राजकारणापासून बारड गावाने स्वतःला ठरवूनच लांब ठेवलं आहे. बोलायला छान -छान वाटत असलं तरी हे तितकं सोपं काम नव्हतंच..

पण या गावाने हे करून दाखवलं पण कसं ?

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड गावाची जवळपास २० हजार लोकसंख्या असेल.  बारड ग्रामपंचायतीत गेल्या पाच वर्षांपासून लाऊडस्पीकर वाजत नाही. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात तत्कालीन सरपंच बाळासाहेब देशमुख यांचा मोठा हात आहे. 

बोल भिडूने बाळासाहेब देशमुख यांच्याशी संपर्क साधला, 

ते सांगतात की, “हा निर्णय घेण्यापुर्वी गावातल्या प्रत्येक मंदिरावर भोंगे होते. त्या ध्वनी प्रदूषणामुळे वयोवृद्ध मंडळींना त्रास होऊ लागला. जातीय तणाव निर्माण होऊ लागले. मग दूरदृष्टीचा विचार करून सर्वधर्मीय प्रमुखांना, धार्मिक गुरूंना एकत्र बोलवलं. त्यांच्याशी चर्चा केली कि भविष्यात पुढच्या पिढीला चुकीचा मार्ग दाखवण्याऐवजी काहीतरी निर्णय घेणं महत्वाचं आहे.  मग ग्रामसभा घेतली आणि एकमुखी निर्णय घेऊन भोंगाबंदी लावली गेली. आज जेंव्हा देशभरात भोंग्यांवरून वाद निर्माण झाला तेंव्हा सगळीकडे आमच्या गावाचं नाव निघतंय याचा आम्हाला अभिमान आहे. पण खंत अशी की, प्रशासनाने काय आमची दखल घेतली नाही. त्यांनी ती दखल घेऊन आमच्या गावच्या जनतेचा सन्मान करावा असं मत बाळासाहेब यांनी व्यक्त केलं.

तसेच त्यांनी महाराष्ट्रातील गावं, तांडे आणि शहरांनी आमच्या निर्णयाचा आदर्श घ्यावा. आणि आप-आपल्या गावात भोंगाबंदी करून शांततेचं वातावरण निर्माण करावा हेच भविष्यसाठी फायद्याचं आहे असंही ते सांगायला विसरले नाहीत.  

त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, 

या गावात बरेच धार्मिक स्थळं आहेत.  हिंदू मंदिरे, बौद्ध विहार, जैन मंदिरे आणि मशिदीवरच्या लाऊडस्पिकरवरच्या ध्वनिप्रदूषणाला गावकरी वैतागून गेले होते. लाऊडस्पीकरवरून गावात अनेक भांडणं व्हायची.. अखेर गावातल्या सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि सर्व धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर वाजवण्यास बंदी घालण्यात आली. 

मोठी गोष्ट म्हणजे, कुठलाही गाजावाजा न करता ही बंदी लागू करण्यात आली आहे. तेही लोकांच्या परस्पर संमतीने, एकमताने हा निर्णय घेण्यात आलेला.  तेंव्हापासून हि बंदी आजतागायत लागू आहे.

विशेष म्हणजे या गावातले जामा मशिदीचे मौलवी मोहम्मद रझा आणि गावचे सरपंच बाळासाहेब देशमुख माध्यमांना सांगतात की, गावकरी देखील या निर्णयावर खूश आहेत.

याच गावात जागृत देवस्थान शीतला माता मंदिर आहे. शीतला मातेच्या दर्शनासाठी इतर राज्यांमधूनही भाविक येत असतात. नांदेडच्या सीमेला लागून असलेल्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील भाविक देखील या गावात येत असतात. असं असतांनाही मंदिरात लाऊडस्पीकर नाही. मंदिरातील आरतीही अगदी कमी आवाजात केली जाते.

एवढेच नाही तर गावातले लग्न, धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मिरवणूका, गणेश विसर्जनामध्ये  लाऊडस्पीकरचा वापर केला जात नाही. इतकेच नव्हे तर कोणत्याही शैक्षणिक किंवा सामाजिक कार्यक्रमात लाऊडस्पीकरचा वापर केला जात नाही. असंही सांगितलं जातं की, एम्ब्युलन्स देखील आवाज न करता फिरते. 

बारड गावाचा हा निर्णय धार्मिक एकतेचे उदाहरण म्हणून पाहिलं जातंय. धार्मिक भांडणांमध्ये काही उरलं नाही हे ओळखून या गावाने, गावच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित केलं. समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न बारड गाव हे केळी, ऊस तसेच भाजीपाला आणि फुलांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गावात जवळपास प्रत्येक घरात फुलांची लागवड केली जाते. येथून निघणारी फुले नांदेडलाच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पुरविली जातात. 

आज देशभरात भोंग्यावरून लोकांमध्ये द्वेष पेरला जातोय…त्याचवेळेला या गावाने, गंगा –जमुनी तहजीबला बळ दिल्याचं म्हणलं जातंय. 

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.