निंबाळकर ब्रॅडमनच्या विश्वविक्रमापासून १० रन्स मागे होते, आणि अचानक..

जागतिक क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर करून ठेवलेले आहेत. ब्रॅडमन यांचं ९९.९४ हे ॲव्हरेज तर अजूनही क्रिकेटमधलं एक आश्चर्यच मानलं जातं.

असाच एक विक्रम ब्रॅडमन यांनी १९३० साली आपल्या नावावर जमा केला होता.

हा विक्रम होता फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक धावा फटकावण्याचा. 

३ जानेवारी १९३० रोजी सिडनी येथे खेळवल्या गेलेल्या सामन्यात न्यू साउथ वेल्सच्या संघाकडून खेळताना ब्रॅडमन यांनी आपल्या इनिंगमध्ये ४५२ रन्स काढल्या होत्या. हा त्यावेळी एक विश्वविक्रमच ठरला होता. 

ब्रॅडमन यांचा हा विश्वविक्रम मोडीत काढण्याची संधी एका भारतीय खेळाडूसमोर चालून आली होती.

ते खेळाडू होते मराठमोळे भाऊसाहेब निंबाळकर. 

साल होतं १९४८. पुण्यातलं पुना क्लबचं मैदान. 

महाराष्ट्र विरुद्ध काठीयावाड यांच्यातला ४ दिवसीय सामना. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी काठीयावाडचा संघ २३८ रन्सवर ऑल आउट झाला होता. पहिल्या दिवशीच १३२ रन्सवर १ विकेट पडल्यानंतर भाऊसाहेब निंबाळकर मैदानात आले होते. सोबतीला कमल भांडारकर होते. या जोडीने मिळून तिसऱ्या विकेटसाठी ४५५ रन्सची पार्टनरशिप केली होती. 

दुसऱ्या दिवसाच्या शेवटी २०५ रन्सची दमदार इनिंग खेळून भांडारकर आउट झाले. त्यानंतर आलेल्या शरद देवधर यांच्यात आणि निंबाळकर यांच्यात देखील तिसऱ्या विकेटसाठी २४२ रन्सची पार्टनरशिप झाली. तोपर्यंत भाऊसाहेब निंबाळकर यांनी आपलं चतुर्थशतक झळकवून झालं होतं. ९२ रन्सवर असताना देवधर आउट झाले आणि त्यानंतर लगेचच मोहन लाल देखील.

तिसऱ्या दिवसाच्या चहापाण्यापर्यंत महाराष्ट्राचा स्कोअर झाला होता ४ विकेट्स गमावून ८२६ रन्स आणि ४४३ रन्स बनवून भाऊसाहेब अजून मैदानावर नाबाद होते.

अजून सामन्यात चहापाण्यानंतरचं एक सेशन आणि पुढच्या संपूर्ण दिवसचा खेळ शिल्लक होता. 

भाऊसाहेब ब्रॅडमन यांचा विश्वविक्रम सहज मोडतील अशी शक्यता निर्माण झाली होती, पण झालं असं की सामन्यात चहापाण्याच्या ब्रेकवेळी काठीयावाडचे कॅप्टन महाराजा ठाकूर साहिब महाराष्ट्राचे कॅप्टन राजा गोखले यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की,

“एकतर तुमचा डाव घोषित करा, नाहीतर आम्ही चाललो मैदान सोडून” 

राजा गोखले यांनी तसेच मैदानातील अधिकाऱ्यांनी महाराजा ठाकूर साहिब यांना खूप विनंती केली की असं का करताय. भाऊसाहेब विश्वविक्रमाच्या १० रन्स दूर आहेत. त्यांना किमान २ ओव्हर तरी खेळू द्या. पण महाराजा ठाकूर साहिब यांनी कुणाचंच काहीच ऐकलं नाही आणि काठीयावाडचा संघ आपलं सामान पॅक करून ट्रेन पकडायला रेल्वे स्टेशनवर निघून गेला. 

क्रीडा पत्रकार माईक कॉवर्ड यांनी लिहिल्यानुसार अशीही एक थेअरी आहे की सर डॉन हे त्यावेळी अनेकांसाठी पूजनीय होते. त्यांचा विश्वविक्रम मोडला जाणं हे त्यांचा अनादर केल्यासारखं होईल असं अनेकांना वाटायचं आणि त्यामुळेच तशीच भवना असलेल्या काठियावाडच्या संघाने त्यावेळी ग्राउंड सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. 

भाऊसाहेब निंबाळकर यांनीच नंतर एकदा सांगितलं होतं की सर डॉन यांनी वायरलेसवरून काठीयावाडच्या संघाशी संपर्क साधून त्यांना सांगितलं होतं की ग्राउंड सोडून जाऊ नका. निंबाळकरांना खेळूद्यात. पण काठीयावाडच्या संघाने त्यांचही ऐकलं नाही आणि ते मैदान सोडून गेले ते परत आलेच नाहीत. 

भाऊसाहेबांची संधी नाकारली गेली आणि ब्रॅडमन यांचा विश्वविक्रम त्यांच्याच नावावरच राहिला. पण महान ब्रॅडमन यांनी मात्र भाऊसाहेबांची ही इनिंग त्यांच्या ४५२ रन्सच्या इनिंगपेक्षा उत्कृष्ट असल्याचं सांगितलं होतं. ही गोष्ट ब्रॅडमन हे फक्त क्रिकेटर म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणून देखील किती महान होते हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे. 

त्यानंतर जवळपास ११ वर्षांनी ८ जानेवारी १९५९ रोजी हनीफ मोहोम्मद यांनी कराचीच्या संघाकडून खेळताना ४९९ रन्सची इनिंग साकारली आणि ब्रॅडमन यांचा विश्वविक्रम मोडीत काढला. 

हनीफ मोहोम्मद यांचा विश्वविक्रम मोडीत निघायला पुढे ३५ वर्षांचा कालावधी जावा लागला. २ जून १९९४ रोजी वेस्ट इंडीजचा महान क्रिकेटर ब्रायन लारा याने वार्विकशायरच्या संघाकडून खेळताना बर्मिंगहॅमच्या मैदानात डरहॅमविरुद्धच्या सामन्यात नाबाद ५०१ रन्स काढून हा विश्वविक्रम आपल्या नावे केला. जो आजतागायत ब्रायन लाराच्याच नावे आहे. 

हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.