वेस्ट इंडीजचा रविंद्र भारतात आल्यावर ‘रॉबिन सिंग’ झाला…!

रॉबिन सिंग आठवतोय..?

आठवायलाच पाहिजे.

भारतीय क्रिकेटरसिकांनी रॉबिन सिंगला विसरू नये, एवढं योगदान तर रॉबिन सिंगने निश्चितच भारतीय क्रिकेटला दिलंय !

भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की भारताची मॅच  जिंकण्याची शेवटची ‘होप’ म्हणून रॉबिन सिंगकडे बघितलं जायचं. रन चेस करताना कमी बॉलमध्ये अधिक रन्स हवे असतील तर क्रिकेटरसिकांचं लक्ष हमखास रॉबिन सिंगवर असायचं. जोपर्यंत रॉबिन सिंग आहे तोपर्यंत मॅच  आपलाच हा विश्वास त्याच्या पीचवर असण्याने भारतीयांना मिळायचा.

रॉबिन सिंग ऑल राउंडर क्रिकेटर म्हणून अधिक लक्षात ठेवण्यासारखा खेळाडू. कपिल देवनंतर भारतीय क्रिकेटमधला सर्वोत्तम ऑल राउंडर खेळाडू असं त्याच्या बाबतीत म्हंटलं तर ते वावगं ठरत नाही.

robin singh

कुठल्याही ऑल राउंडर खेळाडूकडून एक माफक अपेक्षा अशी असते की बॉलिंग किंवा बॅटिंग या दोहोंपैकी एका डिपार्टमेंटमध्ये त्याचा परफॉर्मन्स दखल घेण्यायोग्य असावा. रॉबिनची बॅटिंग तर क्लास होतीच शिवाय जोडीला फिल्डिंग करताना वाचवलेले १५-२०  रन्स म्हणजे तर बोनस असायचा. रॉबिन ज्यावेळी भारतीय संघासाठी खेळत होता, त्याकाळातील भारतीय संघाच्या फिल्डिंगच्या दर्जाविषयी बरं बोलावं असं फार काही नाही. अशावेळी रॉबिन हा किमान या क्षेत्रात तरी भारतीय संघाला लागलेला जॅकपॉट होता.

रॉबिनच्या हातात बॉल असताना बॅट्समनने  रन चोरण्याचा विचार करणं म्हणजे देखील आत्महत्येला आमंत्रण देण्यासारखं होतं. त्याच्या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या फिल्डिंगची साक्ष हवी असेल तर २००० सालच्या चँम्पीअन्स ट्रॉफीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने पकडलेला रिकी पॉटिंगचा कॅच आठवा.

बॉलिंग देखील तो अतिशय किफायतशीर करायचा. त्याला फारशा विकेट्स मिळवता आल्या नसल्या तरी ४.७ हा त्याचा इकॉनॉमी रेट त्याच्या किफायतशीर बॉलिंगची साक्ष देण्यासाठी पुरेसा.

१४ सप्टेबर १९६३ रोजी वेस्ट इंडीजमधील त्रिनिनाद येथे जन्मलेल्या आणि तिथेच लहानचा मोठा झालेल्या रविंद्र रामनारायण सिंहच्या खेळात एक बिनधास्तपणा होता, ही बहुधा कॅरेबियन बेटांकडून त्याला मिळालेली देण असावी. त्याचं क्रिकेटिंग करिअर वेस्ट इंडीजमध्येच सुरु झालं. त्रिनिनादच्या सिनिअर संघाकडून तो दोन वन-डे सामने देखील खेळला होता.

वयाच्या १९ व्या वर्षी तो आताच्या चेन्नई आणि तत्कालीन मद्रासला आला. तिथेच त्याने आपलं अर्थशास्त्रातल्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि सोबतच तामिळनाडूकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. रविंद्र भारतीय वंशाचा असला तरी त्याचे कुटुंबीय साधारणतः १५० वर्षांपूर्वीपासून वेस्ट इंडीजमध्ये जाऊन स्थायिक झाले होते, त्या अर्थाने तो विदेशीच. त्यामुळेच भारताचं नागरिकत्व मिळवताना देखील त्याला मोठ्या अडचणींचा सामना करायला लागला.

१९८२ सालापासून तामिळनाडूसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या रवींद्रला १९८९ साली भारताचं नागरिकत्व मिळालं आणि भारतीय संघाच्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या दौऱ्यासाठी त्याची संघात निवड झाली.

robin s

भारतीय संघात आल्यानंतर रवींद्र ‘रॉबिन’ झाला. संघात निवड तर झाली पण या दौऱ्यात त्याला फक्त २ सामने खेळायला मिळाले ज्यात त्याची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं. एकदा संघातून वगळला गेल्यानंतर संघात पुनरागमन करायला त्याला किती वेळ लागावा. तर ऐकून धक्का बसेल पण हा पुनरागमनाचा कालावधी होता तब्बल ७ वर्षांचा. दरम्यानच्या काळात तो प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत होता.

प्रथमश्रेणी क्रिकेटमधील लक्षवेधक कामगिरीमुळेच १९९६ सालच्या टायटन कपसाठी त्याला भारतीय संघातून बोलावणं आलं. दुसरा  डेब्यूचं होता म्हणा की तो. त्यानंतर मात्र पुढची ५ वर्षे तो नियमितपणे भारतीय क्रिकेट संघासाठी खेळत राहिला आणि या काळात ऑल राउंडर खेळाडू म्हणून त्याने स्वतःचं भारतीय संघातील स्थान पक्कं केलं.

रॉबिनचं करिअर आठवताना २ मॅचमधला रॉबिन विसरायचं ठरवलं तरी विसरता येत नाही. पहिली म्हणजे १९९७ साली भारत, दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यादरम्यान खेळविण्यात आलेल्या सिरीजमधली झिम्बाब्वेविरुद्धची मॅच.

पर्ल येथील बोलंड पार्कच्या मैदानात खेळवल्या गेलेल्या या मॅचमध्ये पहिली बॅटिंग  करताना झिम्बाब्वेच्या संघाने २३६ रन्स काढले होते. २३६ रन्स चेस करताना भारतीय संघ धडपडत होता. अशावेळी आठव्या क्रमांकावर रॉबिन बॅटिंगसाठी आला त्यावेळी त्याच्या खात्यात फक्त मागच्या ७ मॅचमधले  ३४ रन्स जमा होते. हा रेकॉर्ड बघून कॉमेंटेटर तर असं देखील म्हणाला होता की,

“आपल्याला हे देखील माहित नाही की त्याला बॅटिंग करता येते किंवा नाही !”

अजय जडेजाच्या रुपात १७६ रन्सवर भारताची सातवी विकेट पडल्यानंतर तर जवळपास सगळ्यांनी मॅच सोडलाच होता. पण त्यानंतर रॉबिनने खेळाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने आधी अनिल कुंबळे (४) सोबत नवव्या विकेटसाठी २४ रन्सची, सलील अंकोला (९) सोबत दहाव्या विकेटसाठी २५ रन्सची पार्टनरशिप साकारताना मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि भारताच्या हातातून गेलेल्या मॅचमध्ये टीमला विजयासमीप आणून ठेवलं होतं.

सलील अंकोलाच्या रुपात भारताचा नववा विकेट पडला त्यावेळी भारताचा स्कोअर होता ४९.२ ओवर्समध्ये २२९. म्हणजेच संघाला विजयासाठी ४ बॉल्समध्ये ८ रन्स हव्या होत्या आणि अकराव्या क्रमांकावरील व्यंकटेश प्रसाद ग्राउंडवर आला होता.

अर्थात मॅच संपवायची जबाबदारी रॉबिनची होती आणि ती तो व्यवस्थित पार देखील पाडणार होता, पण…

नंतरच्या २ बॉल्सवर २ सिंगल घेतले गेले. आता समीकरण असतं २ बॉल्स ६ रन्स. स्ट्राईकवर असतो रॉबिन सिंग. एडो ब्रांडच्या पाचव्या बॉलवर रॉबिन खणखणीत फोर वसूल करतो आणि मॅच अगदी भारताच्या पारड्यात आणून ठेवतो. आता समीकरण असतं  १ बॉल २ रन्स. स्ट्राईकवरील रॉबिनसाठी अर्थातच ते  फार अवघड नव्हतं.

एडो ब्रांड मॅचचा आणि आपल्या ओव्हरचा देखील शेवटचा बॉल फेकतो. तो डावखुऱ्या रॉबिनच्या लेगस्टंपच्याही बाहेर पडलेला तो बॉल अंपायरने वाइड दिलेला असतो पण मॅच अनिर्णीत ठेवण्यासाठी सिंगल घेता यावा म्हणून नॉन-स्ट्रायकर व्यंकटेश प्रसादने क्रीझ सोडलेलं असतं. सहाजिकच रॉबिन रन घेण्यासाठी धावतो आणि त्यातच तो रनआउट होतो.

पण असं असतानाही भारत हा मॅच गमावत नाही, कारण तेच की एडो ब्रांडचा शेवटचा बॉल वाइड असतो त्यामुळे एक एक्स्ट्रा रन भारताला मिळालेला असतो आणि स्कोअर लेव्हल झालेले असतात. मॅच अनिर्णीत अवस्थेत संपतो. ३१ बॉल्समध्ये ४८ रन्सची झुंझार इनिंग साकारणाऱ्या रॉबिनला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात येतं.

हा मॅच भारताने जिंकायला पाहिजे होता, असं कायम वाटत राहतं. पण व्यंकटेश प्रसादला देखील दोष द्यावा वाटत नाही. शेवटी तो देखील धावला होता, ते किमान पराभव तरी टाळता यावा यासाठीच.

रॉबिनच्या कारकीर्दीतील दुसरा एक मॅच ज्यासाठी त्याला कायम लक्षात ठेवलं पाहिजे ती म्हणजे १९९८ सालच्या इंडिपेंडंन्स कपची फायनल. हो तीच ती ऐतिहासिक फायनल, ज्यामध्ये भारताला जिंकण्यासाठी २ बॉल्समध्ये ३ रन्स हव्या असताना हृषीकेश कानिटकरने फोर मारला होता. तोच ऐतिहासिक फोर, ज्याने हृषीकेश कानिटकरला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर करून ठेवलंय.

या मॅचमध्ये देखील रॉबिन सिंगने कदाचित त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम इनिंग खेळली होती. कारण भारत ३१५ रन्स चेस करत होता आणि अशावेळी सचिन आउट झाल्यानंतर वन-डाउनवर प्रमोट करण्यात आलेल्या रॉबिनने गांगुलीच्या साथीत ८३ बॉल्समध्ये ८२ रन्सची इनिंग साकारत भारताच्या विजयाचा पाया रचला होता. पण गांगुलीचं शतक आणि हृषीकेश कानिटकरचा तो ऐतिहासिक फोर यांमुळे रॉबिनची ही इनिंग कायमच झाकोळली गेली.

रॉबिनच्या आकडेवारीवर जाऊ नकात, ती खोटं बोलत नसली तरी त्याच्याविषयी फार काही खरं देखील सांगत नाही. आकडेवारीवरून त्याचं योग्य मूल्यमापन कधीच होऊ शकत नाही. रॉबिन समजून घेताना नव्वदच्या दशकातलं भारतीय क्रिकेट समजून घेणं देखील तितकंच महत्वाचं, तरच आपल्याला रॉबिन आणि त्याचा खेळ समजू शकतो !

अजित बायस

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Pravin Kalantri says

    विश्वकरंडक 99 दादाची टाँटंन वरच्या 18अफलातूखेळीने नंतर राँबीन सिंग ने घेतलेले पाच बळी झाकोळून गेले होते हा उल्लेख राहीला लेखात.

Leave A Reply

Your email address will not be published.