दस का दम: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही वाईड बॉल न टाकणारे दहा बॉलर्स

याच आयपीएलमधली गोष्ट आहे. मॅच बघता बघता आम्ही पोरं फ्रेंडली पैजा लावत होतो. म्हणजे कसं टॉस कोण जिंकणार, ओपनिंगला कोण येणार? या बॉलला काय होणार? असं काय काय… मॅच होती सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स.

पहिलीच ओव्हर टाकायला आला भुवनेश्वर कुमार. पहिल्या बॉलला चार बसली, एकाचाही अंदाज बरोबर नाय आला. दुसऱ्या बॉलला दोन गाभडी फोर म्हणाली, बॉल पडला वाईड आणि डायरेक्ट बाऊंड्रीच्या बाहेर गेला. जे फोर म्हणाले होते त्यांचं गणित बरोबरही होतं आणि चुकीचं पण. त्या एका वाईड बॉलमुळं पोरांमध्ये लय राडा झाला. भुवीनं त्या ओव्हरमध्ये आणखी २ वाईड टाकले आणि आणखी दोनदा पोरांचा अंदाज चुकला.

आता क्रिकेटमध्ये एखादी ओव्हर खराब जायचीच, तशी भुवीची गेली. पण त्यावरुन आम्हाला प्रश्न पडला की, असा कोण धुरंधर असेल काय ज्यानं आपल्या करिअरमध्ये एकपण वाईड टाकला नसेल?

आम्ही शोधायला एक गेलो आणि आम्हाला भिडू सापडले दहा.

क्रमांक एक – सर रिचर्ड हॅडली

WhatsApp Image 2022 04 15 at 7.51.24 PM
Credits: Getty Images

न्यूझीलंडची तोफ. हॅडली लय बाप फास्ट बॉलर आणि तितकेच चांगले बॅट्समन. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ४०० विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड हॅडली यांच्या नावावर आहे. ८६ टेस्ट मॅचेस आणि ११५ वनडे मॅचेस खेळलेल्या हॅडलींनी ५८९ विकेट्स घेतल्या, पण कधीच वाईड बॉल टाकला नाय.

क्रमांक दोन – डेनिस लिली

WhatsApp Image 2022 04 15 at 7.55.27 PM
Source: Getty Images

लिली म्हणजे आपल्या पप्पांच्या जमान्यातला बुमराह. त्याचं योगदान फक्त भारी बॉलिंग करण्यापुरतंच नव्हतं, तर एमआरएफ पेस फाउंडेशनसोबत काम करताना त्यानं झहीर खान, ब्रेट ली, मॅकग्रा असे अनेक फास्ट बॉलर्स दगडातून मूर्ती घडवावे तसे घडवले. लिली इतका अचूक होता की त्यानं ३५८ विकेट्स काढल्या, पण वाईड बॉल तेवढा टाकला नाही.

क्रमांक तीन – क्लेरी ग्रिमेट

WhatsApp Image 2022 04 15 at 7.57.04 PM
Source: ICC

लिली यांच्याप्रमाणंच ग्रिमेटही ऑस्ट्रेलियाचेच क्रिकेटर, पण स्पिन बॉलर. १९२५ ते १९३६ या काळात खेळलेल्या ग्रिमेट यांनी ऑस्ट्रेलियासाठी ३७ टेस्ट खेळल्या, एवढ्याच टेस्ट मॅचेसमध्ये त्यांनी २१६ विकेट्स घेतल्या. १४ हजार पेक्षा जास्त बॉल टाकले, मात्र एकही लाईनपेक्षा जास्त बाहेर फिरला नाही आणि वाईड गेला नाही.

क्रमांक चार – बॉब विलिस

WhatsApp Image 2022 04 15 at 7.59.11 PM
Source: ICC

चिकनाचोपडा फास्ट बॉलर. विलिस इंग्लंडकडून १९७१ ते १९८४ अशी जवळपास १३ वर्ष खेळले. साडेसहा फूट उंचीच्या विलिस यांच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं. ९० टेस्ट आणि ६४ वनडे मॅचेस  खेळताना त्यांनी ४०५ विकेट्स घेतल्या. भारी भारी बॅट्समन्सचा नाद केला, पण वाईडचा नाही.

क्रमांक पाच – डेरेक अंडरवूड

WhatsApp Image 2022 04 15 at 8.00.27 PM
Credits: Getty Images

देश- इंग्लंड. बॉलिंग स्टाईल- लेफ्ट आर्म स्पिनर. मॅचेस- १०२. विकेट्स- ३२९. ‘वाईडची संख्या- ०.’ अंडरवूड इतके खतरनाक होते, की त्यांचं टोपणनाव होतं… डेडली!

क्रमांक सहा –  फ्रेड ट्रुमन

WhatsApp Image 2022 04 15 at 8.01.55 PM
Source: ICC

टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदा तीनशे विकेट्स घेणारे ट्रुमन इंग्लंडचे. शिस्तशीर इंग्लिश क्रिकेटमध्ये काहीसे आगाऊ आणि बंडखोर क्रिकेटर म्हणून ट्रुमन ओळखले जायचे. मैदानाबाहेर त्यांनी लई किस्से केले, पण बॉलिंग करताना मात्र त्यांची शिस्त ढेपाळली नाही, कारण त्यांच्या नावापुढं ६७ टेस्ट खेळूनही वाईडची नोंद काय झाली नाही.

क्रमांक सात – इयान बोथम

WhatsApp Image 2022 04 15 at 8.03.41 PM
Credits: Getty Images

या लिस्टमधला चौथा इंग्लंडचा क्रिकेटर. बॅटिंग, बॉलिंग आणि स्टाईल या तिन्ही डिपार्टमेंटचा बादशहा. बोथमनं वनडे आणि टेस्ट दोन्ही फॉरमॅट्समध्ये शंभर पेक्षा जास्त मॅचेस खेळल्या, ४०० हून अधिक विकेट्स घेतल्या… पण वाईड बॉल काय तेवढा टाकला नाही.

क्रमांक आठ – लान्स गिब्स

WhatsApp Image 2022 04 15 at 8.07.30 PM
Credits: images.squarespace

आफ्रिकेचा हर्षेल होता, हा वेस्ट इंडिजचा. विंडीजच्या फास्ट बॉलर्सच्या भाऊगर्दीत गिब्स हा वांड स्पिनर. त्याच्या लांब बोटांनी तो बॉल पद्धतशीर फिरवायचा. गिब्सच्या बॉलिंगला इतकी शिस्त होती, की त्यानं आपल्या करिअरमध्ये ना कधी वाईड बॉल टाकला आणि ना कधी नो बॉल.

क्रमांक नऊ – सर गारफिल्ड सोबर्स 

WhatsApp Image 2022 04 15 at 8.09.04 PM
Source: Sportskeeda

वेस्ट इंडिजचे कॅप्टन आणि लय मोठ्या मनाचे क्रिकेटर. सोबर्स एकूण ९३ टेस्ट आणि एक वनडे खेळले, त्यांनी २१ हजार ६६२ बॉल टाकले, पण त्यातला एकही वाईड नव्हता.

क्रमांक दहा – इम्रान खान

WhatsApp Image 2022 04 15 at 8.10.31 PM
Source: Pintrest

राजकारणाच्या फिल्डवर लई वाईड आणि नो बॉल पडले असले, तरी क्रिकेटच्या फिल्डवर मात्र इम्राननं २६ हजार ११९ पैकी एकही बॉल वाईड टाकला नाय. पॉलिटिकल ग्राऊंडवर त्याची विकेट पडली असली, तरी क्रिकेटमध्ये त्यानं ५४४ विकेट्स काढल्यात.. तेही वाईड बॉल न टाकता.

दहा नावं वाचून तुम्हाला भारी वाटलं असेल आणि एकही भारतीय कार्यकर्ता नाय म्हणून वाईटही वाटलं असेल. आता शूजच्या लेस बांधून आपण तर पिचवर धावू शकत नाय. पण आशा नक्कीच करू शकतो… की एक मसीहा येईल भारताचं नाव या लिस्टमध्ये आणेल. कधी तेवढं बघावं लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.