ब्रिटननं आपली चूल वेगळी मांडली, पण नुकसान आपल्या गोवेकरांचं झालंय!
गोव्याच्या किनाऱ्यावर निवांत बिअर ढोसत बसलेल्या गोवेकराला सातासमुद्रापार युरोपातल्या चुली वेगळ्या झाल्यान टेन्शन आलंय. त्याच असं झालय कि, १ जानेवारी २०२१ पासून ब्रिटन युरोपियन संघाबाहेर पडला. या ब्रेग्झिटमूळ गोवन लोकांच टेन्शन वाढलंय.
बघायला गेलं तर गोव्याचा आणि ब्रिटनचा तसा दूरदूर पर्यंत काडीमात्र संबंध नाही. ब्रिटिशांनी तर गोव्यावर राज्य पण केलं नाही. पण या ब्रेग्झिटमूळ गोवन लोकांना ब्रिटन मध्ये मागच्या दारानं जो संसार थाटता यायचा तो येणार नाही.
आता विषय नक्की काय आहे, हे बघायला थोडं गोव्याच्या किनाऱ्यावर जाऊन येऊ..
सन १५०५ ते १९६१ पर्यंत पोर्तुगीजांनी भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांवर राज्य केल. यात गोवा, दीवदमण, दादरा नगर हवेली या भागांचा समावेश होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही हे प्रदेश पोर्तुगीजांच्याच ताब्यात होते.
भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर हे भाग स्वतंत्र होऊन प्रजासत्ताक भारताचा भाग बनले. विशेष म्हणजे गोवा भारताचा भाग बनूनही, आजही पोर्तुगाली सरकार १९६१ पूर्वी इथं राहणाऱ्या सर्व लोकांना आणि त्यांच्या वंशजांना आपले नागरिक मानतो.
आता तुम्ही जर पोर्तुगालच्या ताब्यात असलेल्या भारतीय प्रदेशात फिरत असाल आणि १९६१ पूर्वीच्या एखाद्या रहिवाशाला भेटलात तर १०० टक्के तो व्यक्ती पोर्तुगाली नागरिक असणार. (आता हे आपल्याला माहित आहे, त्याला माहीत असेलच याची काय गॅरेंटी नाही.)
पोर्तुगाली नागरिकत्व हा गोव्यासाठी राजकीयदृष्ट्या संवेदनशील मुद्दा आहे.
यातला पहिला पेच म्हणजे भारतीय राज्यघटनेने दुहेरी नागरिकत्वाला बेकायदेशीर ठरवल आहे. यामुळे पोर्तुगीज पासपोर्ट हव्या असलेल्या लोकांना भारतात मतदान करणे, निवडणुका लढविणे आणि जमीन खरेदी करणे यासारख्या नागरी अधिकारांपासून वंचित रहावे लागते.
निवडणूक आयोगाने २०१३ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २००८ ते २०१३ दरम्यान ११,५०० लोकांनी त्यांचे भारतीय पासपोर्ट सरेंडर केले होते. (म्हणजे पोर्तुगालच नागरिकत्व घेतलं आहे.) परंतु गोवन लोकांना पोर्तुगाली पासपोर्ट मिळविण्यात मदत करणाऱ्या एजंटांच्या दाव्यानुसार १९८६ पासून (ज्यावेळी पोर्तुगाल युरोपियन युनियनचे सदस्य बनले) आतापर्यंत गोव्यातील जवळपास तीन ते चार लाख नागरिकांनी पोर्तुगालचे नागरिकत्व घेतले आहे.
या गोवन लोकांना पोर्तुगालला का जायचंय?
आपण यासाठी गोव्याची आर्थिक बाजू समजून घेतली पाहिजे.
गेल्या अनेक दशकांपासून गोव्यातील पोर्तुगाली वंशज युरोपियन देशांमध्ये स्थायिक वा नोकरी करण्यासाठी मार्ग शोधत आहेत. भारतमध्ये आणि त्यातल्या त्यात गोव्यात पर्यटन सोडून नोकरीच्या संधी खूपच कमी आहेत. पोर्तुगाल मध्ये अशा काय रस्तोरस्ती नोकऱ्या वाटत सुटलेत अशातली पण गोष्ट नाही. पण विषय असा आहे कि, पोर्तुगाल युरोपियन युनियनचा सदस्य असल्यामुळे, पोर्तुगाली नागरिकांना युरोपच्या कोणत्याही देशात स्थायिक होऊन नोकरी करता येते.
आणि याचाच फायदा आपल्या गोवन लोकांना घेता येतो. कुठं ही नोकरी, कुठं ही राहण, काहीपण खाणं, पिणं (पण फक्त युरोपातच हं)
आता तुम्ही म्हणाल की, यात ब्रिटननं ब्रेग्झिट केल्यानं गोव्याची लोक का उदास आहेत?
तर गोव्याची लोक पोर्तुगालला जरी गेली तरी त्यांची पहिली पसंती ही ब्रिटनला असते. कारण गोव्यातल्या लोकांना इंग्रजीच बोलता येत. युरोपातल्या फ्रान्स जर्मनीसारख्या इतर देशांमध्ये राहण्यासाठी, आपल्याला जर्मन किंवा फ्रेंच भाषा यावी लागते, जी गोव्यातील लोकांना येत नाही.
पण ब्रिटनलाच जाण्यामाग अजून एक कारण आहे आणि ते म्हणजे भारतीय उपखंडातील बरेच लोक ब्रिटन मध्ये स्थायिक आहेत. याखेरीज गोवन लोकांना सेवा क्षेत्रात काम करण्याचा चांगला अनुभव आहे. यूकेमध्ये हॉटेल्स आणि घरकाम सोडून म्हाताऱ्या लोकांना सांभाळण्याची काम सुद्धा मिळतात. आणि यासाठी फारसे शिक्षण घेण्याची गरज पण नसते.
ब्रेग्झिटमुळ काय होणार?
ब्रिटनने युरोपीय महासंघातून काढता पाय घेतल्यानं, युरोपातल्या इतर नागरिकांनी ब्रिटन मध्ये जी डायरेक्ट एंट्री होती ती आता बंद झाली. म्हणजेच पोर्तुगालला पण एंट्री नाही. मागोमाग पोर्तुगालच्या वंशजांना पण नाही. यामुळच गोवन नागरिक हताश झाले आहेत.
आता दुसऱ्या एखाद्या देशात जायचं म्हणलं तर त्यात ‘नकटीच्या लग्नात सतराशे साठ विघ्न’ या म्हणीप्रमाणे ब्रेग्झिटबरोबरच कोरोनाच्या साथीन गोव्यातल्या लोकांना हैराण केलंय. त्यात पूर्वीसारख पासपोर्ट किंवा व्हिसा मिळवण ही सोप्प राहिलेलं नाही.
पासपोर्ट अर्ज केलेले लोक दीड दोन वर्ष झाली वाटच बघत आहेत. आणि त्यात हे कमी होत कि काय म्हणून पोर्तुगीज राष्ट्रीय कायदा ३७/८१ नुसार पोर्तुगाली गोवन वंशजांना नागरिकत्व हे फक्त तिसर्या पिढी पर्यंतच मिळणार.
म्हणजे आज्जा, बाबा, आणि नातू.. आता तुम्हीच समजू शकता गोवन लोकांची फ्रस्ट्रेशन लेव्हल.. शेवटी काय तर जावे ‘गोवन पोर्तुगाल्यांच्या’ वंशा तेव्हां कळे !
हे ही वाच भिडू
- पोर्तुगीजांच्या गोव्यावर मराठ्यांच्या वर्चस्वाची साक्ष म्हणजे शांतादेवी मंदिर
- गोवा जिंकण्यासाठी दुपारची झोप हा महत्वाची ठरणार आहे
- पोर्तुगीजांना अख्ख्या भारतावर राज्य करण्याची संधी आली होती पण ते गोव्यातच का अडकले?