गोवा जिंकण्यासाठी दुपारची झोप हा महत्वाची ठरणार आहे…!

दुपारची झोप आणि १ ते ४ ची विश्रांती हा पुणेकरांचा आवडता विषय आहे. पण पुणेकर हे या बाबतीत कॉपीपेस्ट म्हणावे लागतील. कारण निवांतपणावर पहिला हक्क आहे तो गोवेकरांचा. म्हणजे आपल्या शेजारच्या गोव्याचा…!!

दुपारची झोप हे गोव्याच्या रक्तात मुरलेली गोष्टय. इथे या निवांतपणाला सुशेगाद अस गोंडस नाव देण्यात आलंय आणि याच सुशेगादमुळे गोव्याचं राजकारण बदलून जाण्याच्या तयारीत आहे.

तर प्रकरण असय की गोवा फॉरवर्ज पक्षाचे नेते आणि गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व सध्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी आपण सत्तेत आल्यानंतर दुपारचा एक तास वेळ विश्रांतीसाठी देणार आहोत अस आश्वासन दिल आहे… 

दुपारची ही एक तासाची विश्रांती कम्पलसरी असणार आहे. म्हणजे या वेळेत बार बंद, हॉटेल बंद, सरकारी कार्यालय बंद सर्वांनी कस निवांत एक तास सुशेगाद करायचं आणि फ्रेश होवून कामाला लागायचं.

आत्ता विषयच आवडीचा आहे म्हणल्यावर बोलभिडूने थेट विजय सरदेसाई यांच्यासोबत संपर्क साधला. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, 

“सुशेगाद हा शब्द पोर्तुगीज शब्द सोसेगादो या शब्दावरून आला आहे. गोव्यासाठी याचा अर्थ निवांत, काळजीमुक्त आणि चिल आऊट ऍटीट्युड असा आहे. सोसेगादो म्हणजे शांती आणि दुपारची झोपसुद्धा या शब्दातच अभिप्रेत आहे. हे वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित झाले आहे की दुपारी डुलकी ही आरोग्यसाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, तुमचा मूड सुधारण्यासाठी चांगली आहे, त्यामुळे जर अशा थोड्या वेळेच्या झोपेमुळे पुढील काम वेगवान होणार असेल तर आपण हा नियम नक्कीच करायला हवा”

सध्याही गोव्यात दुपारी १.३० ते ४.३० यावेळच्या वेळी बहुतेक दुकाने बंद असतात. यावेळी तुम्हाला कुणाची अपॉईंटमेंटही मिळत नाही. इतरत्र हा शब्द नकारात्मक अर्थाने घेतला जातो. याला आळशीपणा असे म्हणले जाते.

पण सरदेसाई यांना ते मान्य नाही ते म्हणतात की,

“गोव्यातील लोकांना रॅट रेस हा प्रकार मान्य नाही. गोवन लोक निवांत असले तरी तुम्ही त्याला आळशीपणाचे लेबल लावू शकता नाही. आम्ही सुशेगाद असलो तरी सर्व कामे वेळेवर पूर्ण करतो. हा सुशेगादपणा गोव्याच्या संस्कृतीचाच एक भाग असून आमची ओळख आहे आणि  इतरांनी त्याचा आदर केला पाहिजे. सुशेगाद असलो तरी निष्क्रिय नक्कीच नाही”

विजय सरदेसाई यांनी नेहमीच गोव्यातील फेणी, येथील काजू, आंबा तसेच इथल्या मातीतील प्रत्येक गोष्टीची ओळख जपण्यासाठीचा आग्रह धरला आहे. त्यांच्या तत्वांना मानणारा आणि फॉलो करणारा मोठा युवा समर्थक गोव्यात आहेत. या निवडणुकीमध्ये आम्ही बाजू मारणारच असा विश्वास त्यांनी दाखविला आहे आणि सुशेगादचा मुद्दा हिट झालाच तर गोव्याचं राजकारण ढवळून निघू शकतं हे नक्की…

बाकी बॉसची नजर चुकवून, कोपऱ्यात उभे राहून आणि केवळ ५ मिनिटांची डुलकी काढण्यासाठी निमित्त काढण्यासाठी कारणे शोधणाऱ्या जनतेला येणाऱ्या ताणाचा विचार करीत इतका मोठा निर्णय घेण्याचे धाडस एखादा नेता दाखवू शकतो, हि बाबच अतिशय अभिमानस्पद आहे हे मात्र खरं बरका..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.