पाकिस्तानचं येड पळवणाऱ्या मॅथ्यू वेडनं कॅन्सर आणि रंगआंधळेपणाला पण हरवलंय भिडू

कुठल्याही भारतीय क्रिकेट चाहत्याला त्याच्या सध्याच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारलं, तर विराट कोहली, रोहित शर्मा, बुमराह ही नावं नंतर येतील. सगळ्यात आधी नाव येईल मॅथ्यू वेडचं. तुम्ही कुठल्याही चौकात जा किंवा कुठल्याही सोशल मीडिया ग्रुपवर क्रिकेट आवडणाऱ्या प्रत्येकाचा सध्या एकच हिरो आहे, तो म्हणजे मॅथ्यू वेड.

आता हा खडूस टीम असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा प्लेअर. तरीपण भारतीय कार्यकर्त्यांना तो एवढा का आवडतोय? कारण लय सिंपल आहे. या बादशहानं सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा बाजार उठवला आणि त्यांना हरवलं.

आणि कसंय, ना इश्क में है, ना प्यार में है, वो मजा पाकिस्तान की हार में है. 

वेडनं सलग तीन सिक्स हाणत पाकिस्तानचा बल्ल्या केला आणि भारतात फटाके फुटू लागले. वेड रात्रीत सुपरस्टार झाला. कदाचित फक्त रिस्पेक्ट म्हणून त्याला आयपीएलचं कॉन्ट्रॅक्ट मिळंल, भारतात एखादं घर वैगरे पण किरकोळीत. हे सगळं वेडनं एका रात्रीत कमावलं असलं, तरी त्यामागं लई मोठा स्ट्रगलय.

आपल्या हिरोचा स्ट्रगल आपल्याला माहिती पाहिजेच ना.

तुम्हाला सांगून खोटं वाटेल, पण मॅथ्यू वेडनं कॅन्सरला हरवलंय. आपल्याला कॅन्सर झालाय हे त्याला कसं कळलंय, याचाही एक किस्सा आहे. वयाच्या १६ व्या वर्षी फुटबॉल खेळताना त्याच्या अंडाशयांना बॉल लागला. किरकोळ लागलं असंल म्हणत त्यानं विषय सोडून दिला खरा. पण काही दिवसांनी दुखणं चांगलंच वाढलं. टेस्ट केल्यावर कळलं की भावाला अंडाशयांचा कॅन्सर झालाय.

त्याच्यावर दोन केमोथेरपी झाल्या. असं वाटलं आता हा कधीच खेळाच्या मैदानावर दिसणार नाही. त्यानंही आशा सोडलीच होती आणि प्लम्बिंगचं कामही शिकायला घेतलं. पण क्रिकेटच्या धगीनं त्याला कधी शांत बसू दिलं नाही आणि गडी मैदानावर उतरलाच.

बऱ्याच लोकांना टेस्ट क्रिकेट बघण्यापेक्षा जास्त मजा टी२० किंवा वनडे बघायला येते. यामागचं एक कारण आहे ते म्हणजे रंग. टेस्टमध्ये कसं सगळ्यांचेच कपडे पांढरे. त्यामुळं थोडं एकसुरी वाटतं. पण व्हाईट बॉलवर सगळं कसं ‘झगा मगा, आम्हाला बघा.’

थोडक्यात क्रिकेटच काय आयुष्यातही रंग लई महत्त्वाचे असतात. मॅथ्यू वेड मात्र रंगआंधळा आहे. म्हणजेच त्याला रंगच दिसत नाहीत. आता अशा वेळी बॅटिंग करणं तरी जमून जाईल, पण समोरचे रंग दिसत नसताना विकेटकिपींग करणं म्हणजे कपाळाला घाम शेठ. वेडनं मात्र, ते सुद्धा जमवलं. फक्त व्हाईट आणि रेड बॉलवरच नाही, तर पिंक बॉलवरही तो लय बाप किपींग करू शकतो.

पिंक बॉलच्या मॅचेस होतात लायटिंगमध्ये. साहजिकच बॉल जास्त चमकणार. बॉल धरणं तुम्हाला, आम्हाला शक्य व्हायचं नाय. पण मॅथ्यू वेडची गोष्टच वेगळी आहे.

क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, इथं टीमच्या गरजेनुसार तुम्हाला खेळावं लागतं. आता वेडचंच बघा- भारताविरुद्धच्या सिरीजमध्ये त्याला सांगितलं ओपनिंग कर- त्यानं केली. टेस्ट मॅचेसमध्ये बुमराह आणि कंपनीसमोर बाजार उठणार हे माहित असून तो वरच्या नंबरवर खेळायला आला. ऑस्ट्रेलियाची टीम बांगलादेशला गेली तेव्हा मेन प्लेअर्सपैकी बरेच जण नव्हते. वेडला सांगितलं भाऊ तू कॅप्टनशिप कर – भाऊनं केली.

यंदाच्या वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाची टीम जाहीर झाली, तेव्हा लय लोकांना प्रश्न पडलेला की मॅथ्यू वेड टीममध्ये कशालाय? पाकिस्तान विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्यानं संदर्भासहित स्पष्टीकरण दिलंय.

भारताला हरवल्यानंतर, शाहीनशाह आफ्रिदी लय उडत होता. त्यालाच वेडनं सलग तीन सिक्स मारत जमिनीवर आणलंय.

त्यामुळं, प्रिय मॅथ्यूभाऊ वेड, Extra love for that, बरं का!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.