शाहीद आफ्रिदी झाला, आता भारतीयांच्या शिव्या खायला नवा आफ्रिदी आलाय
कितीही शिव्या घाला किंवा कितीही ट्रोलिंग करा, आफ्रिदी हे नाव वाचल्यावर थोडी का होईना फिक्स फाटत्या. शाहीद आफ्रिदीला काय लोकं उगाच शिव्या नाय देत. त्यानं लय वेळा भारताला सुट्टी दिलेली नाय. आता कुठं लालाची बॅटिंग, बॉलिंग, रिटायरमेंट, वय आणि भांडणं या सगळ्या गोष्टी गुमान विसरलो होतो.
तेवढ्यात दुसरा आफ्रिदी आला आणि त्यानं बाजार उठवला.
२०२१ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं आणि शाहीन शाह आफ्रिदी या नावानं कधी न विसरणाऱ्या नावांच्या यादीत स्पेशल एन्ट्री घेतल्या.
आता हा शाहीन शाह आफ्रिदी कोणाय?
याचा जर्सी नंबर पण आफ्रिदीसारखा १० नंबर. नाय नाय, हा शाहीद आफ्रिदीचा पोरगा नाय. मग काय नातेवाईक आहे का? तर हा. शाहीन हा लालाचा जावई. लालाच्या सगळ्यात मोठ्या मुलीचं लग्न शाहीनसोबत ठरलंय. शाहीनचा भाऊ रियाझ आफ्रिदीही पाकिस्तानकडून टेस्ट मॅच खेळलाय.
कसं असतं, क्रिकेटमध्ये हा याचा पोरगा, तो याचा जावई म्हणून कोण टीममध्ये टिकत नसत्या. इथं परफॉर्मन्स दाखव नायतर पाणी वाट असला नियम असतोय.
शाहीननं वर्ल्डकप मॅचमध्ये भारताच्या तीन मेन विकेट्स काढल्या. पहिल्या दोन ओव्हर्समध्ये रोहितशेठ आणि राहुलभाऊ. आणि १९ व्या ओव्हरमध्ये पन्नास मारून भारताचा किल्ला लढवणारे विराटजी. आता या परफॉर्मन्समुळं शाहीन स्टार झाला आणि कट्ट्यावर फुल चर्चा रंगू लागल्या.
आता शाहीनबद्दल थोडं सांगतो-
जरा जुन्या मॅचेस आठवा. वसीम अक्रम, मोहम्मद अमीर, वहाब रियाझ- तिघंपण लय ब्याकार बॉलर. या तिघांत आणि शाहीनमध्ये एक साम्य आहे, ही गॅंग लेफ्ट आर्म पेसर्सची. शाहीनचं सध्याचं वय आहे फक्त २१ वर्ष. वय खरंय का खोटंय माहीत नाय, पण चेहऱ्यावरून तरी वाटतं बाबा.
भाऊ रियाझनं शाहीन चार वर्षांचा असल्यापासून त्याला क्रिकेटचा लळा लावला. पाकिस्तानमध्ये फेमस असणाऱ्या टेप बॉल क्रिकेटमध्ये शाहीननं आपली ताकद दाखवली. पाकिस्ताननं अंडर-१६ टीममध्ये पण त्याला घेतलं. कैद ए आझम ट्रॉफी स्पर्धेत (तिकडंची लय मोठी स्पर्धा) खेळताना त्यानं पहिल्याच मॅचमध्ये ८ विकेट्स काढल्या आणि मार्केटमध्ये ‘नवा वसीम अक्रम आयेला है’ असं बोललं जाऊ लागलं.
सहा फूट सहा इंच अशी एक नंबर उंची, बॉल कानापासून गेला तर आवाजानं फाटंल असला स्पीड आणि टॅलेंट तर नादच नाही. तो वसीम अक्रम किंवा मोहम्मद अमीरसारखा स्विंगवर डिपेंड नाये. उंचीमुळं त्याच्याकडं चांगला बाऊन्सर आहे आणि टप्पाही.
आतापर्यंत त्यानं १९ टेस्टमध्ये ७६, २८ वनडेमध्ये ५३ आणि ३१ टी२० इंटरनॅशनलमध्ये ३५ विकेट्स घेतल्यात. वयाच्या २१ व्या वर्षीच त्याची बॉलिंग बघून लोकं म्हणतायत, हा इंटरनॅशनल क्रिकेटचा नवा सुपरस्टाराय.
सनाट पळत येऊन उंचपुरा शाहीन बॅट्समनचे स्टम्प उडवतो आणि मग आभाळाकडं बघून फ्लायिंग किस देत दोन्ही हात उंचावतो… बघून भारी वाटत्या आणि लाला आफ्रिदीची आठवण येत्या!
हे ही वाच भिडू:
- भारतानं क्रिकेटची मॅच जिंकली अन् कारगिलमध्ये जवानांना जोश चढला
- बालाजीचा धडाका एवढा होता की पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये त्याच्या नावाने गाणं गायलं जायचं
- व्यंकटेश प्रसादने एकही रन न देता पाकिस्तानचे ५ गडी बाद केले होते