दिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा हा होता

लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे ‘दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र्र माझा.’ होळकर शिंदेंच्या सेना उत्तरेच्या सुलतानांना धडकी भरवत होत्या, बाजीराव पेशवे नर्मदेपार बुंदेलखंड जिंकत होते, राघोबांनी अटकेपार झेंडा लावला, महादजी शिंदे हे अखंड देशाचा कारभार दिल्लीतून चालवत होते, त्यांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी सतलजापासून तुंगभद्रेपर्यंत मराठी साम्राज्याच्या सीमा भिडविल्या हा इतिहास आपल्याला बऱ्यापैकी माहित असतो.

पण दिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा तुम्हाला ठाऊक आहे काय ?

अंताजी माणकेश्वर गंधे

नगर जिल्ह्यातील कामरगाव हे एक छोटंसं गाव. त्यांचे वडील बंधू हरी माणकेश्वर हे तेथील वतनदार होते. अंताजी ५ वर्षांचे असताना त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. अगदी लहान वयात पोरक्या दुष्काळामुळे चुलते नसोपंत लिगोजींबरोबर तो उत्तर हिंदुस्तानात उदरनिर्वाहासाठी गेला. तिकडे शास्त्राचे व शस्त्राचे शिक्षण घेऊन तो तरबेज झाला.

शंभूपुत्र शाहू महाराज उत्तरेत औरंगजेबाच्या नजरकैदेत असताना अंताजी माणकेश्वर त्यांच्या संपर्कात आले. रामचंद्रपंत भट्टांनी थोरल्या छत्रपती शाहू महाराजांना या कर्तबगार तरुणाविषयी सांगितले.

१७-१८ व्या वर्षी अंताजी छत्रपतींच्या सेवेत दाखल झाले.

पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची कैदेतून सुटका झाली. त्यांनी महाराष्ट्रात परतून छत्रपतींच्या गादीवर आपला हक्क सांगितला. अनेक मराठा सरदार त्यांना येऊन मिळाले. सातारा येथे त्यांचा राज्याभिषेक झाला.

छत्रपतींची सातारा गादी स्थापन झाल्यावर त्यांनी अंताजी माणकेश्वर यांना आपल्या दरबारात ठेवून घेतले व त्याच्याकडे कुलकर्णीपद सोपवले. पुढे रोज व प्रत्येक मोहिमेवर निघाना अंताजी थोरल्या छत्रपतींच्या कपाळी गंध लावू लागला आणि छत्रपतींनी त्यांचे नामकरण “गंधे’ असे केले.

उत्तर हिंदुस्थानात  बालपण गेलेले असल्यामुळे अतांजींना तिथल्या राजकारणाची खडानखडा माहिती होती. कनौजी, फारसी या भाषांवर प्रभुत्व होतं. तलवारबाजीत निपुणता आणि शत्रूशी बोलण्यातून मात करण्याचे कसब या गुणांमुळे छत्रपतींनी पेशव्यांना हुकूम देऊन अंताजीची नेमणूक मराठ्यांचे दिल्ली दरबारातील मुत्सद्दी म्हणून केली.

एक दरबारी वकील, बातमीपत्रलेखक आणि तलवारबहाद्दर अशी  त्यांनी उत्तरेत बजावली.

१७२९ साली महंमदशाह बंगश मराठा साम्राज्यावर चालून आला. त्यावेळी बाजीराव पेशवे दाभाडेंच्या वादात  व्यस्त होते. बंगशा मल्हारराव होळकरांवर मंडलेश्वर येथे चालून गेला. मात्र, ते त्याला चुकवून मारवाडात जयपुरास निघून गेले. अखेर बंगश रोखण्याची जबाबदारी अंताजीवर आली.

या मोहिमेत अंताजींनी आपल्या सैन्यासह मोठा पराक्रम गाजवला होता. निकराची झुंज देऊनही त्यास पराभव पत्करावा लागला.

मात्र या लढाईनंतर अंताजींचे दिल्ली दरबारातील वजन प्रचंड वाढले. उत्तरेकडील राजकारणात शिंदे – होळकरांप्रमाणे सेनापती म्हणून अंताजीस मोठे महत्त्व प्राप्त झाले. १७५३  पेशव्यातर्फे बादशाहस मदत करून जाटांना पळता भुई केली. बादशाहने त्यांना इटावा व फुफुंद हे दोन परगणे बक्षीस म्हणून दिले. त्यांना सात हजार स्वारांची मनसब दिली.

पुढे जेव्हा दिल्लीवर अब्दालीचेअफगाणी वादळ लागलं तेव्हा बादशाहने मराठ्यांकडे संरक्षणाची याचना केली. पण दुर्दैवाने अंताजींचा अब्दालीने पराभव केला. अखेर त्यांच्या मदतीसाठी महाप्रचंड सेना घेऊन रघुनाथराव पेशवे उत्तरेत चालून आले. त्यांनी अटकेपार मराठ्यांचा झेंडा फडकवला. पेशावर जिंकले.

पुढे ते महाराष्ट्रात परतले निघताना त्यांनी दिल्लीच्या सुभ्याची जबाबदारी अंताजी माणकेश्वर यांच्या कडे सोपवली. असं म्हणतात की तेव्हा अंताजीनी अब्दाली पुन्हा भारतावर चालून येऊ शकतो याचे भाकीत वर्तवले होते पण राघोबा दादा पुण्याच्या राजकारणाच्या ओढीने महाराष्ट्रात परतले.

१७५४ ते १७५९ या काळात दिल्लीचा बादशहा आलमगीर दुसरा याला सतत आपल्या राज्याची चिंता वाटत होती. एका बाजूला अब्दालीच्या आक्रमणाचे भय होते, तर दुसऱ्या बाजूला अंतर्गत दगाफटक्‍याची टांगती तलवार त्याच्या डोक्‍यावर होती. त्याच स्थितीत त्याने मराठ्यांच्या नावे एक फर्मान पाठविले.

आलमगीर याकाळात  एवढा अगतिक झाला होता, की सरळ नामधारी बादशहा म्हणून राहून मराठ्यांच्या ताब्यात हिंदुस्थानची सत्ता सोपवण्याचीही त्याची तयारी झाली होती. यासाठीची आवाहने त्याने पेशव्याच्या दरबारात पाठवली होती. तेव्हा बादशाहच्या मदतीसाठी अंताजी माणकेश्वर यांची नेमणूक झाली.

अंताजी माणकेश्वर हे कठोर स्वामीभक्त होते. छत्रपतींच्या आदेशाशिवाय कोणालाही जुमानत नाही अशी त्यांची ख्याती होती. त्यांना तीन मुले होती. सखारामपंत बोकील हे त्यांचे व्याही होते. दिल्लीच्या दरबारात त्यांचे  प्रस्थ खुद्द नानासाहेब पेशव्याना देखील खुपू लागले. यातूनच हिंगे वकिलांचा आणि त्यांचा  चांगलाच रंगला.  यातूनच त्यांचे पंख कापण्यात आले. त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी पुण्याला परत बोलवण्यात आलं.

पुर्ण चौकशीअंती अंताजी माणकेश्वर निर्दोष आहेत हे सिद्ध झाले.

पुन्हा त्यांची नेमणूक दिल्लीला करण्यात आली. पण याच काळात अब्दाली पुन्हा भारतावर चालून आला. सदाशिवराव भाऊ पेशवे, होळकर शिंदे यांच्या सैन्यासोबत अंताजी माणकेश्वर देखील १४ जानेवारीच्या पानिपतच्या युद्धात सहभागी होते. या युद्धात मराठ्यांना सपाटून पराभव स्वीकारावा लागला.

पानिपतच्या पळापळीतून जीव वाचवून पळत असताना अंताजी माणकेश्वर, बाजी हरी आणि नाना  फितुरीचा फटका बसला आणि दिल्ली जवळच्या फरुखाबाद येथे ते मारले गेले.

आजही दिल्लीचे तख्त राखणारा पहिला मराठा योद्धा म्हणून अंताजीना ओळखले जाते. थोर इतिहास अभ्यासक सर जदुनाथ सरकार यांनी देखील एकेठिकाणी त्यांच्या पराक्रमाचा उल्लेख करून त्यांच्या राष्ट्रसेवेचे सतत समरण केले पाहिजे असा गौरव केलेला आहे.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.