क्रिकेटच्या मैदानावर घोडा असलेला युझवेंद्र चहल बुद्धीबळाच्या पटावर वजीर होता…

पहिलं लॉकडाऊन पडलेलं, क्रिकेटच्या लाईव्ह मॅचेस काय होत नव्हत्या पण तरीही क्रिकेटर्स दिसायचे. निम्मे हायलाईट्समध्ये आणि निम्मे इन्स्टाग्राम लाईव्हवर. आता या इन्स्टाग्राम लाईव्हवर दोन क्रिकेटर्स गप्पा हाणायचे, एकमेकांची मापं काढायचे, लोकांना लय भारी वाटायचं.

 हे लाईव्ह कुणाचंही असलं, तरी एक गडी मात्र यात कॉमन असायचा… तो म्हणजे युझवेंद्र चहल.

चहल काय करायचा? तर कुणाच्याही व्हिडीओखाली कमेंट करायचा. उगाच कुणाचीतरी खेचायचा. बरं हे काय कमी होतं, म्हणून स्वतःचे व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रामवर टाकायचा. चहलचा डान्स करतानाचा आणि महागुरुंचा आमची मुंबईचा व्हिडीओ पाहणं म्हणजे सहनशक्तीच्या पलीकडे होतं. त्यामुळं साहजिकच लोकं चहलला शिव्या घालू लागली.

पण या शिव्या घालतानाही लोकांच्या चेहऱ्यावर चहलमुळंच हसू आलेलं असायचं…

लॉकडाऊनचे दिवस जाऊन आता वर्ष उलटली, या वर्षांच्या कालावधीत पुलाखालून लय ओव्हर्स आणि लय रिल्स गेली. पण चहलनं काय आपलं मनोरंजन करणं थांबवलं नाही. आता मनोरंजन इन्स्टाग्रामवरही होतं, पण त्यापेक्षा चहलचा मोठा दंगा असतोय… ग्राऊंडवर.

पुलाखालून लय ओव्हर्स जात असताना, चहलच्या करिअरमध्ये दोन महत्त्वाचे टर्निंग पॉईंट्स आले. 

पहिलं म्हणजे टी२० वर्ल्डकपसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. दुसरं म्हणजे ज्या आरसीबीसाठी चहल हुकमाचं पान होता, त्या आरसीबीनं मेगा ऑक्शनसाठी पत्ते पिसताना चहलला मात्र बाहेर ठेवलं.

आता रम्मी लावायची वेळ चहलची होती.

भारताच्या श्रीलंका दौऱ्यात त्यानं भारी बॉलिंग टाकली, यंदाच्या आयपीएलमध्ये तर नाद केलाय. सनासना विकेट्स तर तो काढत होताच, पण त्यावर कळस चढला तो कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमुळं. बटलरच्या चोपाचोपीमुळं राजस्थान रॉयल्सनं २०० प्लस मारला होता, पण श्रेयस आणि व्यंकटेश अय्यर मॅच काढणार वाटत होतं.

पण चहलनं एका ओव्हरमध्ये हॅटट्रिक मारत दोन्ही अय्यरसकट चार विकेट खोलल्या आणि मॅच फिरली. चहलनं कोलकात्याचा बाजार उठवला आणि आपल्या स्टाईलमध्ये ग्राऊंडवर बसलाही. भाऊचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आणि भलेभले क्रिकेट पंडित चहलच्या कौतुकाचे पोवाडे गाऊ लागले.

WhatsApp Image 2022 04 19 at 2.27.47 PM
Credits: BCCI

बुद्धिबळाच्या पटावर सगळ्यात सायलेंट किलर कोण असतं, तर घोडा. आपण नजर ठेवत असतो, हत्ती, उंट आणि वजीरावर पण अडीच पावलं चालणारा घोडा अचानक येऊन कार्यक्रम करुन जातो. तसंच काहीसं चहलचं असतं.

बुद्धिबळ आणि चहलचं कनेक्शन जोडण्याचं कारण म्हणजे चहल भारताकडून फक्त क्रिकेटच नाही, तर बुद्धिबळही खेळलाय.

तुमचा विश्वास बसला नसेल, पण ही गोष्ट खरीय…

चहल ६ वर्षांचा असताना, त्याच्या वडिलांनी (जे स्वतः क्रिकेट कोच होते) त्याला चेस शिकायची गोडी लावली. सुरुवातीच्या वर्षातच भावानं ग्रीप पकडली आणि पहिल्याच धडाक्यात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मजल मारली. २००२ मध्ये भावानं अंडर-११ गटातली राष्ट्रीय स्पर्धा मारली. त्या दिवशी चहलचे पप्पा पहिल्यांदा, “पापा कहते है” गाणं म्हणाले असणार. त्याच्या पुढच्याच वर्षी अंडर-१२ गटाच्या इंटरनॅशनल स्पर्धेत त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं.

वयाच्या अकराव्या वर्षी पोरानं स्वतःचं, घरच्यांचं आणि देशाचं नाव काढलं.

चेसमध्ये प्रत्येकवेळी तो जिंकलाच असं झालं नाही. कधीकधी सपाटून हरला, पार आठव्या नंबरवर राहिला… पण खेळत राहिला. १९९७ ते २००३ हे सहा वर्ष चहलचं चेस करिअर फुल फॉर्ममध्ये होतं. त्याचं नाव प्रतिष्ठेच्या फिडे रँकिंगमध्ये आलं. विशेष म्हणजे एवढी वर्ष झाली, चहल चेस खेळत नाही, तरीही रॅकिंगमधलं त्याचं नाव अजूनही तसंच आहे.

एवढा भारी प्लेअर होता, मग चहलनं चेस खेळणं का थांबवलं..?

तर याच्यामागे दोन कारणं होती. चहलचं चेस करिअर सुरू ठेवायला मजबूत पैसा लागत होता, जो त्याच्या घरच्यांकडे नव्हता. दुसरं म्हणजे, चहलनं चेस खेळणंच एका अटीवर सुरू केलं होतं. ‘तुमच्या आनंदासाठी मी चेस खेळेल, पण माझ्या आनंदासाठी क्रिकेट खेळेल.’

चहलला क्रिकेट खेळण्यासाठी कारणच सापडलं होतं. साहजिकच पुढं त्यानं क्रिकेटची वाट धरली. मिडीयम पेसर म्हणून सुरुवात करत, लेग स्पिनमध्ये जादू शोधली आणि आता आपला छोटा रनअप, छोटी शरीरयष्टी आणि मोठी बुद्धी याच्या जोरावर दंगा घालायला सुरुवात केली.

फंड उभे करण्यासाठी चहल ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद सोबत चेस खेळला होता (सरप्राईजची अपेक्षा करू नका इथं गडी हरला होता). अधेमध्येही तो ऑनलाईन चेसमध्ये फ्रेंडली मॅचेस खेळताना दिसतोच. पण चेसमधले डावपेच आणि संयम ठेवण्याचं स्किल तो डेथ ओव्हर्समध्ये वापरतो आणि सहा बॉलमध्ये चार विकेट खोलात समोरच्याला चेकमेटही करतो.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.