आपल्याला ‘Deja-vu’ मोमेंट देणाऱ्या राहुल तेवातियाचं आयुष्य एका रात्रीत बदललं होतं…

शुक्रावरी रात्री घरी जायला जरासा उशीर झाला, पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स मॅच नुकतीच संपली होती. रस्त्यावर टीव्हीच्या दुकानाबाहेर उभं राहून मॅच बघायची प्रथा आता संपलीये. त्यामुळं घरात पाऊल ठेवल्यावर घरच्यांनी असं काही बघितलं, की शून्य मिनिटात अंदाज आला… मॅच बघितली नाही, त्यामुळं आपलं कायतर भारी बघायचं हुकलंय…

मोबाईलवर हायलाईट्स बघितल्या आणि डोकं बधिर झालं.

आता शुक्रवारी काय झालेलं, तर…

गुजरात विरुद्ध पंजाब मॅच होती. पंजाबनं १९० रन्सचं टार्गेट गुजरातला दिलं. तरण्याताठ्या शुभमन गिलनं पंजाबची बॉलिंग फोडून काढली, पण गिल आणि हार्दिक पंड्या २ रन्सच्या अंतरात आऊट झाले. सगळ्यांना वाटलं आता गुजरातचा कार्यक्रम गंडला. ५ बॉलमध्ये १८ रन्स हवे होते, स्ट्राईकवर आला राहुल तेवातिया. एक सिंगल, स्ट्राईकवर मिलर आणि मग फोर. तीन बॉल १३. चौथा बॉल डॉट गेलाच असता, पण बॉलर ओडियन स्मिथनं तेवातियाला रनआऊट करण्यासाठी केलेला थ्रो हुकला आणि एक रन निघाला.

२ बॉलमध्ये १२ रन्स हवे होते आणि तेवातिया स्ट्राईकवर.

पाचवा बॉल सिक्स… विजय एक पाऊल लांब होता आणि तेवातियानं सहाव्या बॉलवरही छकडा मारत गुजरात टायटन्सला मॅच जिंकवून दिली. 

गडी फक्त तीन बॉल खेळला आणि मॅचचा निकालच चेंज करुन टाकला.

ही मॅच बघताना अनेक जणांना ‘Deja-vu’ झाला. 

म्हणजे कसं, हे आपण याच्याआधीही बघितलंय असं वाटणं. तेवातियानं कुणालाच अपेक्षा नसताना सिक्स मारुन मॅच काढून देणं, हे आपण खरंच याआधीही अनुभवलंय. त्यावेळीही मॅच पंजाब विरुद्धच होती…

२०२० ची आयपीएल पंजाब विरुद्ध राजस्थान. 

पंजाबनं २२४ रन्सचं कुणालाही अशक्य वाटेल असं आव्हान राजस्थानला दिलं होतं. त्यात संजू सॅमसन आऊट झाल्यानंतर तर मॅच गेल्यातच जमा होती. तेवातिया क्रीझवर होता, पण त्याचा लेझीम डान्स सुरू होता… २३ बॉलमध्ये फक्त १७ रन्स. लोकं म्हणत होती, यानं स्वतःहून आऊट व्हावं.

पण अठराव्या ओव्हरमध्ये तेवातियानं शेल्डन कॉट्रेलला धुतला. इतका वाईट धुतला, की पाचवा बॉल मिस झाला नसता… तर तेवातिया आयपीएलमधला युवराज सिंग ठरला असता. त्याच्या पाच सिक्समुळं मॅच फिरली, पुढं आऊट होण्याआधी त्यानं शमीला पण एक सिक्स हाणला. रॉयल्सनं ती मॅच थाटात जिंकली, शारजाच्या मैदानावर इतिहास रचला गेला आणि राहुल तेवातिया हा सगळ्या क्रिकेट विश्वाचा हिरो ठरला.

शुक्रवारी पुन्हा त्यानं असाच कडक परफॉर्मन्स दिला, तोही पंजाबच्या विरुद्ध आणि दोन्ही वेळेस बॉलर वेस्ट इंडिजचेच. गोष्ट इथंच थांबत नाही, तर दोन्ही वेळेस एकदम लाईमलाईटमध्ये येऊनही तेवातिया मॅन ऑफ द मॅच काही ठरला नाही.

२०२० मधल्या त्या इनिंगनंतर मात्र तेवातियाचं आयुष्य बदलून गेलं होतं.

लोक त्याला ओळखू लागली, एक क्रिकेटर म्हणून त्याच्याबद्दल असणारी इज्जत वाढली. सोशल मीडियावर तर तेवातिया स्टार झाला. मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनं त्याच्यावर चांगली बोली लावली. त्याआधी भारतीय संघात खेळण्यासाठीही त्याची निवड झाली.

पण तेवातियाच्या बॅटिंगमधून काय खळबळजनक येत नव्हतं, त्यामुळं लोकं म्हणाली हा एका जत्रेचा देव ए… मात्र आता २०२२ मध्ये परत पंजाबचीच धुलाई करत तेवातियानं आपण काय क्वालिटीचे प्लेअर आहोत हे दाखवून दिलंच.

आता २०२० मधल्या त्या रात्रीनं तेवातियाला स्टार बनवलं असलं, तरी त्याआधीच्या तेवातियाचे दोन किस्से आपल्या माहिती पाहिजेच.

राजस्थानकडून खेळायच्या आधी तेवातिया दिल्लीकडून खेळायचा. त्यावेळी एकदा ड्रेसिंग रुममध्ये कोच रिकी पॉंटिंगनं तेवातियाचा लय घाण अपमान केला होता. ‘आपण चार कॅचेस घेतले,’ हे तेवातियानं मोठ्या अभिमानानं सांगितलं. पण पॉंटिंगनं त्याचा अपमान करत, त्याला हसण्यावारी घेतलं. तेवातिया बारकं तोंड करुन म्हणाला…

खुदके हक के लिए लढना पडता है भाई…

२०१८ ते २०२० या काळात तेवातिया ट्विटरवर अजिबात ऍक्टिव्ह नव्हता, त्याच्याआधी तो ट्विटरवर काय टाकायचा माहितीये? मोटिव्हेशनल कोट्स.

म्हणजे हेच बघा…

 

किंवा हे बघा…

 

आता तो हे कोट्स का टाकायचा, हे त्याचं त्यालाच माहिती. पण कोट्स टाकून न बदललेली दुनिया तेवातियानं २०२० मध्ये पाच आणि २०२२ मध्ये दोन सिक्स मारुन बदलली.

एक गोष्ट सिद्ध झाली, एकदा का तुमचं काम बोलायला लागलं की ओळख सांगण्यासाठी कुठल्याच कोट्सची गरज पडत नाही. 

कारण स्टेट्स किंग तेवातिया आता सिक्सर किंग बनलाय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.