RBI च्या गव्हर्नरांना न जुमानता जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष खंबीर राहिला अन् सांगली जिल्हा घडला

रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नरांनी एक नियम काढला होता. त्यांच म्हणणं होतं की, जिल्हा बॅंकानी कर्ज वाटावीत पण ती खाजगी कंपन्यांना. सहकारी कारखाने अन् त्यातही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वाटू नयेत. आजच्या सरकारी लालफितीच्या कारभारात गव्हर्नरांच्या या नियमाकडे बोट दाखवून सर्वांनीच सहकारी साखर कारखान्यांना कर्ज नाकारली असती.

पण एक माणूस या सर्वांहून वेगळा होता.

जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष असणाऱ्या या माणसाने थेट रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नरांच्या नियमाला कचऱ्याची टोपली दाखवली. “सहकार जगला तर शेतकरी जगेल” असा सहकाराचा पुरस्कार करणाऱ्यांचा तो काळ होता.

अशा काळात सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देण्यास त्यांनी सुरवात केली. त्यांच्यामुळे सांगलीचा तत्कालीन शेतकरी कारखाना, वारणा आणि वाळव्याचा कारखाना उभारण्यास मदत झाली.

या माणसाचं नाव म्हणजे सहकार-तपस्वी गुलाबराव पाटील…

गुलाबराव पाटील कोण होते?

ज्यांना हे नाव माहित नसेल त्यांनी इतकच समजून घ्यावं की त्यांच नाव महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून घोषित देखील झालं होतं. इंदिरा गांधींच्या पडत्या काळात जे लोक इंदिरा गांधींसोबत राहिले ते Loyalist of 78 म्हणून ओळखले जातात.

महाराष्ट्रात अशी फक्त चारच माणसं होती. प्रमिलाकाकी चव्हाण, नासिकराव तिरपुडे, बॅरिस्टर ए.आर. अंतुले आणि चौथे होते ते गुलाबराव पाटील.

गुलाबराव पाटील यांचा जन्म कर्नाटक सीमेवर असणाऱ्या बेनाडी गावाच. त्यांनी शाहू महाराजांच्या करवीर नगरीत शिक्षणाची कास धरून त्या काळात B.A. LLB चं शिक्षण पूर्ण केलं. सातारच्या न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली.

हा काळ भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा होता. याच काळात गुलाबरावांची ओळख यशवंतराव चव्हाणांशी झाली. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या पैलू पाडणाऱ्या माणसाने गुलाबरावांना अचुक ओळखले.

WhatsApp Image 2021 01 21 at 12.00.30 AM 1

पुढे गुलाबराव पाटील सांगलीत परतले. स्थानिक राजकारणात प्रवेश केला. सांगली नगरपालिकेत सदस्य आणि पुढे सांगलीचे नगराध्यक्ष झाले. गुलाबरावांनी सांगली शहरासाठी जे केल ते थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांची विकासकामांची दिशा पाहून त्यांना तात्काळ जिल्ह्याच्या प्लॅनिंग कमिटीच्या सेक्रेटरीपदावर निवडण्यात आले.

साठच्या दशकात त्यांना महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली ती सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची..

याच पदापासून सांगली जिल्ह्यात सहकाराची व अर्थव्यवस्थेची घडी बसू लागली. जिल्हा बॅंक काय असते व त्याचा कारभार कसा हाकायचा असतो हे सांगण्यासाठी आजही गुलाबरावांच्या पॅटर्नचे धडे सांगितले जातात.

उदाहरण घ्यायचंच झालं तर सांगली जिल्ह्यातील द्राक्षशेतीचं.

द्राक्षांसाठी कर्जपुरवठा करुन द्राक्षांच अधिकाधिक पीक घेण्यासाठी त्यांनी लोकांना प्रवृत्त केलं. त्यातून शेतकऱ्यांच्या हाती नगदी पैसा खेळू लागला. तत्कालीन रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नरांनी एक सक्युलर काढून सहकारी साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करण्यास प्रतिबंध केला होता. पण ऊस, साखर आणि सहकार यातूनच भविष्यात शेतकऱ्यांना चांगले दिवस येवू शकतात हा विचार करुन रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नरांच्या विरोधात जाण्याच धाडस या व्यक्तींनी दाखवलं. त्यातूनच सांगली, वारणा, कृष्णा या कारखान्यांचा पाया रचला जावू शकला.

१९७२-७३ सालच्या दुष्काळात वाढलेल्या थकबाकीचा अभ्यास करण्यासाठी दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. यात गुलाबराव पाटील यांचा सहभाग होता. या समितीमार्फतच शेतकऱ्यांनी फळांची शेती केली तर शेतकरी फायद्यात जातील हे गणित मांडण्यात आलं. अगदी सहज सांगायचं झालं तर कोकणाच्या आंब्या पासून ते नागपूरच्या संत्र्यांपर्यन्तचा व्यापक हित यामध्ये दडलेलं होतं.

यातूनच सांगली जिल्ह्यात द्राक्षशेतीचा प्रयोग यशस्वी झाला. आज सांगली जिल्हा द्राक्ष व ऊसात टॉपला पोहचला असेल तर त्यात गुलाबराव पाटील यांच्या वैचारिक धोरणांचा सर्वांधिक वाटा आहे हे समजून घ्याव लागेल..

१९६६ साली त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली होती. पुढचे बारा वर्ष ते राज्यसभेचे खासदार होते. १९८० सालात ते राज्याची शिखर बॅंक असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅकेचे चेअरमन होते. पुढे देशाच्या सहकारी संस्थेचे ते सेक्रेटरी देखील झाले.

मुख्यमंत्रीपदावर वर्णी लागली पण….

Loyalist of 78 अशी एक टर्म राजकारणाच्या इतिसात आहेत. जेव्हा जनता पक्षाचं वारं भारतभर होतं तेव्हा इंदिरा गांधींसोबत खूप कमी लोक होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने अगदी चारच लोक त्यांच्यासोबत होते. बॅरिस्टर ए.आर.अंतुले, प्रमिलाकाकी चव्हाण, नासिकराव तिरपुडे व गुलाबराव पाटील अशी ती चार नावे…

मात्र काही वर्षातच दिवस फिरले. इंदिरा गांधीनी पुन्हा आपलं नेतृत्व सिद्ध केलं. देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी सत्तेत आल्या. त्याकाळात गुलाबराव पाटलांना कॉंग्रेसचं प्रदेशाध्यक्ष देण्यात आलं.

WhatsApp Image 2021 01 21 at 12.00.33 AM

अंतुले मुख्यमंत्री तर गुलाबराव प्रदेशाध्यक्ष झाले. पुढे तथाकथित सिमेंट घोटाळ्याच प्रकरण समोर आलं आणि अंतुलेंना राजीनामा द्याला लागला. या प्रकरणानंतरही इंदिरा गांधींनी अंतुलेवर विश्वास टाकून तुम्हीच पुढचा मुख्यमंत्री कोण असावा असा सल्ला विचारला तेव्हा नाव आलं ते गुलाबराव पाटलांच…

गुलाबराव पाटील व अंतुले दोघेही दिल्लीला गेले.

महाराष्ट्र सदनमध्ये गुलाबरावांचा मुक्काम होता. अंतुले इंदिरा गांधींना भेटायला गेले. या बैठकीत गुलाबरावांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. अंतुले गुलाबरावांना भेटण्यासाठी महाराष्ट्र सदनात पोहचले ते हार घेवूनच. उद्या संध्याकाळपर्यन्त नव्या मंत्रीमंडळाची यादी द्यायची होती. दोघेही नरसिंहराव यांना भेटायला गेले.

नरसिंहराव यांनीही मॅडमची योग्य चॉईस म्हणून अनुमोदन दिलं…

गुलाबराव पाटील महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ही बातमी महाराष्ट्रात पोहचली आणि राजकारणाने जोर पकडला.

हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर आपल्या राजकारणाचा “श्रीगणेशा” होईल याचा सारासार विचार करुन मात्तबर नेत्यांनी विरोध करण्यास सुरवात केली. कोणीही चालेल पण गुलाबराव नकोत म्हणून राजकारण सुरू झालं आणि या कोणीहीच्या प्रकरणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ थेट बाबासाहेब भोसलेंच्या गळ्यात पडली…

तेच बाबासाहेब भोसले जे काही दिवसांपूर्वी आपणाला तुमच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावं म्हणून गुलाबराव पाटलांना भेटायला आले होते.

इतक्यावरच राजकारण न थांबता त्यांना राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली. Power must come with prestige,power without prestige is gun without bullet. या तत्वाला धरून ते म्हणाले, मला राज्यमंत्री पद दिलं तर भविष्यात कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या पदाचा मान राखला जाईल का? सारासार विचार करुन त्यांनी हे पद नाकारलं, पण कॉंग्रेस सोडली नाही..

अगदी त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांच्यापर्यन्त ही पंरपरा अखंड राहिली. वडिलांच्या नावाने असणारी अर्थात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट या संस्थेचा ते कारभार पाहतात.  शिक्षणाची कास धरून मुलांचा पाया विकसित करण्याचे काम चालू आहे. फॉर्मसी कॉलेज, होमिओपॅथी कॉलेज् आहेत.

WhatsApp Image 2021 01 21 at 12.00.30 AM

याशिवाय खुद्द पृथ्वीराज पाटील हे फॉर्मसी कॉलेजच्या संघटनेचे संस्थापक सचिव आहेत. आपल्या वडिलांनी जे तत्व निर्माण केलं ते तत्व जोपासत पुढे घेवून जाणारा हा माणूस.  विलासराव देशमुख म्हणायचे श्रद्धा औंर सबुरी हे कॉंग्रेसचं तत्व आहे. याच तत्वाला धरून गुलाबरावांची पुढची पिढी कार्यरत आहे.

१६ सप्टेंबर २०२० ते २०२१ या वर्षात त्यांच जन्मशताब्दी वर्ष साजरं केलं जात आहे. आज म्हणजेच २१ जानेवारी रोजी त्यांचा स्मृतीदिन…

अशा या ग्रेट नेत्याला स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.