अरे भिडू गेल्या चार-पाच महिन्यात अचानक “सायकलस्वार” का वाढलेत…?

लॉकडाऊनच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आम्ही ‘सायकलटूवर्क’ म्हणजेच दैनंदिन छोट्या अंतरावर येजा करण्यासाठी व कामासाठी ‘कोविड-१९ लॉकडाऊनमध्ये व लॉकडाऊननंतर सायकल या माध्यमाचा प्रभावी वापर यासाठी’ स्थानिक शासकीय तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांना आणि  केंद्रीय व्यवस्थेला खुलं पत्र लिहिलं.

या पत्राचा आशावाद हा होता की,

कोविड-१९ च्या  लॉकडाऊनमधून हळूहळू परिस्थिती पूर्वपदाकडे येत जाईल तेव्हा सायकल आपणा सर्वांना सुरक्षित, निरोगी राहण्यास नक्की मदत करेल.

भारतवर्षात पहिल्यांदाच केंद्रीय तसेच राज्यस्तरीय शासकीय नोटिफिकेशनमधून सायकलचा दैनंदिन व्यायामासाठी  प्रभावी साधन म्हणून वापर असा उल्लेख हा ऐतिहासिक नोंद म्हणून नमूद करावा लागेल.

दवाखाने हे रोग निदान आणि ते बरे करायला उपयोगी ठरतात.

“आपलं आरोग्य आपल्या हातात आहे आणि हे वेगवेगळ्या परिस्थितीवर अवलंबुन आहे”

हे कोविड-१९ आपल्याला शिकवत आहे. आपली आरोग्य यंत्रणा तिची व्याप्ती, परिसीमा आणि बरच काही यातून समोर येत आहे.

आधीपासून जागतिक आरोग्य निर्देशांकात आपल्या देशाचा नंबर भरपूर प्रयत्न करूनही कायम घसरलेलाच आहे का? वेगाने वाढणारी शहरं सदृढ आरोग्यासोबतच किमान नागरी सुविधा समाजातील सर्व थरांतील नागरिकांना पुरवठा करु शकतात का? हे येणा-या काळात पाहण्याजोगे आहे.

त्यात शहरातील सार्वजनिक वाहतूक, वैयक्तिक वापराची वाहने त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व प्रदूषणासह व्यवस्थेवर येणार ताण तसेच यामुळे निर्माण होणा-या विविध आरोग्य समस्या याही याच वेगाने वाढत आहेत. हायस्पीड कार बनत असतील तर तेवढेच सुरक्षित हायस्पीडरस्तेही आपल्या आजूबाजूला आहेत का ? हा प्रश्न पडायला, जाब विचारायला धावपळीच्या जगतात आपल्याकडे वेळ नाही.

म्हणून आज तरी सायकलीवर एकूणएक आरोग्यावर आपण बोलूयात काही.   

पुणे आणि उपनगरात जवळपास २.५ ते ३ लाख सायकलवर येजा करणारे आहेत. लोकसंख्या व इतर वैयक्तिक वाहनांच्या तुलनेत हि संख्या अत्यंत कमीच आहे. जेव्हा आपण प्रदूषण, एअर क्वालिटी इंडेक्स, रहदारीची कोंडी आणि इकोसिस्टमवर तीव्र तणाव, याबद्दल बोलतो तेव्हा तो रोजच्या जीवनात कोविड -१९ या साथीच्या रोगापेक्षाही जास्त असतो.

सायकल हा एक स्मार्ट प्रवास आहे. त्याद्वारे सायकल प्रवासाला प्राधान्य देऊन अनेक देशांमध्ये आणि आपल्या देशातील विविध शहरामंध्ये सायकलिंगद्वारे होणारे बदल सिद्ध होत आहेत. असे बदल कार्बन उत्सर्जन वाचवू शकतात, पर्यावरणाला हातभार लावत शहराच्या सौन्दर्यात भर टाकू शकतात. 

सायकलटूवर्क या पोर्टलद्वारे आम्ही दैनंदिन कामासाठी तसेच व्यायामासाठी सायकल वापरा यासाठी प्रबोधन करत असतो.  STRAVA  हे मोबाईलवर उपलब्ध होणारे ट्रॅकिंग अ‍ॅप्लिकेशन आहे जे जगभरातील व्यक्ती आपल्या दैनंदिन एक्टिविटी जसे की सायकलिंग, रनिंग याची  नोंद करण्यासाठी वापरतात.

सोबतच शहराच्या वेगवेगळ्या भागात सायकल चालविण्याच्या पद्धतींवर जगभरातील शहरांना उपयुक्त  सूचना तसेच लेखाजोखा देण्यासाठी आणि त्याअनुशंगाने पायाभूत सुविधांवर निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी स्ट्रॉवाने  metro नावाचे व्यासपीठ तयार केले.

लॉकडाऊन काळात सगळं बंद होतं. व्यायामासाठीच्या जिम, सगळं आणि सायकलीही बंद होत्या. पर्यायान सायकल फे-यांची नोंदही खाली आली होती. पुणे मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये खर तर STRAVA अ‍ॅप्लिकेशन वापरकर्ते कमीच आहेत पण लॉकडाऊन नंतरच्या नवीन निर्देशानंतर हि आकडेवारी खूप काही सांगून जाते.

ती सोबतच्या आलेखामध्ये तुम्ही पाहू शकता.

पहिला तक्ता एकूण फे-यांचा आहे तर दुसरा एकूण सायलस्वाराचा आहे लाल रेषा गेल्या वर्षीचा सायकलसह आपली एक्टिविटी strava वर रेकॉर्ड करत असतील अशा वापरकर्त्यांचा आहे.  तो चढत्या क्रमाने होताच.

यावर्षीचा लोकडाऊन नंतरचा निळ्या रेषेने दर्शविलेला आलेख खूप काही सांगून जातो. त्यात भारतात आणि पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सायकलींची वाढलेली ३००%* टक्के विक्री आणि वापर तसेच सायकलसाठी प्रिबुकिंग हे प्रकार पहिल्यांदाच पाहावयाला मिळत आहेत.

खर तर रोज दररोज strava वर आपली एक्टिविटी रेकॉर्ड करणारे हे एकूण सायकलस्वारांच्या २०% ते २५% इतके आहेत.   

image
सोबत दिलेला ग्राफ आपल्याला जसाच्या तसा शेअर करता येणार नाही. पण खालील अटी प्रमाणे आपल्याला शेअर करता येईल. https://metro.strava.com/terms

संदर्भ: पुणे मेट्रोपॉलिटन रिजनसाठीचा STARVA METRO डाटा

स्मार्ट सिटी, मोबिलिटी, अर्बन रिन्युवल व BRT अशा सार्वजनिक ट्रान्सपोर्ट या वेगवेगळ्या खात्यांना आपल्या सेवा बजावण्याचा लोकडाऊन काळातही आणि आत्ताही १०० टक्के वाव होता.

पुणे, पिंपरी चिंचवडसह भारताच्या प्रमुख शहरांमध्ये कोविड-१९ सारख्या संकटात लॉकडाउननंतर सोशल डिस्टेन्सिंग पाळत “स्मार्ट मोबिलिटी” साध्य करणे हे खूप मोठे आवाहन नागरिक तसेच व्यवस्थेसमोर आहे.

आठवड्यातून किमान काही दिवस सायकल वापर हे दूरगामी पर्याय आपल्याला हवे असतील तर सायकल या दैनंदिन  वापराच्या साधनास अत्यंत जगबजलेल्या शहरी भागात प्रोत्साहन वेगळ्या पातळीवर CYCLE4CHANGE या केंद्रीय अभियानाअंतर्गत सुरु आहे.

सिटी मोबिलिटी प्लॅननुसार पुणे मेट्रोपॉलिटनला हे काम फार पूर्वीपासून करायचे आहे, वाहतुकीच्या या पद्धतीस प्रोत्साहित करण्यासाठी काही पायलट सिटी सायकल ट्रॅक पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आहेत.

स्मार्ट सिटी प्लॅनिंगमध्ये, वाहतुकीचे  शाश्वत साधन व ते वाढविण्याचे उद्दीष्ट आहे, उदाहरणार्थ सायकलिंग,पादचारी आणि सार्वजनिक वाहतुक यांचा मिलाफ!

आपण जिथे आहोत तिथे फक्त स्वतःभोवती फिरून पहा. जबाबदार कोण आहे? आपणही आहात!

मला माहित आहे आणि हे मान्य आहे की सद्य परिस्थितीत एकाच वेळी संबध भारतात हे या समस्येचं निराकरण नाहीये. शहरांना आतून त्यांच्या स्वतःच्या क्षमतातपासून जोखून पाहण्याची आणि योग्य धोरणात्मक अंमलबजावणीसह सर्व संभाव्य निराकरणाचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

पुणे म्हणजे पूर्वेचे ऑक्सफोर्ड मानलं जात. पुण्याच्या आजूबाजूला आयटी हब असून पुणे सध्या सायकल वापरकर्त्यांचे  वेगवेगळे समूह आहेत, ज्यांच्यासाठी सायकल चालविणे हा एक महत्त्वाचा व्यायाम प्रकार किंवा वाहतुकीचे साधन असा आहे.

प्रमुख्य गट म्हणजे कमी उत्पन्न असणारे किंवा स्थलांतरित कामगार आणि शालेय मुले जे कमी खर्चात आणि अशा सुलभ साधनास पसंती देत असतात (संदर्भ:पुणे सायकल प्लॅन). गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गात देखील कामावर येजा करण्यासाठी व व्यायामासाठी सायकल चालविणे ही एक ट्रेंडिंग जीवनशैली बनली असुन ती आज वाढत आहे. .

गेल्या काही वर्षांपासून  वेगेवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था वेगवेगळ्या रॅलीज असो किंवा स्थानिक प्रबोधन असो यातून सायकलींचा वापर यासाठी जनजागृती  करत होत्याच.

पण कोणत्याही साथीच्या रोगाच्या मुकाबल्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्ना प्रमाणेच येत्या काळात शासकीय व सामाजिक पातळीवर पर्यावरण, सर्वांचे आरोग्य, ट्रॅफिक आणि प्रदूषण समस्या यावर देखील नक्कीच प्रयत्न करायला हवेत.

त्यासाठी लॉकडाऊन नंतर असे प्रयत्न शासकीय पातळीवर केले जातील यासाठी नेहमी पाठपुरावा केला जाऊन वेगाने वाढणारी शहरे रोज दररोज मोकळा श्वास, एकूण व्यवस्थेवरचा ताण कमी होऊन सामाजिक स्वास्थ आणि समाज्याचे आरोग्य उत्तम कसे राहील याकडेही गांभीर्याने पाहण्याची वेळ आलेली आहे.

  • अभिजीत कुपटे  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.