राजीव गांधी ते मोदी, डायरीने भल्याभल्यांना गोत्यात आणलंय

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या डायरीने चांगलाच धुमाकूळ घातलाय. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी दिल्याची नोंद असल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. यशवंत जाधव यांनी डायरीतील ‘मातोश्री’ म्हणजे आई, असं स्पष्टीकरण दिलंय. मात्र लिहिणारा व्यक्ती जरी एक अर्थ सांगतोय तरी त्याचं कनेक्शन दुसऱ्याच अर्थाशी सगळे जोडताय. त्यासाठी आयकर विभागाने विशेष तपास देखील सुरु केलाय.

मात्र तुम्हाला सांगतोय, ही काही पहिलीच वेळ नाहीये जेव्हा एखाद्या डायरीने राजकारणात खळबळ माजवलीये. याआधीही छोटाशा डायरीने राजकारणातील मोठमोठ्या धुरंधरांना चांगल्याच घामाच्या धारा लावल्यायेत. म्हणून म्हटलं चला, जरा तुमच्याशीही शेअर करूया त्या डायरीचे किस्से. कसंय रविवार आहे… काही तरी हटके लागतंयच दिमागाला!

आपल्या सारख्या सध्या लोकांना पण डायरी लिहायची सवय असली तर ती खूपच गुपित ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण त्यातील जर गोष्टी बाहेर आल्या तर आपल्या आयुष्यात भयानक कांड होण्याची भीती असते. आता अशीच सवय समाजात प्रतिष्ठा असणाऱ्या लोकांना देखील असते. मात्र इथे आपल्यात आणि त्यांच्यात फरक फक्त इतका असतो की, त्यांच्या वैयक्तिक डायरीत अनेक वर्षांनंतरही राजकीय वादळ निर्माण करण्याची ताकद असते. 

भारतातील असेच काही प्रसिद्ध डायरी प्रकरणं बघूया…

१. गाइडो हेशके डायरी

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात स्विस-इटालियनच्या डायरीने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. हा एक व्यवहार होत्या ज्यात भारत सरकार ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून १२ हेलिकॉप्टर खरेदी करणार होतं. मात्र या करारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं २०१३-१४ मध्ये उघडकीस आलं. हे झालं होतं त्या डायरीमुळेच. अनेक भारतीय नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांनी या व्यवहारात जवळपास ३६० कोटी रुपयांची लाच घेतल्याचं डायरीतून समोर आलं होतं. 

या डायरीत कोणाचंही नाव लिहिलेलं नव्हतं पण नावांची पहिली अक्षरं लिहिली होती, जसं की, GK, AP, CAF, PG, CM, LM आणि Julie. त्यांचा नंतर शोध घेऊन माजी हवाईदल प्रमुख एसपी त्यागी यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल २०१४ मध्ये, इटालियन न्यायालयात कराराचा निर्णय झाला. न्यायालयाने ऑगस्टा वेस्टलँडचे माजी सीईओ ब्रुनो स्पॅग्नोलिनी यांना साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 

२. मार्टिन अर्दबोची डायरी

मार्टिन अर्दबो हे बोफोर्स या स्वीडिश शस्त्रास्त्र निर्मात्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. १९८७ मध्ये, बोफोर्सवर आरोप लावण्यात आला होता की त्यांनी एक डील मिळवण्यासाठी भारतीय राजकारणी आणि अधिकाऱ्यांना ४.९ कोटी डॉलर लाच दिली होती. अर्दबो यांची वैयक्तिक डायरी स्वीडिश पोलिसांनी ताब्यात घेतली, तेव्हा त्यात R, P, N, Nero, GPH H, GP, SP आणि Q अशी अक्षरे लिहिली आढळली.

हे प्रकरण भारताच्या राजकारणात असं पेटलं होतं की त्याची किंमत राजीव गांधींना त्यांची सत्ता गमावून चुकती करावी लागली होती.

त्यावेळी राजीव गांधींच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांनी बंडाचा आवाज उठवला होता. सिंह प्रत्येक जाहीर सभेत खिशातून एक पत्रक काढायचे आणि सांगायचे की ‘या डायरीत ज्यांनी दलाली कुणी खाल्ली त्यांची नावे लिहिली आहेत’. मात्र विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले तरीही बोफोर्स प्रकरण उघडकीस आलाच नाही. 

३. एसके जैन यांची डायरी

जैन बंधू व्यापारी आणि हवाला ऑपरेटर होते. अनेक प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि त्यांची कामं मार्गी लावण्यासाठी त्यांनी अनेक नेत्यांना लाच दिली होती. एसके जैन यांच्या डायरीतून १.८ कोटी डॉलर्सची लाच दिल्याचं उघड झालं होतं.  LKA आणि JK  अशा नावांसमोर पैसे देण्याचा उल्लेख होता. ज्यानंतर या प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, बलराम जाखड, व्हीसी शुक्ला, माधवराव सिंधिया, मदनलाल खुराणा,अर्जुन सिंह, शरद यादव अशा दिग्गज नेत्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

या डायरीनंतरही काँग्रेस पक्ष सत्तेतून पायउतार झाला होता, पण नंतर सर्व नेत्यांची एक एक करून निर्दोष सुटका झाली देखील झाली होती.

४. ए राजाची डायरी

केंद्रात काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यावर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात पुन्हा एक डायरी बाहेर आली. ही डायरी होती मंत्री ए राजा यांची. ज्यामध्ये टूजी (2G) घोटाळ्याची गुपिते लिहिली होती. 2G घोटाळ्यात सरकारी तिजोरीला सुमारे ४.६ बिलियन डॉलरचे नुकसान झाल्याचा सीबीआयचा अंदाज आहे. या प्रकरणात ए राजा, कनिमोझी या नेत्यांची नावे पुढे आली. 

राजा यांच्या घरातून तीन डायरी सापडल्या ज्यात तमिळ आणि इंग्रजी भाषेत नोंदी लिहिल्या होत्या. त्यात २००३ ते २०१० पर्यंतच्या व्यवसायाचा तपशील होता. यासोबतच या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांची नावे आणि क्रमांकही होते. मात्र नंतर 2G घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले होते.

५. सहारा-बिर्ला डायरी

या डायरीला सामाजिक कार्यकर्ते आणि वकील प्रशांत भूषण ‘सहारा-बिर्ला पेपर्स’ म्हणतात. ऑक्टोबर २०१३ मध्ये आयकर विभाग आणि सीबीआयने आदित्य बिर्ला ग्रुपच्या अनेक कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. यात सीबीआयला जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये बिर्ला समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट शुभेंदू अमिताभ यांच्या ई-मेलमध्ये एक कोड एन्ट्री होती – ‘गुजरात सीएम २५ कोटी’.

या एंट्रीबद्दल विचारलं असता, त्यांचं उत्तर होतं की ‘गुजरात सीएम’ म्हणजे गुजरात अल्कलीज एंड केमिकल्स. मात्र, या नावाच्या कंपनीला पेमेंट केल्याची इतर कोणतीही माहिती ते देऊ शकले नव्हते.

नोव्हेंबर २०१४ मध्ये मोदी सरकारच्या कार्यकाळात आयकर विभागाने सहारा समूहाच्या काही कंपन्यांवर छापे टाकले होते. जप्त केलेल्या दस्तऐवजांमध्ये २०१३-१४ पर्यंत ११५ कोटी रुपयांच्या रोख पावतीचा आणि त्यातील ११३ कोटी रुपयांची रोख रक्कम वेगवेगळ्या व्यक्तींना वाटल्याचा उल्लेख होता. यामध्ये गुजरात, छत्तीसगड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं नाव होतं.

२००३ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना २५ कोटींची लाच दिल्याचा त्यात उल्लेख होता.

वकील प्रशांत भूषण यांनी सहारा-बिर्ला कागदपत्रांबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु पंतप्रधानांसारख्या उच्च घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीविरुद्ध अशा चौकशीचे आदेश देता येणार नाहीत. शिवाय ही कागदपत्रे तपासासाठी आवश्यक पुरावा मानता येणार नाहीत, असं सांगत न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद नाकारला होता. 

६. येदियुरप्पा डायरी

जास्त दूर नाही अलीकडील २०१९ मधाळ हे प्रकरण. कर्नाटकचे भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी भाजप केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजप नेत्यांना १८०० कोटी रुपये दिले असल्याचं कारवाँ मासिकाने दावा केला होता. त्यात म्हटलं होत येदियुरप्पा यांनी स्वत:च्या हातांनी केलेल्या कथित पेमेंटचा तपशील कन्नड भाषेमध्ये नोंदवला. ही डायरी २०१७ पासून आयकर विभागाकडे होती.

ज्यात येदियुरप्पा यांनी भाजपच्या केंद्रीय समितीला १००० कोटी रुपये देण्याबाबत लिहिले होतं. याशिवाय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली यांना प्रत्येकी १०० कोटी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना १५० कोटी, तर लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रत्येकी ५० कोटी रुपये देण्यात आल्याचं लिहिलं होतं. 

याबद्दल येदियुरप्पा यांनी म्हटलं होतं की, “सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञांनी माझं हस्ताक्षर आणि स्वाक्षरी तपासली आहे. डायरीत नोंदवलेलं हस्ताक्षर आणि स्वाक्षरी माझी नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तरीही या डायरीत लिहिलेली एक गोष्टही खरी ठरली तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन.” 

मात्र आजही ते राजकारणात असल्याने प्रकरणाचं पुढे काय झालं असावं याचा तुम्हालाच अंदाज येईल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.