हा भिडू म्हणाला, ते आम्हाला घोड्यावर बसू देत नाही, तर मी हेलिकॉप्टर आणेल!
कुणाचं लग्न ठरलं की, “आता आपला भाई घोड्यावर बसणार” असं आपण अगदी सहज बोलतो. कारण लग्न म्हटलं की घोडा आलाच. यात वेगळं असं काहीच आपल्याला जाणवत नाही किंवा हा बातमीचा, चर्चेचा विषय असू शकतो असं वाटत नाही. पण भिडूंनो, राजस्थानमध्ये आजही ही खूप मोठी गोष्ट आहे बरंका. विशेषतः जेव्हा नवरा मुलगा हा ‘दलित’ असतो. दलित मुलगा लग्नात घोड्यावर दिसला तर त्याच्या जीवावर बेतते. अशात इथल्या एका दलित लग्नानं देशभरात कल्ला केलाय.
राजस्थामधल्या एका दलित मुलाच्या लग्नाला फुल्ल मीडिया कव्हरेज मिळालं. जेव्हा नवरोबाची लग्नठिकाणी एंट्री होत होती तेव्हा त्याचा एक चांगला फोटो मिळावा म्हणून फोटो जर्नलिस्ट पळापळ करत होते. आसपासच्या १० गावांचे सुमारे ३००० लोक त्याठिकाणी गोळा झाले होते, फक्त ती एंट्री बघायला. कारण हा नवरदेव एंट्री करत होता डायरेक्ट आकाशातून, हेलिकॉप्टने.
अशा एन्ट्रीजच्या खूप बातम्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ऐकल्या आहेत. म्हणून इतकं कौतुक का? असा प्रश्न पडेलच. पण हा इतका मोठा मुद्दा का आहे, हे जरा सविस्तर बघा…
राजस्थानमध्ये हा खूप मोठा मुद्दा झाला आहे कारण त्याठिकाणी आजही दलितांना स्वातंत्र्यपूर्व काळात जी वागणूक दिली जायची तीच चालतेय. सरंजामी परंपरेमुळे आजही दलितांना बऱ्याच गोष्टी इथे वर्ज्य आहेत. जसं की, मिश्या ठेवणं, स्मार्ट गॅजेट्स वापरणं, ब्रँडेड कपडे वापरणं, ऑनलाईन शॉपिंग करणं, आणि लग्नात घोड्यावर बसणं.
अशा अनेक घटना आजही इथे घडतात जेव्हा दलित मुलगा घोड्यावर बसतो तेव्हा त्यांच्यावर जाट समुदायाचे लोक लाठ्यांनी हल्ले करतात. आणि म्हणून अनेकदा दलितांना घोड्यावर बसताना पोलिसांची सेक्युरिटी घ्यावी लागते. असं असूनही अनेकदा हल्ले होतातच. आजही दलितांनी घोडा वापरणं म्हणजे ‘घोडचूक’ समजल्या जातं, त्यांना कमी असल्याची जाणीव करून देण्याचा एकही मार्ग सोडला जात नाही.
अशात २३ वर्षाच्या ‘तरुण मेघवाल’ यांनी थेट हेलिकॉप्टर आणलं आपल्या बायकोला घरी न्यायला. “तुम्ही घोड्यावर बसू देत नाही तर मी हेलिकॉप्टर आणेल” असं म्हणत तरुण यांनी बंड पुकारला. यासाठी त्यांना तब्बल ७ लाख रुपये मोजावे लागले पण हक्काच्या लढाईत हे मूल्य काहीच नाही असं ते म्हणतात. शिवाय ही त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती, मग काय विषयच संपला.
तरुण यांचे पालक सरकारी शिक्षक आहेत. दोघांनीही आपल्या मुलांना डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे संस्कार दिले आहेत. घरात आंबेडकरांची आणि दलित साहित्याची पुस्तकं बघत तरुण मोठे झालेले. उच्च शिक्षण घेत डॉक्टरपर्यंत त्यांनी आज मजल मारलीये.
पण तरीही हा हेलिकॉप्टरचा संघर्ष इतका सोपा नव्हता. तरुण यांचा साखरपुडा झाला तेव्हा हे सर्व सुरु झालं.
साखरपुडा झाला आता लग्नाची बारी. घोडा लागणार. पण नेहमी ज्या घटना ऐकू येतात आणि तशात जे वातावरण आजूबाजूला तयार होऊ लागलं होतं त्यावरून मेघवाल कुटुंबाला पुढच्या संकटाची जाणीव होत होती. मात्र त्यांनी इतर दलित कुटुंबांसारखी माघार घेतली नाही. कारण आंबेडकरी विचारांची कास धरणारं कुटुंब हे शेवटी! रस्त्याने जाऊ देत नाही तर त्यांनी डायरेक्ट हवाई मार्गाचा पर्याय निवडला.
हेलिकॉपरची शोधाशोध सुरु झाली. अशात त्यांना चार्टर सर्विसेज पोहोच करणारी एक कंपनी घावली. साडेसहा लाख खर्च सांगितला. शिवाय पहिले जिल्हा मॅजिस्ट्रेट यांचीही परवानगी लागेल असं कळलं. कुटुंबाने आर्थिक जुळवाजुळव तर केलीच शिवाय परवानगीही मिळवली. कुटुंब आनंदित झालं पण जेव्हा ही घटना मीडियामध्ये पसरली त्यांना भीती वाटली. आता राजपूत लोक यात नक्की काहीतरी संकट उभं करणार असं त्यांना वाटलं.
लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले. सगळं व्यवस्थित जात होतं. चार्टर कंपनीने टेक्निशियन पाठवून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या होत्या. लग्नाचा दिवस आला. सगळे कपडे वगैरे घालून तयार होते. तितक्यात कॉल आला, “आम्ही हेलिकॉप्टर पाठवू शकत नाही”.
बस्स! विषय संपला असं सर्वांना वाटलं. तिकडे मुलीच्या घरचे आनंदात होते कारण दलित समाजात कुणीही करत नाही असं त्यांचा जावई करणार होता. तेव्हा तरुण मेघवाल यांनी दुसऱ्या कंपन्यांची शोधाशोध केली. सगळे नाहीच म्हणत होते. पण म्हणतात ना, चांगल्या भावनेने काही ठरवलं तर ते साध्य होण्यात निसर्ग आपली मदत करतो. असंच झालं. एक कंपनी तयार झाली. पण ती एक लाख जास्त मागत होती.
मेघवाल म्हणाले, “जास्त पैसे चालतील, पण ही सन्मान कमावण्याची लढाई आहे. आता माघार नाही” आणि अशाने त्यांची एंट्री धुमाकूळ घालणारी ठरली.
राजस्थानच्या या मेघवाल कुटुंबाचा हा संघर्ष खरंच कौतुकास्पद आहे. पण खूप सारे प्रश्न याने निर्माण झालेत. ७० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन. तेवढाच काळ झालाय संविधान मिळून. तितकाच काळ लोटलाय संविधानाच्या कायद्यांचे रक्षण करणाऱ्या सेवा स्थापित होऊन. तरीही सामाजिक अस्थैर्य निर्माण करणाऱ्या घटना वाढतंच आहेत. आणि यामध्ये जातीचा मुद्दा अजूनही आघाडीवर आहे.
दलित, शूद्र असे शब्द भारतीय मनात घर करून आहेत. पण हो, थोडा फरक यात पडलाय.
आधी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोकांना आज स्वतःला उच्चभ्रू म्हणवून घ्यावं लागतंय. आणि ‘हा आमचा अधिकार आहे’ असं त्यांना सांगावं लागतंय. आता आजही त्यांना असं का वाटावं? हा वेगळा प्रश्न. पण एक गोष्ट यातून प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे नेहमी दाबला जाणारा समाज बदलतोय. राजस्थानमध्ये घडलेल्या मेघवाल लग्नाच्या या ताज्या उदाहरणाने भारत बदलतोय, याची जाणीव होतेय.
हे ही वाच भिडू :
- खिचडी बनवणाऱ्या मावशी दलित आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी जेवणावर बहिष्कार टाकलाय
- गावातल्या दलितांना हक्काचं पाणी मिळावं म्हणून बापूंनी मोठी मोहीम सुरू केली
- वानखेडे प्रकरण असो की पंजाब-बंगाल, दलित हक्क आयोग भाजपची बाजू घेतंय का?
- तेलंगनात दलित बंधू योजनेवरून का गोंधळ उडाला आहे?