आयसोलेशन पिरियड १४ वरून ७ दिवस होण्यामागची कारणे महत्वाची आहेत

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट सध्या आपल्या देशावर आहे. ओमिक्रोन असं या नवीन व्हेरिएन्टचं नाव असलं तरी त्यांची लक्षण बऱ्यापैकी कोरोना सारखीच आहे. म्हणून यावर केले जाणारे उपचारसुद्धा कोरोनासारखेच आहे. कोरोनाचं संक्रमण झालं की सगळ्यात पहिले त्या पेशंटला आयसोलेट केलं जातं. आताही उपचाराची पहिली स्टेप हीच आहे. पण यात बदल करण्यात आला आहे. आधी आयसोलेशनचा कालावधी १४ दिवसांचा होता. आता यामध्ये बदल करून केवळ ७ दिवस आयसोलेशन केलं जाणार आहे.

आधी जाणून घेऊया सेल्फ आयसोलेशन म्हणजे काय?

सेल्फ आयसोलेशन म्हणजे स्वतः सगळ्यांपासून दूर करून घेणं. यादरम्यान तुम्हाला काम, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी जाण्यापासून मनाई केलेली असते. तुम्हाला घरीच राहावं लागतं. शिवाय पब्लिक ट्रांसपोर्ट किंवा टॅक्सी यामधून वाहतूक करणंही बंद करावं लागतं. तसंच तुम्हाला अशा रूममध्ये राहावं लागतं जिथे एखादी खिडकी असेल आणि ती उघडता येत असेल.

१४ दिवस आयसोलेट का करण्यात येत होतं?

बहुतेक प्रकरणांमध्ये, लक्षणे दिसण्यासाठी ६ दिवस लागतात आणि पुढील ८ दिवस संक्रमित व्यक्ती मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरवू शकते. म्हणून आधीचे ६ आणि नंतरचे ८ असे मिळून १४ दिवसांचं कॅलक्युलेसन केलं जात होतं. कोविडची लक्षणे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात विषाणू प्रवेश केल्यानंतर २ ते १४ दिवसांच्या दरम्यान दिसतात. यासोबतच असे देखील दिसून आले की लक्षणे आल्यानंतर व्यक्ती ८ ते १० दिवस स्थिर राहते.  यानंतर व्यक्तीद्वारे संसर्ग होण्याची शक्यता जवळजवळ संपलेली असते.

पण आता भारताने लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणांसाठी होम आयसोलेशन कालावधी ७ दिवसांपर्यंत कमी केला आहे. शिवाय चाचणीशिवाय होम आयसोलेशन संपवण्याचा निर्णयसुद्धा देण्यात आलाय. पण सरकारचा हा निर्णय कितपत योग्य आहे? आणि याने काय नुकसान होऊ शकतं? हे जाणून घेऊया…

सर्वप्रथम आयसोलेशन नियमांमध्ये बदल केव्हापासून सुरु झाले?

याची सुरुवात झाली ती अमेरिकेपासून. अमेरिकेने २३ डिसेंबरला कोरोना संक्रमित आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी होम आयसोलेशनचा कालावधी १० दिवसांवरून ७ दिवसांवर आणला. २७ डिसेंबर २०२१ ला  यूएसने सामान्य नागरिकांसाठी आयसोलेशन कालावधी १० दिवसांवरून ५ दिवसांवर आणला. अमेरिकेनंतर ब्रिटननेही कोरोना बाधितांसाठी होम आयसोलेशन १० वरून ७ दिवसांवर आणले. त्याचवेळी इस्रायलने लसीकरण केलेल्या लोकांसाठी आयसोलेशनची आवश्यकता रद्द केली.

भारतातील आयसोलेशन पद्धत कशी बदलत गेली?

देशात पहिल्या लाटेत १४ दिवस कोरोना होम आयसोलेशन ठेवण्यात आलं होतं. यावेळी आयसोलेशन संपण्यापूर्वी दोन कोरोना चाचण्या निगेटिव्ह येणं आवश्यक होतं. यानंतर, होम आयसोलेशनचा कालावधी १४ दिवस ठेवण्यात आला पण अनिवार्य चाचणी काढून टाकण्यात आली. एप्रिल २०२१ मध्ये दुसऱ्या लाटेदरम्यान, मार्गदर्शक तत्त्वांमध्ये होम आयसोलेशन कालावधी १४ दिवसांवरून १० दिवसांपर्यंत कमी करण्यात आला होता. यासह, चाचणीची अनिवार्यता देखील आयसोलेशन संपण्यापूर्वी संपली.

आता ५ जानेवारी २०२२ ला आलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांत आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणांसाठी होम आयसोलेशन कालावधी १० वरून ७ दिवसांपर्यंत कमी केला आहे. सलग तीन दिवस आयसोलेशनमध्ये ताप नसेल तरच ७ दिवसांनंतर होम आयसोलेशनचा विचार केला जाईल. तसेच, ७ दिवसांनंतर होम आयसोलेशन संपण्यापूर्वी चाचणी करणे आवश्यक नसल्याचंही सांगितलं आहे.

यावर वैद्यकीयदृष्ट्या नियुक्त सौम्य प्रकरणे म्हणजे अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्टची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ताप किंवा त्याशिवाय, श्वासोच्छवासाचा त्रास नसलेला आणि खोलीतील हवेत ९३ टक्क्यांपेक्षा जास्त ऑक्सिजनची उपलब्धता असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचं मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगितलंय. होम आयसोलेशनसाठी पात्र असलेल्या परंतु त्यांच्या निवासस्थानी आवश्यक सुविधा नसलेल्या रुग्णांना नियुक्त CCC2 (COVID केअर सेंटर-२) मध्ये हलवले जाईल.

आयसोलेशन पिरियड ७ दिवस करण्याची कारणं काय?

आयसोलेशनचा कालावधी कमी करण्याबाबत, आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय की, गेल्या दोन वर्षांत जगात आणि भारतातही असे दिसून आलंय की, कोविडची बहुतेक प्रकरणे एकतर लक्षणे नसलेली आहेत किंवा अतिशय सौम्य लक्षणे आहेत. तसंच ओमिक्रॉनची लक्षणे २-३ दिवसांत दिसून येतात आणि ३-४ दिवसांत विषाणू नाहीसा होऊ लागतो.  यामुळेच आयसोलेशनचा कालावधी ७ दिवसांवर आणण्यात आला आहे.

यावर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे? 

ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याकडे पाहता सरकारच्या या निर्णयावर अनेक तज्ज्ञ प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. कोणत्याही चाचणीशिवाय आयसोलेशन पिरियड संपवल्यामुळे संसर्गाचा धोका अजून वाढणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. आयसोलेशनमधून लवकर निघाल्याने हे लोक ओमिक्रॉन संसर्ग  पसरवू शकतात.

शिवाय भारतातील लोक स्वयं-शिस्तीत राहत नाहीत आणि अनेक वेळा सेल्फ-आयसोलेशन नियमांचे पालन न केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा स्थितीत रुग्णाला लक्षणे नसली तरी त्याने १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहावे. आणि आयसोलेशन संपल्यानंतरही मास्क वापरावं, असं तज्ज्ञ सांगतात.

मग आता सरकारच्या या निर्णयाचा काय परिणाम होतो? किंवा तज्ज्ञांचं ऐकून सरकार निर्णय बदलेल का? हे बघणं महत्त्वाचं  ठरणारेय. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.