लग्नात जावून, राडा करून शेवटी धर्मेंद्रनं हेमाला पटवलीचं..!

पंजाबी जठ्ठ धर्मेंद्र आणि ड्रीमगर्ल हेमामलिनी हे भारतीय फिल्मइंडस्ट्री मधलं सर्वात देखणं कपल. त्यांची लव्हस्टोरी एका फिल्मीकथेपेक्षा जास्त रोमांटिक आहे.

अख्खा भारताला तेव्हा हेमामलिनीने वेड लावलेलं.  तिला पटवण्यासाठी फिल्मइंडस्ट्री मधले अनेक हिरो गळ टाकून बसले होते. यात आघाडीवर होते संजीवकुमारआणि धर्मेंद्र. आपल्या सिनेमामध्ये शांत सोज्वळ अशा टाईपची भूमिका करणारा संजीवकुमार होता छुपा रुस्तम. त्याच्या रंगील्या स्वभावाचे किस्से इंडस्ट्री मध्ये फेमस होते. 

हेमाला मात्र उर्दू शायरी पाठ असणारा रांगडा देखणा धर्मेंद्र आवडायचा.

पण प्रॉब्लेम हा होता की धर्मेंद्रचं तेव्हा ऑलरेडी परकाश कौर हिच्याबरोबर लग्न झालं होत. त्याला दोन मुले देखील होती. हेमामालिनीच्या घरच्यांना यामुळे तो नामंजूर होता.

हे तिघे शोले सिनेमासाठी एकत्र आले. रोल निवडण्यापासून धर्मेंद्र आणि संजीवकुमारची चढाओढ सुरु होती. संजीवकुमारला विरूचा रोल हवा होता. खरं तर धर्मेंद्रला सुद्धा ठाकूरचा रोल हवा होता पण मग विरूची भूमिका संजीवकुमारला जाईल आणि विरूच्या सोबत बसंतीच्या भूमिकेत हेमामालिनी आहे म्हणून त्याने विरूच बनायचा निर्णय घेतला.

शोलेचं शुटींग सुरु झालं. धर्मेंद्र खुलेआम हेमामालिनीशी फ्लर्ट करत होता.

त्यांच्या रोमांटिक सीनवेळी तो मुद्दामहून काही तरी चूक करून रिटेक करायचा. कधी कधी कॅमेरामनला शंभर रुपये देऊन तो सीन परत शूट करायला लावायचा. शोले मधला आंबा पाडायचा सीन तर दहा वेळा रिटेक झाला. हेमाचे वडील, संजीवकुमार धरमपाजीचे हे उद्योग पहायचे पण काही करू शकत नव्हते.

संजीवकुमारला माहित होते की किती जरी झाले तरी धर्मेंद्र आपल्या पहिल्या बायकोला सोडू शकत नाही त्यामुळ हेमाच आणि त्याचं लग्न काही होणार नाही. अखेर त्याने हेमाला प्रपोज करायचे ठरवले. डायरेक्ट तिला जाऊन ‘ दिल की बात’ सांगण्याचे संजीवकुमारमध्ये धाडस नव्हते. मग आपला दोस्त जितेंद्रला या कामासाठी त्याने पाठवले. 

जम्पिंग जॅक जितेंद्र तर या सगळ्यांच्या एक पाउल पुढे निघाला.

त्याने हेमामालिनीला आणि तिच्या घरच्यांना काय सांगितले ते माहित नाही पण हेमाने संजीवकुमारला नकार दिला. थोड्या दिवसात बातमी आली जितेंद्र आणि हेमामालिनी मद्रासमध्ये लग्न करत आहेत.  असं म्हणतात हेमाची आईने तिला या लग्नासाठी तयार केले होते.


एका वर्तमानपत्रात छापून आलेल्या या बातमीने मुंबईमध्ये खळबळ उडवून दिली. संजीवकुमारसाठी हा मोठ्ठा धक्का होता. हेमामालिनीने दिलेल्या हार्टब्रेकमधून तो कधी सावरू शकला नाही आणि आयुष्यभर तो अविवाहित राहिला.


पण धरमपाजी, ते हार मानणाऱ्यांच्यातले नव्हते..!


फिल्मी पडद्यावर व्हिलनला कुत्र्यासारखा मारणारा धरम ही बातमी ऐकून गरम झाला. त्याला माहित होत की हेमामालिनी त्याच्यावर प्रेम करते पण तरीही ती जितेंद्रबरोबर लग्न करायला कशी तयार झाली याच त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होतं.  त्याला एक आयडिया सुचली.  मद्रास उर्फ चेन्नईला जाणार पहिलं विमान त्यान पकडलं.


इकडे हेमामालिनीच्या घरी लग्नाची गडबड सुरु होती. लग्नाच्या दिवशी सकाळी अचानक धर्मेंद्र तिथे येऊन थडकला. त्याच्यासोबत एक मुलगी होती. तिला बघताच जितेंद्रचा चेहरा खर्रदिशी उतरला. ती जितेंद्रची गर्लफ्रेंड शोभा सिप्पी होती. शोभा आणि तो लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात होते. ती एका विमानकंपनीमध्ये एयरहोस्टेस होती.


आपल्या दारूच्या शौक साठी फेमस असलेला धर्मेंद्र नशेतच तिथे आला होता. आल्या आल्या त्याने लग्नमंडपात गोंधळ घालण्यास सुरवात केली. हेमाच्या वडिलांनी व्ही एस आर चक्रवर्तीनी त्याला कॉलरला धरून हाकलायचा प्रयत्न केला. आता हेमामालिनीपासून सगळ्यांना वाटले की धरमपाजी त्यांना उचलून फेकतोय की काय.


पण अचानक सीन मध्ये ड्रामाटिक चेंज आला. तगडा पहिलवान धर्मेंद्र हेमाच्या वडिलांना डोळ्यात अश्रू आणून तिच्याशी एकदा बोलायला देण्यासाठी विनवू लागला. धर्मेंद्रचं हे अनोख रूप पाहून सगळेच चाट पडले.  चक्रवर्तीसाहेबांच्या मनालाही पाझर फुटला. अखेर धर्मेंद्र आणि हेमामालिनीला चर्चेसाठी एका बंद खोलीत पाठवण्यात आलं.

इकडे शोभा आणि जितेंद्र यांचा वेगळाच तमाशा सुरु होता.

काही वेळानंतर धर्मेंद्र आणि हेमा खोलीतून बाहेर आले. हेमाचे डोळे रडून सुजलेले होते. तिने मानेनच जितेंद्रच्या घरच्यांना लग्नासाठी नकार कळवला. एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमापेक्षा जास्त ड्रामा हेमामालिनीच्या लग्नमंडपात झाला. 

हा ड्रामा अजून संपला नाही. धर्मेंद्र आपल्या पहिल्या बायकोला, पोरांना सोडू शकत नव्हता. त्यांची लव्हस्टोरी सुरु होती पण शेवट सस्पेन्स होता. दरम्यानच्या काळात जितेंद्र आणि शोभाचे पंजाबी पद्धतीने लग्न झाले. धर्मेंद्र त्याच्या लग्नात नाचायला सगळ्यात पुढे होता. 

अखेर हेमामालिनीशी लग्न करण्यासाठी त्याने आपला धर्म चेंज केला. मुस्लीम पद्धतीने दोघांनी निकाह केला. ध्रामेंद्र आणि हेमामालिनीची लव्हस्टोरी सफळ संपूर्ण झाली. 

तर भिडूंनो आज काय शिकलात. 

लग्नात बुंदी खायला जायचं नसतं तर खिंड शेवटपर्यन्त लढवायची असते. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.