कार्तिकच्या त्या एका सिक्सनंतर बांगलादेशच्या टीमनं अजून नागीन डान्स केला नाही…

क्रिकेट म्हणलं की आपल्या आवडत्या आणि नावडत्या अशा लय आठवणी असतात. आता १९८३ चा वर्ल्डकप आपल्या जशाचा तसा आठवतो आणि आनंदही देतो, पण २००३ चा वर्ल्डकप म्हणलं की, आपण पॉन्टिंगला शिवी घालून मोकळे होतो. शिव्यांचा विषय निघालाय तर जावेद मियाँदाद, शाहीद आफ्रिदी, सायमंड्स अशी लिस्ट लय मोठी आहे. पण या लिस्टमध्ये पॉन्टिंग आणि आफ्रिदी खालोखाल कुणी असेल, तर बांगलादेशची टीम.

आपण २००७ च्या वनडे वर्ल्डकपमधून बाहेर पडलो, ते बांगलादेशकडून हरल्यावरच. २०१६ च्या आशिया कपवेळी धोनीचा मॉर्फ केलेला फोटो बघूनही कित्येकांच्या डोक्यात सणक गेलेली. बांगलादेशवाले नुसते जिंकून गप्प बसत असते, तर त्यांचा राग आला नसता, पण त्यांना किडे करायची सवय फार. मॅच जिंकल्यावर कल्ला असा करतील की श्रीशांत आणि शोएब अख्तरला लाज वाटावी.

जिंकल्यावर ते काहीतरी चाळे करणार आणि फूल टू इज्जत डाऊन झाल्याचा फील येणार, त्यामुळं भारतीय चाहते म्हणत असतात, ‘पाकिस्तानकडून हरलात तरी समजून घेऊ, बांगलादेशकडून तेवढी माती खाऊ नका.’

पण २०१८ मध्ये भारतीय संघानं बांगलादेशला असा काही धडा शिकवला की, त्यानंतर त्यांची नागीन डान्स करायची डेरिंग झालेली नाय…

१८ मार्च २०१८, श्रीलंकेचं आर. प्रेमदासा स्टेडियम. निदाहस ट्रॉफीची फायनल मॅच. भारत विरुद्व बांगलादेश. श्रीलंकेला हरवल्यानंतर बांगलादेशच्या कार्यकर्त्यांनी नागीन डान्स केला होता, त्यामुळं दुखावलेल्या लंकन फॅन्सनी स्टेडियममध्ये भारताला सपोर्ट करायला गर्दी केली.

भारतानं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली आणि जयदेव उनाडकटनं फटके खायला सुरुवात केली. वॉशिंग्टन सुंदरनं तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट मिळवली आणि चहलनं चौथ्या ओव्हरमध्ये दोन. चहल एकाबाजूनं विकेट काढत होता, तर दुसऱ्या बाजूला विजय शंकर आणि उनाडकट आलटून पालटून मार खात होते. शब्बीर रेहमाननं भारतीय बॉलर्सची धुलाई करत शानदार फिफ्टी मारली.

१८ ओव्हर्सनंतर बांगलादेशचा स्कोअर होता, ६ आऊट १४५. नेमका बॉलिंगला आला उनाडकट. टीव्हीसमोर मॅच बघणारी तीन पोरं उठून गेली, दोघांनी गुडघ्यात डोकं घातलं पण तिकडं उनाडकटनं विषय गंभीर केला. पहिल्या बॉलवर दोन रन्स, दुसऱ्या बॉलवर खुंखार शब्बीर बोल्ड. मग एक वाईड आणि पुन्हा तिसऱ्या बॉलवर रुबेल हुसेनचं दांडकं हवेत. पुढचे तिन्ही बॉल उनाडकटनं डॉट टाकले.

त्याला जितक्या शिव्या दिल्या असतील तितक्या मागं घ्याव्या लागल्या. 

बांगलादेशच्या धावसंख्येला ब्रेक लागलाच होता, पण मेहंदी हसन कुठल्या तरी रागात असल्यासारखा शार्दूल ठाकूरवर तुटून पडला आणि लास्ट ओव्हरला आले १८ रन्स. बांगलादेशचा स्कोअर झाला ८ आऊट १६६.

आता भारताची इनिंग…

दुसऱ्याच ओव्हरला रोहित शर्मा मेहंदी हसनवर तुटून पडला. त्याला दोन छक्के, एक चौका हाणल्यावर कॅप्टन रोहितची गाडी सुसाट सुटली. दुसऱ्या बाजूला धवन आणि रैना मात्र पटकन आऊट झाले. रोहितनं फिफ्टी पूर्ण केली आणि नंतर तोही आऊट झाला. अडखळत खेळणाऱ्या विजय शंकरनं मनिष पांडेच्या साथीत मॅच खेचत आणली. १८ व्या ओव्हरमध्ये मॅच भारताच्या बाजूनं फिरण्याचे फुल चान्सेस होते.

मात्र मुस्तफिझुर रेहमाननं १८ वी ओव्हर मेडन टाकली आणि शेवटच्या बॉलवर मनिष पांडेची विकेटही घेतली.

मग मैदानात एंट्री झाली… दिनेश कार्तिकची.

टीम प्रचंड प्रेशरमध्ये, फायनल जिंकायला १२ बॉल्समध्ये ३४ रन्सची गरज. कार्तिकनं पहिला बॉल फेस केला.. रिझल्ट सिक्स. दुसरा बॉल.. फोर. तिसरा बॉल.. लय लांब सिक्स. चौथा डॉट, पाचव्यावर दोन आणि सहाव्यावर परत फोर. रुबेल हुसेनचे खांदे आणि ओव्हरला २२ रन्स पडले होते.

मॅच आता शेवटच्या ओव्हरवर पोहोचली…

स्ट्राईकवर होता विजय शंकर. पहिले तीन बॉल, वाईड, डॉट, एक, एक असे गेले. विजय शंकरच्या बॅटला बॉल लागत नव्हता, पण त्यानं चौथ्या बॉलला फॉर मारलीच. पाचवा बॉल त्यानं हवेत उडाला… बांगलादेशी फॅन्स कॅच आणि भारतीय फॅन्स ‘सोड राव…’ एकाच वेळी ओरडले. पण जवळपास सुटलेला कॅच मेहंदी हसननं धरला आणि इथं लोकांचं बीपी वाढलं.

शेवटचा बॉल… जिंकायला ५ रन्स हवे होते… टीव्हीवर वॉशिंग्टन सुंदर स्ट्राईकवर दिसत होता. त्यामुळं टेन्शन अजून वाढलं. भारत हरणार आणि बांगलादेशी टीम नागीन डान्स करणार असं फिक्स वाटत होतं. सौम्य सरकारनं किमान काही मिनिटं वेळ विचार करण्यात आणि प्लॅन आखण्यात घालवला.

तो जसा बॉलिंग करायला धावला तसं दिसलं की, क्रीझवर दिनेश कार्तिक आहे. जरासं टेन्शन कमी झालं… पण पोरांचं लक्ष मॅचकडे आणि हात छातीवर होता… एखादं गचकायचं एवढी टेन्स सिच्युएशन होती. 

सरकारनं बॉल थोडासा बाहेर टाकला आणि कार्तिकनं तो उचलला. बाऊंड्री जाणार असं वाटलं पण बॉल गेला सिक्स.

खोटं नाय भिडू, पण मैदानात इतका कल्ला झाला की, असं वाटत मॅच लंकेत नाय… भारतात सुरू ए. दिनेश कार्तिक त्या मॅचमध्ये फक्त ८ बॉल्स खेळला… पण त्याच्या २२ रन्सनं भारताला जिंकवून दिलं. बांगलादेशच्या खेळाडूंचा माज मोडला आणि जोवर शेवटचा बॉल पडत नाही… तोवर क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं… हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

एक मात्र आहे… दिनेश कार्तिकचं सगळं करिअर एका बाजूला आणि सौम्य सरकारला मारलेला तो कडकडीत छकडा एका बाजूला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.