वाजपेयींनी डेक्कन ओडिसीला जिथून हिरवा झेंडा दाखवला होता त्या दरबार हॉलचा इतिहास लय जुनाय

नुकतंच मुंबईच्या राजभवन इथे नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पार पडले. जास्त आसन क्षमतेच्या या हॉलच्या उद्धघाटनाला मुख्यमंत्रीसुद्धा उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची एक आठवण सांगितली. राजभवन, दरबार हॉल आमच्यासाठी नवीन नाही. विरोधी पक्षात असताना वर्षात एखाद दुसऱ्या वेळी शिष्टमंडळ घेऊन राजभवनात येत होतो. राज्यपालांना आमची गाऱ्हाणी सांगणं हा उद्देश्य असायचा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यासोबतच त्यांनी हे देखील मान्य केलं की या वास्तूने अनेक घटना पाहिलेल्या आहेत. अशी वास्तू शोधूनही सापडणार नाही, असं ते म्हणाले. पण तुम्हाला सांगतो, ज्या दरबार हॉलचं उदघाटन संपूर्ण देशात बातमीचा विषय बनला आहे, तो दरबार हॉल १०० वर्ष जुना आहे. ब्रिटीश काळ ते स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक दरबाराचा साक्षीदार हा दरबार हॉल राहिला आहे. अनेक राजकीय घडामोडी या हॉलने बघितल्या आहेत. तेव्हा भारताच्या या खजिन्याचा इतिहास जरा जाणून घेऊ.

ब्रिटिश काळामध्ये हा दरबार हॉल बांधण्यात आला होता. हे बांधण्याचं निमित्त म्हणजे इंग्लंडचे महाराज पंचम जॉर्ज.

१९११ साली ते भारत भेटीवर आले होते. इंग्लंडचे महाराज पंचम जॉर्ज म्हणजे पहिले सर्वोच्च राष्ट्रप्रमुख. मलबार हिलच्या गव्हर्नमेंट हाऊस इथे ते येणार होते. इतका मोठा व्यक्ती येणार म्हटल्यावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. ही तयारी इतकी मिठी होती की फक्त त्यांच्या स्वागतासाठी दरबार हॉल बांधण्यात आला. 

या हॉलमध्ये बसण्याची मोठी व्यवस्था करण्यात आली होती. दरबार हॉलची आसन क्षमता २२५ होती. त्यामुळे कोणतेही निर्णय घ्यायचे असतील, चर्चासत्र असतील ते करण्यासाठी हा हॉल योग्य होता. शिवाय  निसर्ग आणि जवळच समुद्र असल्याने नेहमी इथली हवा थंड असते. या गोष्टींचा विचार करून ब्रिटिश गव्हर्नर्सचे दरबार इथे भरू लागले. शेवटचा दरबार इथे भरला तो १९३७ साली. गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी आपला कार्यकाळ संपत असताना मुंबईतील शेवटचा दरबार याच दरबार हॉलमध्ये आयोजित केला होता.

१९३७ सालच्या दरबाराला शेवटचा दरबार यासाठी म्हटलं जातं कारण स्वातंत्र्यानंतर जेव्हा काँग्रेसची सत्ता आली तेव्हा काँग्रेसने एक ठराव पारित केला. ब्रिटिश राजसत्तेला अनुकूल ठरेल अशा  कुठल्याही शाही समारंभात सहभागी होऊ नये असा तो ठराव होता. त्यामुळे त्यानंतर इथे दरबार भरले नाही. मात्र दरबार हॉल अशी ओळख निर्माण झाली असल्याने त्याचं नाव तसंच ठेवण्यात आलं.

स्वातंत्र्यानंतर राजभवनाचा भाग बनलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य घटक असलेल्या या दरबार हॉलने अनेक बदल, सत्तांतरे आणि मानाचे सोहळे पाहिलेले आहेत. 

मुख्यमंत्री, मंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबईचे नगरपाल, मुख्य माहिती आयुक्त, लोकायुक्त यांच्या  शपथविधी या ठिकाणी होऊ लागल्या. शासकीय बैठका, शिष्टमंडळांच्या भेटी, सांस्कृतिक सोहळे, पद्म पुरस्कार विजेत्यांचे सत्कार सोहळे, विविध देशांच्या राजदूतांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी दरबार हॉल हे प्रतिष्ठित ठिकाण म्हणून नावारूपाला आले.  

राजभवनातील दरबार हॉलने जशी सत्ता स्थापनेची लगबग पहिली तशीच आमदारांची शिरगणती देखील पहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाबासाहेब पुरंदरे यांना याच सभागृहात ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान केला होता. याच दरबार हॉलमध्ये शेतकऱ्यांना सन्मानित केल्या गेलं तर राष्ट्रपती पोलीस पदक दान सोहळे देखील इथेच पार पडले.

भारतीय रेल्वेला १५० वर्षे झाली त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी याच दरबार हॉलपासून डेक्कन ओडिसीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं होतं.

या दरबार हॉलचं अनेकदा नामांतर करण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा मुंबईत गुजराती आणि मराठी दोन्ही भाषिक लोक वास्तव्य करत होते तेव्हा १९५६ साली श्रीप्रकाश यांनी राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली त्यावेळी या हॉलचे नाव ‘जलनायक’ असं केलं होतं. त्यानुसार पुढे याला ‘जल सभागृह’ असं संबोधलं जाऊ लागलं. २००० सालानंतर राज्यपाल मोहम्मद फजल यांनी दरबार हॉलचे नामकरण ‘कॉन्फरन्स हॉल’ असं केलं होतं. पण त्यांचा कार्यकाळ संपल्यावर हॉलला परत नेहमीचं नाव देण्यात आलं.

जवळ जवळ १०० वर्षे दरबार हॉल जुना असल्याने त्यांची अनेकदा डागडुजी करण्यात आली. मात्र त्यांचे लोखंड गांजले होते. मध्यंतरी दरबार हॉलला छोटीशी आग देखील लागली. कालांतराने त्याला असुरक्षित म्हणून घोषित केले गेले. शिवाय इथली असं क्षमता कमी वाटू लागल्याने शपथविधी सोहळे राजभवनाच्या हिरवळीवर होऊ लागले. 

२०१७ नंतर दरबार हॉलचा वापर पूर्णपणे थांबवला गेला. म्हणून त्याठिकाणी नवा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला. २०१८ साली नव्या दरबार हॉलचं भूमिपूजन करण्यात आलं आणि बांधकाम २०२० साली सुरु झाले. आता जुन्या दरबार हॉलच्याच जागेवर आता ७५० आसन क्षमता असलेला नवा दरबार हॉल बांधून पूर्ण झाला आहे.

असा हा १०० वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय जडणघडणीचा साक्षीदार असलेला दरबार हॉल पुन्हा अजून कित्येक वर्ष कार्य करण्यास सज्ज झाला आहे. याने भारताच्या ऐतिहासिक खजिन्यात नव्याने भर पडली आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.