तिहार जेलमधल्या कैद्यांनी वाजपेयींना पत्र लिहून कारगिलला पाठवण्याची मागणी केली होती…

कारगिल युद्ध. भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा अध्याय. अनेक दिवस भारत युद्धाच्या सावटाखाली राहिला. युद्धभूमीवर भारतीय सैन्यांनी आपलं रक्त सांडलं, कुठल्याच शब्दांत लिहिता येणार नाही असा त्याग केला, कित्येक स्वप्न त्यावेळी अपूर्ण राहिली, कित्येक आई-वडिलांनी आपली लेकरं त्या रणसंग्रामात देशासाठी गमावली. कारगिल भारतानं जिंकलं आणि सगळ्या देशात उत्साहाचं वातावरण पसरलं, सगळ्या देशानं आनंद साजरा केला.

एक मात्र होतं, कारगिलचं युद्ध सुरू असताना देशातल्या अनेक नागरिकांना लढावंसं वाटत होतं, आपण आपल्या देशासाठी लढावं मग लढता लढता मरण आलं तरी चालेल, अशी भावना अनेकांची होती. कारगिलच्या युद्धावेळी अनेकांनी निश्चय केला होता, मोठं होऊन सैन्यात जायचं आणि ते स्वप्न कित्येकांनी पूर्णही केलं.

जेव्हा देशातले इतर नागरिक देशप्रेमानं आणि सैन्याच्या शौर्यामुळं भारावले होते, तेव्हा देशातल्या एका कारागृहातली परिस्थितीही वेगळी नव्हती. कुख्यात गुन्हेगारांनाही धडकी भरवणारी ती जागा म्हणजे, तिहार कारागृह. देशातले काही खतरनाक गुन्हेगार तेव्हा या कारागृहात होते. साहजिकच वातावरणात एक अघोषित तणाव असायचा, या कारागृहाचा चेहरा-मोहरा बदलण्याचं काम केलं किरण बेदी यांनी.

तिहार तुरुंगाच्या प्रमुख असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या वागणुकीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. सोबतच त्यांनी कैद्यांच्या मनोरंजनासाठी टीव्ही आणि रेडिओची सोयही केली. कारगिल युद्धाला सुरुवात झाल्यापासून जेव्हा युद्धाच्या बातम्या प्रसारित व्हायच्या तेव्हा सगळे कैदी टीव्ही आणि रेडिओ जवळ जमायचे.

या बातम्यांमधूनच त्यांना युद्धातली परिस्थिती कळत गेली आणि त्यांना वाटू लागलं आपणही लढायला जावं. म्हणायला गेलं तर हे शक्यच नव्हतं, पण तरीही त्यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना पत्र लिहिण्याचं ठरवलं आणि लिहिलंही.

त्या पत्रात नेमकं काय लिहिलं होतं,

”भले आम्ही खतरनाक गुन्हेगार असलो, आमच्या नावावर खून, दरोड्याचे गुन्हे दाखल झालेले असले, तरीही आम्ही देखील भारतीयच आहोत. आम्ही भारतात जन्मलो आहोत आणि हा जन्म सार्थकी लावण्यासाठी, भारतभूमीचं रक्षण करण्यासाठी मरायलाही तयार आहोत.”

पुढं कैद्यांनी असंही लिहिलं होतं की, ”आम्ही तुरुंगामध्ये गजांच्या आड असलो, तरी आमचं मन तिकडे कारगिल सीमेवर आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यामुळं देशात तणाव असला, तरी देशाचं नेतृत्व खंबीर आहे याची आम्हाला जाणीव आहे. कारगिलवर आपले सैनिक लढतायत, त्यांना बलिदान द्यावं लागतंय. आम्हाला तिकडे पाठवा, आम्ही त्यांच्या आधी मरणाला सामोरे जाऊ. आमच्या मरणानंतर तुम्ही जवानांकडे सूत्र द्या.”

रक्तदानाची आणि आर्थिक मदतीचीही तयारी

युद्धात अनेक जखमी जवानांना रक्ताची गरज पडत होती. तेव्हा तिहार तुरुंगातील कैद्यांनी गरज पडल्यास आम्ही रक्तदान करुन जवानांना रक्त पुरवू, असंही वाजपेयींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं होतं. सोबतच कैद्यांनी आपल्याला मिळणाऱ्या सक्तमजुरीच्या पैशांतून २१ हजार रुपये जमा केले आणि ते पंतप्रधान मदत निधीला दिले.

हे पत्र जेव्हा चर्चेत आलं तेव्हा काही लोकांनी कैदी शिक्षेतून सुटका मिळावी म्हणून हे सगळं करतायत अशी टीका केली. मात्र कैद्यांनी याचं उत्तरही दिलं होतं…

“कारगिल युद्धात आम्हाला मरण आलं तरी आम्ही हौतात्म्य स्वीकारू. जर जगलोच तर पुन्हा पूर्ण शिक्षा भोगण्यासाठी आम्ही तुरुंगात येऊ. आम्हाला देशासाठी लढतोय म्हणून कुठलीही सूट नकोय.” त्यांच्या या पत्राचं अनेक लोकांनी कौतुक केलं आणि कारगिल युद्ध जिंकल्यावर साऱ्या देशाप्रमाणं तिहारमध्येही आनंदोत्सव साजरा झाला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.