आत्ता दोस्ती दिसत असली, तरी भारत-पाकिस्तान क्रिकेट म्हणलं की हे पाच राडे आठवतातच
सध्या क्रिकेटवर्तुळात एकच चर्चा आहे, ती म्हणजे विराट कोहलीच्या फॉर्मची. २०१९ नंतर भावाच्या बॅटमधून शतक आलेलं नाही. गडी टीममध्ये राहतोय का नाही, इथवर विषय गेलेला असताना, पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमनं एक ट्विट केलं आणि विराट कोहलीला पाठिंबा दिला, विराटही त्याला थँक यु म्हणला.
इथं फॅन लोकांचे दोन गट पडले, एका गटाचं म्हणणं होतं बघा कशी या दोघांमध्ये दोस्ती आहे आणि दुसऱ्या गटाचं म्हणणं होतं की यांच्यात कशाला दोस्ती असायला पाहिजे ?
आता इतकी वर्ष झाली भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणलं की युद्ध असल्याचा फील देणाऱ्या बातम्या आपण बघत असतोय. त्यामुळं बाबर आझमनं विराट कोहलीनं गळ्यात हात टाकलेला फोटो टाकला की आपल्याला जावेद मियाँदाद आणि किरण मोरे आठवतात, आमिर सोहेल आणि व्यंकटेश प्रसाद आठवतात, शोएब अख्तर आणि सेहवाग आठवतात आणि गंभीर आणि शाहिद आफ्रिदीही.
आता या राड्यांच्या दरम्यान नेमकं काय झालेलं हे आपल्याला क्लिअर आठवत असेलही, पण जुन्या आठवणींना उजाळा देऊयात म्हणलं.
सगळ्यात गाजलेला विषय म्हणजे जावेद मियांदादच्या उड्या…
१९९२ चा वर्ल्डकप. रंगीत कपड्यात सगळ्या टीम भिडत होत्या. भारत पाकिस्तान मॅचचा माहोल ही एकदम कडक बनला होता. त्या मॅचमध्ये भारताची पहिली बॅटिंग होती, पाकिस्तानी खेळाडूंनी स्लेजिंग करण्यात अजिबात सुट्टी दिली नाही. मग भारताची टीम मैदानावर उतरली, तेव्हा किरण मोरेनं स्लेजिंगला सुरुवात केली. मियांदाद स्ट्राईकवर आला की, किरण मोरे त्याच्या पाठीच्या दुखण्याचा उल्लेख करुन टोमणे मारायचा. त्यानं प्लॅन करुन बॉलर्सला पुढं टप्पा ठेवायला सांगितला आणि साहजिकच मियांदादच्या पाठीवर भार येऊ लागला. चिडलेल्या मियांदादनं मोरेला शिव्या दिल्या.
नंतर एकदा मियांदाद रनआऊट होईल अशी स्थिती आली, मोरेनंच उडी मारुन स्टम्प उडवले होते. त्यानं जोरदार अपील केलं, पण हे अपील हे फेटाळलं गेलं आणि मियांदादनं हवेत उड्या मारत मोरेची नक्कल केली. त्याच्या या उड्या प्रचंड गाजल्या.
पुढं मात्र किरण मोरे पाकिस्तानला गेल्यावर मियांदादनं त्याला घरी जेवायला बोलावलं आणि पाहुणचारही केला.
दुसरा किस्सा आपल्या व्यंकटेश प्रसादचा…
स्लेजिंगच्या इतिहासात कुठल्या कडक कमबॅकची नोंद करायची झाली, तर त्यात हा किस्सा टॉपला येईल. १९९६ च्या वर्ल्डकपची क्वार्टर फायनल, दोन्ही टीम्ससाठी करो-या-मरो मॅच होती. आमिर सोहेल तगड्या फॉर्ममध्ये मारत होता, त्यानं भारताचा फास्ट बॉलर व्यंकटेश प्रसादला कव्हर्समधून खणखणीत बाऊंड्री मारली. त्या दोघांची बघाबघा झाली आणि सोहेलनं प्रसादला बॉलच्या दिशेनं इशारा केला.
प्रसाद दिसायला शांत असलं, तरी ते खवळलं आणि पुढच्याच बॉलला आमीर सोहेल बोल्ड झाला. विषय कट.
गंभीरचा विषय निघाला नाही, तर फाऊल ठरेल…
२००७ ची गोष्ट, तेव्हा पाकिस्तानची टीम भारत दौऱ्यावर वैगेरे यायची. कानपूरमध्ये वनडे मॅच सुरू होती. आफ्रिदी बॉलिंग करत होता आणि गंभीरनं त्याला एक जबरदस्त बाऊंड्री मारली. आफ्रिदीनं जरा गुर्मीतच त्याच्याकडे बघितलं. त्यात पुढच्या बॉलला रन पळताना, या दोघांची धडक झाली. आता गंभीर खवळला, दोघांनी एकमेकांना शिव्या दिल्या. सगळी पाकिस्तानी टीम गोळा झाली शेवटी अंपायरमध्ये पडले आणि मोठा मॅटर होता होता राहिला.
पण इतर क्रिकेटर्सची मैदानातली भांडणं मैदानातच राहतात, पण यांची भांडणं मात्र रिटायरमेंटनंतरही कायम राहिली. पुढं जाऊन गंभीर राजकारणात आला आणि खासदार बनला, आफ्रिदी काय राजकारणात नसला तरी काड्या करण्याचा स्वभाव कायम असल्याचं त्याच्या ट्विटरवरुन सहज लक्षात येतं. या दोघांमध्ये अजूनही शाब्दिक वॉर रंगतं.
कधी आफ्रिदी म्हणतो की, गंभीरकडे फक्त इगो आहे टॅलेंट नाही, तो काय भारी प्लेअर वैगेरे नाहीये. तर कधी गंभीर म्हणतो, ‘आफ्रिदीचं शारीरिक वय ३७-३८ झालं असलं, तरी त्याचं मानसिक वय १६ च आहे.’
चौथा राडा आपल्या ईशांत शर्माचा
तसं मैदानाबाहेर ईशांत शर्मा कधी फारसं बोलताना दिसताना दिसत नाही. पण तो गडी आहे दिल्लीचा. विराट कोहलीत कायम दिसणारं दिल्लीपण कधीकधी ईशांत शर्मामध्ये पण दिसतं. एकदा त्याच्या बॉलिंगवर कामरान अकमल आऊट झाला, पण तो नेमका निघाला नोबॉल. आता आपण आऊट होता होता राहिलोय, तर गप बसावं की नाही पण कामरान अकमलनं केल्या काड्या. मग ईशांतनं पुढच्याच बॉलवर त्याला चकवलं. मग दोघांनी आरडाओरडा केला.
आता ईशांत शर्माची उंची किती, अकमलची किती पण तरीही दोघं समोरासमोर आले, नेमके अंपायर मध्ये पडले आणि दोघांना शांत केलं. पुढं दोघांनाही दंड झालाच.
पाचवं नाव थोडं धक्का देणारं आहे, ते म्हणजे कपिल देव विरुद्ध माजिद खान
१९७८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध टेस्ट मॅच सुरु होती. भारताची अवस्था थोडी नाजूक होती कारण पाकिस्तानला २५ ओव्हर्समध्ये १२५ रन्स करायचे होते. त्यांनी हाणामारी केली असती, तर भारतावरचं प्रेशर वाढलं असतं. कॅप्टन बिशनसिंग बेदीनं कपिलला सांगितलं निगेटिव्ह लाईन पकड म्हणजे यांना मारता येणार नाही. कपिलचा टप्पा एकदम अचूक, स्ट्राईकवर असणाऱ्या माजिद खानला त्यानं लेग साईडला बॉलिंग टाकून टाकून इतका वैताग दिला की माजिद खान चिडला.
त्यानं थेट लेग स्टम्प उखडला आणि जिथून भारताच्या बॉलर्सचे बॉल जात होते, तिथं अगदी लेग साईडला नेऊन पुन्हा रोवला. सगळे प्लेअर जमा झाले, आता पाकिस्तानी फॅन्स म्हणतात कपिल आणि टीम इंडिया चीटिंग करत होती, तर भारतीय फॅन्स म्हणतात ही त्यांची रणनीती होती.
काहीही असुद्या राडा झाला हे फिक्स.
बाकी शोएब अख्तर आणि हरभजन, शोएब अख्तर आणि सेहवाग हे राडे इतक्या वेळा झाले की अख्तर आता टीम इंडियाचं कौतुक करताना थांबत नाही. पण ग्राऊंडवरचे सगळेच राडे आफ्रिदी आणि गंभीर सारखे कायम राहत नाहीत, पुन्हा दोस्ती होते पण ग्राऊंडच्या बाहेरच.
बोनस म्हणून आणखीन एक राडा वाचून घ्या
धोनी आणि रैनाच्या दोस्तीत बिचाऱ्या उमर अकमलचा बाजार उठला होता…
हे ही वाच भिडू:
- रागाने लालबुंद झालेला इंझमाम स्टेडियममध्ये घुसला आणि ‘आलू आलू चिडवणाऱ्याला धुतले.
- कॅप्टन विरोधी टीमचा असो किंवा आपला, गंभीरचं डोकं सटकलं की सुट्टी नाही… !
- पत्रकारांच आंदोलन झालं आणि दादांनी भारत पाकिस्तान मॅचची कॉमेंट्री मराठीत करायला लावली..