किशोर कुमार यांनी गायलेली तीनही मराठी गाणी चाहते विसरले नाहीत

 किशोर कुमार अभिनेता आणि गायक म्हणून तो लोकप्रिय होताच पण तो ‘all in one’ कलाकार होता. ‘सबकुछ किशोर कुमार ‘ अशी त्याची भन्नाट कामगिरी असलेले चित्रपट त्याने बनवले. आज किशोर च्या स्मृती दिनाच्या  निमित्ताने त्याने गायलेल्या एका मराठी गाण्याच्या निर्मीतीचा एक गमतीदार किस्सा पाहू यात. 

हिंदीतील प्रतिथयश कलाकारांनी त्यांच्या गायकीचे योगदान मराठीत दिले आहे.

वानगीदाखल सांगायचचं झालं तर अग पोरी संभाल दर्याला तूफान आय लई भारी (रफी), यश हे अमृत झाले (तलत), गोमू संगतीनं माझ्या तू येशील का (हेमंत कुमार),आईचा छकुला चिमुकला (गंगुबाई हनगल), उमटली रामाची पाऊले (जानकी अय्यर), रसिका तुझ्याच साठी (बेगम परवीन सुलताना), हसलीस एकदा भिजली (भूपिंदर सिंग), 

एकदा येवून जा (मुकेश) अधीर मन झाले (श्रेया घोशाल), मन पिसाट माझे अडले रे (कृष्णा कल्ले), जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला (गीता दत्त)निशिगंध तिच्या नजरेचा (एस पी बाल सुब्र्ह्मण्यम), ती येते आणिक जाते येताना कधी कळ्या आणते (महेंद्र कपूर) घन घन माला नभी दाटल्या (मन्नाडे). या अमराठी गायकांनी मराठीत अशी अनेक गाणी गायली आहेत.

 किशोरला मात्र मराठीत गाण्यासाठी त्याला विचारण्याचं धाडस कुणी करत नव्हतं. ते केलं अभिनेता सचिन यांनी! १९८६ साली सचिन ’गंमत जंमत’ या सिनेमाच्या निर्मितीत व्यस्त होता.यात अशोक सराफ वर चित्रीत होणार्‍या ’अश्विनी ये sss ना’ या गाण्यासाठी त्याला एक वेगळा प्रयोग करावासा वाटला. 

हे गाणे गाण्यासाठी आधी तो राहुल देव बर्मन यांच्या कडे गेला. पण पंचमने मी दुसर्‍याच्या संगीत नियोजनाखाली गाणार नाही असे सांगून टाळले. मग सचिन किशोरकुमार यांना अ‍ॅप्रोच झाला. त्याने ही मराठी गाणे गायला नकार दिला. यावर सचिन त्यांना म्हणाला ’दादा आप कई दिनोसे महाराष्ट्रा मे रहते हो.

क्या मराठी आपके लिए इतनी कठीण है?’  त्यावर किशोरचे उत्तर कायम होते ’मै मराठी वराठी मे नही गाउंगा’ सचिनने शेवटचे अस्त्र काढले तो म्हणाला ’दादा क्या आपको मराठी भाषा और उसके गाने फालतू लगते है?’ त्यावर किशोर म्हणाला ’ अरे ना बाबा ना..तौबा तौबा..  मै तो मराठी गानोंका बडा फॅन हूं’ असं म्हणत त्याने चक्क बाबूजींचे ’देहाची तिजोरी भक्तीचच ठेवा ’ हे गाणे गाऊन दाखवले.

किशोर पुढे म्हणाला ’ मै गा सकता हूं लेकीन मराठी के ’ळ’ और ’च’ ये दो अक्षर मै ठीकसे नही गा सकता.

सचिन यावर म्हणाला ’आपको तकलीफ देने वाले ये दोनो अक्षर नही होगे ऐसा गाना हम आपसे गवाके लेंगे’ गीतकार शांताराम नांदगावकर यांना ’ळ’ व ’च’ हि अक्षरे कमी असलेले  गाणे लिहायला सांगितले.

अनुराधा पौडवाल सोबत किशोरने गायलेलं गाणं सुपर डुपर हिट ठरलं. हे गाणे सिनेमात अशोक सराफ आणि चारुशीला साबळे वर चित्रित केले होते. गीत ध्वनीमुद्रीत (सं.अरूण पौडवाल) होत असतानाच्या किशोरच्या गमती जमती टिपण्यासाठी त्याचे चित्रीकरण केले. (असं मराठीत बहुधा पहिल्यांदाच झाले असावे!) ’गंमत जंमत’  हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला.

पुढे सचिनने त्याच्या ‘ भुताचा भाऊ’  चित्रपटातून ’अग हेsssमा माझ्या प्रेमा’, ’ हा गोरा गोरा मुखडा’ हि गाणी किशोरच्या स्वरात गावून घेतली.’अशी ही बनवा बनवी’ तील ’हि दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा’ हे गाणे सचिनला किशोरकुमार सोबत गायचं होतं.पण त्या पूर्वीच किशोरने अकाली एक्झिट घेतली. तरी पण केवळ तीन गाणी गावून किशोरने मराठी रसिकांना देखील खूष केले हे काही कमी नाही.

 आज किशोरच्या स्मृती दिनी  या अनोख्या पैलूचे दर्शन!

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.