शेतकऱ्यांनी वापरलेल्या डोकॅलिटीमुळं कापसाला सोन्याचा भाव आलाय
कापूस म्हणजे पांढरं सोनं. पेरणीपासुन विक्रीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी कापूस कायम चर्चेत असतो. त्यातच सध्या झालेल्या हवामान बदलांमुळे ऋतुचक्रामध्येही अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ आणि अतिथंडीचा कापसाच्या पिकाला बऱ्याचदा फटका बसतो.
एवढ्या संकटांचा सामना करुन शेतकरी बांधव कापूस पिकवतात. अनेकदा पिक काढायच्या आधीच त्यांना जबरदस्त नुकसान सहन करावं लागतं, सोबतच कापसाला बाजारात कमी भाव मिळाला की दुहेरी नुकसानाला सामोरं जावं लागतं. बाजारात कृषीमालाला मिळणारा दर यावर शेतकऱ्यांच्या आशा अवलंबून असतात.
सध्या हंगामाचा अंतिम टप्पा सुरू आहे, मात्र काही दिवसांपूर्वी कापसाचा दर घटला होता. मागणी कमी असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र अशावेळी शेतकऱ्यांनी नुकसान सहन करुन माल विकण्याच्या भानगडीत न पडता वाट पाहिली. त्यांनी साठवणूक केली आणि पुढच्या दोन दिवसांतच चित्र बदललं.
हंगामाच्या सुरुवातीला कापसाला चांगला भाव मिळाला. मात्र हंगामाच्या अंतिम टप्प्यात बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटलला ७ हजार पाचशे रुपयाच्या आसपास दर मिळत होता. हा भाव अचानक पडल्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड कापसाचं उत्पादन घेण्याची तयारी दाखवली होती. पण हिंमत न हरता शेतकऱ्यांनी संयम बाळगला आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहिली.
दोन दिवसांत काय खळबळ झाली
गेल्या दोन दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढली. साहजिकच दराने उचल खाल्ली आणि कापसाचा भाव दीड हजारांनी वधारला. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल ९ हजार रुपये, तर परभणीतल्या मानवतमध्ये ९ हजार ५० रुपये दर मिळाला आहे. सोबतच जर बाजारपेठेतून मागणी वाढली, तर दरही आणखी चांगल्याप्रकारे वाढतील अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मागणीत घट का झाली होती?
ओमायक्रॉन व्हायरसचा संसर्ग आणि जगभरातल्या विविध देशांनी लावलेले निर्बंध पाहता, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी घटली होती. याचा परिणाम स्थानिक सुतगिरण्यांवरही झाला आणि त्यांनी आपली उत्पादन क्षमता कमी केली. साहजिकच मागणी घटल्यानं कापसाचा भाव पडला. पण शेतकऱ्यांनी संयम बाळगल्यामुळं मागणी नसताना ज्यादा आवक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही.
देशातल्या सूतगिरण्या आणि कापड उद्योगात होणारा कापसाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शेतकरी दर कमी असताना साठवणूक करत असताना दर वाढत आहेत. साहजिकच अपार मेहनतीनंतर चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना आहे.
हे ही वाच भिडू:
- इंग्लिशचा गंधही नसलेला शेठजी तीन खंडाच्या कापूस व्यापाराचा बादशहा होता.
- ऐन थंडीत मराठवाडा, विदर्भामध्ये अचानक गारपीट होण्याचं कारण म्हणजे..
- राजाने आईचे दागिने गहाण ठेवले आणि राज्यातलं सर्वात मोठं धरण बांधून पूर्ण केलं..