महाराष्ट्रात पहिली एसटी धावली तेव्हा तिला पोलिस संरक्षण होतं…

महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणजे एसटी. कुणी लालपरी म्हणतं, तर कुणी लाल डबा. पोरांचे डबे पोहोचवण्यापासून म्हाताऱ्या कोताऱ्यांना देवदर्शन करून देणं असेल एसटी कित्येक पिढ्यांच्या प्रवासाची साक्षीदार ठरली.

महाराष्ट्रात पहिली एसटी कधी धावली असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे…

तर महाराष्ट्रात पहिली एसटी धावली ती १ जून १९४८ ला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या पुढच्याच वर्षी. ही एसटी धावली ती नगर ते पुणे या मार्गावर. नगरहून पुण्याला धावलेली ही बस बेडफोर्ड कंपनीनं बनवली होती. माळीवाडा ते पुण्याचं शिवाजीनगर स्थानक असा प्रवास या बसनं केला.

तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हतं, त्यामुळं बाँबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशनकडे नियोजनाचा विषय होता. पहिल्या एसटीबसला लाकडी बॉडी लावण्यात आली होती, तर त्याच्या आजूबाजूला कापडी कव्हर लावण्यात आलं होतं. त्यानंतर, भाषिक आधारावर राज्य पुनर्रचना झाली. मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या भागात वाहतूक सेवा देणाऱ्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन झाल्या आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावानं महामंडळाचा कारभार सुरु राहिला.

या एसटीचे चालक होते किसन राऊत, तर कंडक्टर होते लक्ष्मण केवटे. एका मुलाखतीत बोलताना केवटे यांनी एसटीच्या पहिल्या प्रवासाच्या आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणतात, ‘त्यादिवशी सकाळी आठ वाजता बेडफोर्ड कंपनीची तीस सीटर गाडी पुण्याकडे रवाना झाली. या मार्गाचं प्रवासी भाडं फक्त अडीच रुपये होतं. या प्रवासात चास, सुपा, शिरुर, लोणीकंद या प्रत्येक ठिकाणी लोक बस थांबवायचे आणि प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करत होते. जागोजागी सुवासिनी एसटीचं पूजन करत होत्या. रस्त्यावर पहिली बस धावत असल्यानं नागरिकांमध्येही उत्साह होता. ठिकठिकाणी बसचं स्वागत करण्यात येत होतं. शिवाजीनगर हा बसचा शेवटचा थांबा होता.’

ही बस पोलिस संरक्षणात का धावली?

केवटे सांगतात, ‘त्यावेळी अवैध वाहतूकही जोरात सुरु होती. त्यामुळं राज्य परिवहनची सेवा सुरू झाल्यानंतर, खासगी वाहतुकीचा धंदा बसणार अशी चर्चा होती. राज्य परिवहनला शह देण्यासाठी या बसवर हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळं माळीवाडा वेशीपासून ते पुण्यापर्यंत बस पोलिस बंदोबस्तात नेण्यात आली.’

पहिली एसटी बस लाकडी होती, तर आता शिवशाही, अश्वमेध अशा लक्झरी बसेस राज्य परिवहन महामंडळाकडं आहेत. गाव तिथं एसटी ही उक्ती एसटीनं खरी ठरवली आणि फक्त प्रवासाची ठिकाणंच नाही तर माणसं जोडण्याचंही काम केलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.