बाहेरगावी शिकणाऱ्या पोरांना घरचा डब्बा एसटीमुळे मिळू लागला. कारण ठरले वसंतदादा !

लोकनेते वसंतदादा पाटील. फक्त सातवी पर्यंत शिक्षण झालेलं पण पुस्तकं न वाचताही माणसं आणि माणसांचं मन वाचणारा नेता. सहकार क्षेत्राच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांना आलेलं व्यावहारिक शहाणपण हे एखाद्या विद्यापीठाच्या पीएचडी पेक्षाही जास्त होतं.

जे पोटात तेच ओठात  प्रवृत्तीचा हा विरळा राजकारणी माणूस.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मुशीत घडलेल्या वसंतदादा पाटलांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकार्य केलं, इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या. हीच राष्ट्रनिष्ठा त्यांनी पुढे राजकारणात आल्यावर देखील सांभाळली.

प्रचंड लोकसंग्रह हि त्यांची ताकद होती. मुख्यमंत्री बनल्यावरही त्यांचा अगदी तळातल्या कार्यकर्त्याशी संपर्क कधी तुटला नाही. ३७ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेलं काम हे आजही उभ्या महाराष्ट्रात आदर्श म्हणून ओळखलं जातं.

मुख्यमंत्री असतानाही दादांच्याकडे जाऊन कोणीही आपल्या कोणत्याही समस्या सांगू शकत होतं. सर्वांसाठी वर्षा बंगल्याचे दरवाजे अगदी  कोणी म्हणे, ‘दादा माझी दाढ खूप दुखते आहे हो, मुंबईतला कोणी नामवंत डॉक्टर सांगता का ?’ किंवा ‘माझी बायको नांदत नाही. तिला जरा समजावून सांगा आणि नांदायला लावा’ अशा खाजगी बाबींपासून ते कोणतं काम मुख्यमंत्र्यांनी करायचं असतं वा नसत याचा फारसा विवेक न बाळगता कुणीही त्यांच्या सरकारी निवासस्थानावरची बेल-घंटा वाजवू शकत असे.

हा मुख्यमंत्री आपल्याला भेटतच नाही अशी तक्रार कुणी करू शकत नसे. दादा असंही म्हणायचे, की ‘ज्याअर्थी तो व्यक्ती माझ्यासमोरच्या साऱ्या संरक्षक भिंती पार करून माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थच त्याचं काम त्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असू शकतं.’

 एखाद्या कामासाठी उगाचच फाटे फोडीत बसणाऱ्या एखाद्या आय.ए एस्. अधिकाऱ्याच्या फाईलवर आपला शेरा लिहिताना दादा लिहीत, या अधिकाऱ्याला कोणतेच काम नीट रितीने करता येत नाही. नुसत्या अडचणीच निर्माण करता येतात, मग त्याचा काय उपयोग? या अधिकाऱ्याची बदली करावी..

गावाकडून आलेल्या माणसांना अत्यंत चांगल्या प्रकारानं वागवलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असे.

त्यांचा लोकसंग्रह तर विलक्षण होताच, पण ‘शेतकरी’ हाच विकासाचा केंद्रबिंदू असायला हवा ही त्यांची ठाम धारणा होती. त्यांनी सर्वच क्षेत्रात सहकाराच्या क्षेत्राचं लोण पोहोचतं करण्यासाठी अथक स्वरूपाचे प्रयत्न केले. पूर्वी पाटबंधारे मंत्री म्हणून आणि पुढे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले. 

एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे हे त्यांना ठाऊक होतं. अगदी एखाद्या एसटी वाहकाला तब्येतीला त्रास होतो म्हणून त्याची बदली करण्या इतपत त्यांचे या महामंडळाकडे लक्ष होते. साठच्या दशकात त्यांनीच यशवंतराव मोहितेंच्या सांगण्यावरून पतंगराव कदमांना एसटी महामंडळावर नेमलं होतं. याच पतंगरावांनी एसटी खेडोपाडी पोहचवली.

पतंगरावांनी केलेली गाव तिथे एसटी हि घोषणा प्रत्यक्षात येण्यामागे वसंतदादा पाटलांचा सिंहाचा वाटा होता.

वसंतदादांनी एसटी संदर्भात केलेलं आणखी एक कार्य जे महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या विसरू शकत नाहीत. वसंतदादा याना स्वतःला आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नव्हतं. पण त्यांना शिक्षणाबद्दल मोठा जिव्हाळा होता. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी ते प्रयत्नशील होते. अनेक शिक्षणसंस्था, वसतिगृहे उभारण्यासाठी त्यांनी मदत केलीच.

त्या काळात कित्येक विद्यार्थी विद्यार्थिनी तालुक्याच्या गावी राहून शिक्षण घेत होते. पण या विद्यार्थ्यांना जेवणाची आबाळ होत होती. मुख्यमंत्री असताना वसंतदादांनी मनावर घेतलं कि या विद्यार्थ्यांना घरचं जेवण पोहचवायचं. त्यासाठी त्यांनी निर्णय घेतला की एसटी या शालेय विद्यार्थ्यांचे डब्बे मोफत वाहतूक करेल. घरून डब्बा नेला की तो या मुलांच्या शाळेत मोफत पोहचेल असा तो निर्णय होता. वसंतदादांच्या मुळे या मुलांना आपल्या आईच्या हातच जेवण खाता आलं. 

बाहेर गावी शिकतानाचा मुख्य अडसर दूर झाला. राज्यातल्या कित्येक पिढ्यानी याचा लाभ उठवला. आजही या पिढ्यांच्या एसटीशी आठवणी या जेवणाच्या डब्ब्याशी जोडल्या गेलेल्या आहेत.

तस बघायला गेलं तर हि छोटी गोष्ट पण असा निर्णय घ्यायला देखील संवेदनशील मन लागत आणि ते वसंतदादा पाटलांकडे होतं. आज इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसंतदादा पाटलांची आठवण का काढली जाते याच उदाहरण म्हणून त्यांनी असे घेतलेले निर्णय सांगितले जातात.

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.