फक्त मेस्सी, रोनाल्डोच नाही, या १० प्लेअर्ससाठी हा शेवटचा वर्ल्डकप ठरू शकतोय…

फुटबॉल वर्ल्डकप म्हणजे राडा विषय असतोय, कधी कुठल्या क्षणी मॅच फिरेल हे सांगता येत नाही त्यामुळं बघणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा या टीव्हीवर खिळलेल्या असतात. पण फुटबॉलची क्रेझ निर्माण होण्याचं एकमेव कारण म्हणजे प्लेअर्स.

आधीच्या पिढ्यांसाठी पेले, मॅराडोना, बेकहॅम, कॅस्सीलास हे हिरो होते, पण सध्याच्या पिढीसाठी या हिरोंची लिस्ट फार मोठी आहे. क्लब फुटबॉल काय वर्षभर सुरु असतंय, पण या हिरोंना देशासाठी खेळताना बघ्याची संधी तशी कमीच मिळते. वर्ल्डकपच्या निमित्तानं ४ वर्षांनी ही संधी मिळालीये खरी, पण यंदाचा वर्ल्डकप फुटबॉलमधल्या काही मोठ्या सुपरस्टार्सचा शेवटचा वर्ल्डकप ठरु शकतोय.

असे १० फुटबॉल प्लेअर्स बघुयात.

१) सर्जिओ बास्क्वेट:

स्पेन आणि बार्सिलोनाचा सुपरस्टार. डिफेन्सिव्ह मिडफिल्डर असणाऱ्या सर्जिओचं आत्ताचं वय आहे ३४. २०१० चा फिफा वर्ल्डकप आणि २०१२ चा युरो कप स्पेनलाजिंकून देण्यात सर्जिओचा मोठा वाटा होता. मात्र पुढच्या वर्ल्डकपवेळी त्याचं वय असेल ३८ आणि ३८ व्या वर्षी फुटबॉलसारखा दमवणारा खेळ खेळणं सोपं नाही, त्यामुळं साहजिकच सर्जिओला वर्ल्डकप गाजवण्याची ही शेवटची संधी असेल.

२) मॅन्युअल न्यूअर:

फुटबॉलमध्ये स्ट्राईकर जास्त लक्षात राहतात हे अलिखित सत्य आहे, पण या गोष्टीला अपवाद ठरणारे जे काही मोजके गोलकिपर्स आहेत त्यांच्यात टॉपला नाव येतंय, मॅन्युअल न्यूअरचं. २००९ पासून न्युअर जर्मनीची भिंत बनून उभा आहे. बायर्न म्युनिचकडून खेळतानाही त्यानं चांगलं यश मिळवलंय. न्युअर पुढच्या वर्ल्डकपवेळी ४० वर्षांचा असेल, त्यामुळं हा त्याचा शेवटचा वर्ल्डकप ऍपियरन्स ठरु शकतो आणि त्यानं तसे संकेतही दिले आहेत.

३) युतो नागामोटो:

३६ वर्षांच्या नागमोटोचा हा चौथा वर्ल्डकप आहे. जपानमध्ये फुटबॉल लोकप्रिय करण्यात नागमोटोचा मोठा वाटा आहे. आपल्या वयाबद्दल बोलताना त्यानं, ‘३६ वर्षांचा असलो, तरी मी फिट आहे’ असं वक्तव्य केलंय, पण ४० व्या वर्षी असाच फिटनेस राखणं काहीसं अवघड आहे एवढं नक्की.

४) रॉबर्ट लेवान्डोस्की:

पोलंडच्या सगळ्यात जास्त आशा कुणावर असतील तर लेवान्डोस्कीवर. बायर्न म्युनिचकडून लेवान्डोस्की नुकताच बार्सिलोनाकडे गेलाय. त्यामुळं वय झालंय असं म्हणता येत नाही, पण पुढच्या वर्ल्डकपला गडी ३८ चा असेल. त्यामुळं २००८ पासून सुरु असलेलं त्याचं इंटरनॅशनल करिअर शेवटच्या टप्प्यात असल्याचा अनेकांचा अंदाज आहे.

५) थियागो सिल्व्हा:

तुम्ही म्हणाल भिडू २०१८ ला पण चर्चा झालेलीच की. तेव्हा सिल्व्हा होता ३४ वर्षांचा, पण अनेकांचा अंदाज खोटा ठरवत वयाच्या ३८ व्या वर्षीही सिल्व्हा मैदानात उतरलाय. वय वैगेरे सगळे फॅक्टर्स बाजूला ठेवत सिल्व्हा आजही जगातला सगळ्यात बेस्ट डिफेंडर म्हणून ओळखला जातो. पण ४२ व्या वर्षी त्याला आत्ताचाच फॉर्म आणि फिटनेस राखता येईल अशी शक्यता कमीच आहे.

६) गॅरेथ बेल:

वेल्सचा कॅप्टन आणि सुपरस्टार. वेल्समध्ये फुटबॉल वाढवण्याचं आणि १९५८ नंतर पहिल्यांदा त्यांना वर्ल्डकपमध्ये पोहोचवण्याचं क्रेडिट बेलला जातं, आता ३३ वर्षांचा असलेला बेल पुढच्या वर्ल्डकपला ३७ वर्षांचा असेल. बेलला पुढच्या वर्ल्डकपला खेळताना पाहायचं असेल, तर त्याला फिट तर राहावं लागेलच पण वेल्सलाही टीम म्हणून आपला खेळ प्रचंड उंचवावा लागेल.

७) ल्युका मॉड्रीच:

२०१८ चा वर्ल्डकप आठवा. क्रोएशिया राऊंड ऑफ १६ मध्ये गेला तरी मिळवलं असं बोललं जात होतं, पण या अंडरडॉग टीमनं मोठा विषय करत थेट फायनलमध्ये धडक मारली. त्यांच्या या प्रवासाचं श्रेय जातं अर्थात गोल्डन बॉल जिंकणाऱ्या ल्युका मॉड्रीचला. जगातल्या टॉप मिडफिल्डर्समध्ये मॉड्रीचचं नाव येतं, पण आता ३७ वय झालेला मॉड्रीच पुढछ्या वर्ल्डकपमध्ये दिसायची शक्यता काहीशी कमीच आहे.

८) लुईस सुआरेझ:

तुम्हाला चावण्याचा किस्सा आठवला असेल तर तुम्हीच खरे चाहते. पण राड्यांचा विषय सोडला तर सुआरेझ काय कच्चा खिलाडी नाही. असिस्ट करण्यात तर त्याचा नाद नाहीच. सुआरेझ आता ३५ वर्षांच्या आहे, त्यामुळं इंज्युरीज बघता पुढच्या वर्ल्डकपमध्ये उरुग्वेकडे सुआरेझ असण्याचा चान्स नाहीत जमा आहे. 

९) ख्रिस्तियानो रोनाल्डो:

रोनाल्डोकडे खरं सगळं आहे, पैसा आहे, ट्रॉफ्या आहेत कुठली गोष्ट नाही तर वर्ल्डकप. सध्या मँचेस्टर युनायटेडसोबत झालेला राडा आणि गंडलेला फॉर्म या दोनच गोष्टींमुळं CR7 चर्चेत असला, तरी गडी काय लेव्हलची खळबळ करु शकतोय हे सगळ्या जगानं लय वेळा बघितलंय. त्यामुळं हाण की बडीव विषय करायला रोनाल्डो उत्सुक असेल. भाऊ आत्ताच वयाच्या ३७ व्या वर्षाला टेकलाय; त्यामुळं धुरळा करायचा हा लास्ट चान्स रोनाल्डोकडे आहे.

१०) लियोनेल मेस्सी:

LM10 कट्टर समर्थक कार्यकर्त्यांची भारतात कमी नाही. मेस्सी भोवती जसा आधी बार्सिलोना आणि आता पीएसजीचा विषय फिरतोय अगदी तसाच अर्जेंटिनाचाही. कोपा अमेरिका जिंकत मेस्सीनं वर्ल्डकप वरची दावेदारी आणखी स्ट्रॉंग केलीये, पण इतके वेळा हुलकावणी दिल्यानंतर आता मेस्सीला आपला हा शेवटचा वर्ल्डकप जिंकायचाच आहे. मेस्सीचं वय ३५ आहे आणि पुढच्या वर्ल्डकपला तो असेल ३९ चा. त्यामुळं मेस्सीसाठी हीच ती वेळ हाच तो क्षण.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.