गावातली मुलं IIT पास व्हावी म्हणून चार मित्र फुकटात शिकवत आहेत
दिवसेंदिवस महागाई पार टोकाला गेलीये, रोजच्या वापरातल्या गोष्टींपासून खाणं -पिणं ते पार शिक्षणापर्यंत सगळ्याच गोष्टी महाग झाल्यात. सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट कोलमडल्यानं लोक फॅमिली प्लॅनिंगपर्यंत विचार करायला लागलीत. म्हणजे आधी अनलिमिटेड वाली कन्सेप्ट ‘हम दो हमारे दो’ वर आली, आणि आता आपलं एकच बरं.
या वाढत्या महागाईत शिक्षण क्षेत्रसुद्धा मागे नाहीये, कारण आजकाल कुठल्याही चांगल्या शाळा- कॉलेजात जायचं म्हंटल की तुम्ही कितीही हुशार असाल, कितीही रँकिंग किंवा चांगले पर्सेंटेज मिळवलेले असाल, कॉलेजातल्या भरगोस फीच्या पुढं हे काहीच नाही. त्यात शिकवलेलं डोक्यावरून जातं म्हणून ज्यादाचे क्लासेस.
हे सगळं चित्र मिडलक्लास आणि हाय क्लास घराण्यातलं, जे कशीबशी जुळवाजुळव करून क्लासेसची फीस भरू शकतात. पण आर्थिक परिस्थिती पार कमकुवत असलेल्या कुटुंबातील मुलांना आधीच कॉलेजातली फीस भरता येत नाही, मग ते ज्यादाचे क्लासेस कुठून करणार? त्यामुळं या पोरांच्या जे हातात आहे, त्यावरूनचं कसबसं शिक्षण ते घेतात.
पण या मुलांना सुद्धा चांगल्या शिक्षणाचा अधिकार आहे.
या विचारानं मुंबईतल्या सुमित शर्मा, रोबिन मंडल, डॉ. अविनाश द्विवेदी आणि सौरभ संतोष या चार मित्रांनी मिळून काम करायचं ठरवलं आणि गरजूंसाठी ऑनलाईन क्लास सुरु केले.
हायस्कूलमधून पासआऊट झाल्यांनतर आयआयटी, एनआयटी, आयआयएससी, मेडिकल नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीमध्ये करियर करणाऱ्या मुलांसाठी हे ऑनलाईन क्लास सुरु केले. महत्वाचं म्हणजे हे चारही जण या फिल्डचेच आहेत. आपल्या फाउंडेशनतर्फे हे चारही जण ‘ग्रो भारत’ या आपल्या युट्युब चॅनेलवर तर शिकवतातच पण मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी आपलं कोचिंग सेंटर सुरु केलंय. शिवाय आपल्या या कोचिंगच्या शिकवणीतून वेळ काढून ते गरजूंसाठी फ्रीमध्ये ऑनलाईन क्लासेस घेतात.
यासंदर्भात सुमित यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं की, सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन बॅचमध्ये जवळपास २०० विद्यार्थ्यांना ते शिकवतात. त्यातल्या गरजू अशा ३० ते ४० जणांना ते टॅबपासून ते ऑनलाईन क्लासचं सब्स्क्रिप्शन सुद्धा देतात. फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत त्यांनी २५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी दिल्यायेत. कारण फक्त रेकॉर्ड केलेले व्हिडिओ या विद्यार्थ्यांसाठी पुरेसे नसतात. लाईव्ह शिकवणीतून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळाली पाहिजे.
सुमितच्या म्हणण्यानुसार या सगळ्या गोष्टी देण्याबरोबरचं घरातलं आणि आसपासचं वातावरण सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळं आम्ही विद्यार्थ्यांच्या आई – वडिलांबरोबर गावातल्या बड्या मंडळींसाठी सुद्धा काही स्पेशल सेशन्स घेतो. कारण गावातल्या विद्यार्थ्यांना आयआयटीचं शिक्षण घेता यावं आणि गावातून सुद्धा आयआयटीयन्स समोर यावेत, एवढाच आमचा हेतू आहे.
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील रहिवासी असलेला दीपेश. २०१९ मध्ये त्यानं JEE ची परीक्षा दिली होती. त्याचा अभ्यास चांगला होता, पण गावात जिल्हा परिषदेत शिक्षण झाल्यामुळं इंग्रजीचा प्रॉब्लम. त्यामुळे तो जेईईच्या परीक्षेत फेल सुद्धा झाला होता. त्यात पैशांची अडचण असल्यामुळं बाहेर क्लास लावता येत नव्हता. या सगळ्या गोष्टींमुळे एक वर्षाचा गॅप पडला.
तेव्हा त्याला समजलं की, जेईई सारख्या परीक्षांच्या तयारीसाठी ग्रो भारत नावाचा कोचिंग क्लास आहे. जो विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी देतो.
त्यानं लगेच रजिस्ट्रेशन केलं, दीपेशला आधी वाटलं की, हे मोफत क्लासेस मार्केटिंगसाठी थोड्या दिवसांसाठी चालतील आणि नंतर पुन्हा पैसे मागतील. पण आजचा परिणाम म्हणजे दीपेशने जेईईची परीक्षा पास केली आणि एनआयटी-रायपूरमध्ये ॲडमिशन मिळवलंय. महत्वाचं म्हणजे आपल्या गावातून एनआयटीमध्ये ॲडमिशन मिळवणारा तो पहिला विद्यार्थी आहे.
असे अनेक मुलं त्यांनी तयार केले आहेत आणि करत आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या फाउंडेशनने जवळपास १२० विद्यार्थ्यांना IIT, IISc, NIT, आणि अशा इतर संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास मदत केली आहे. सतत प्रयत्न करूनही, या मोफत ऑनलाइन वर्गांदरम्यान, त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. विशेषतः, इंटरनेट डेटा वापर. बर्याच वेळा स्लो इंटरनेटमुळे विद्यार्थ्यांना नीट क्लासेस जॉईन करता येत नाही.
तरीही अशांसाठी ते परत शिकवायलाही मागे पुढे पाहत नाहीत. शिवाय त्यांचं म्हणणं आहे की, आम्ही सर्व राष्ट्रीय सैनिकी शाळेतील मुलांना ऑनलाइन शिकवत आहोत, जेणेकरून आम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करू शकू. भारतातील सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा आमचा उद्देश आहे.
तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भारतातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत करणे हेच त्यांचं उद्दिष्ट आहे.
हे ही वाच भिडू :
- इमर्जन्सीमुळं चारपट पैसे द्यावे लागले म्हणून त्याने स्वस्त तिकिटाचं स्टार्टअप सुरु केलं
- विकिपीडियावरच ज्ञान आपल्या भाषेत देण्यासाठी राजू रात्रंदिवस फुकटात काम करतोय
- विदर्भाच्या पोट्ट्याचं जंगली मधाचं स्टार्टअप आदिवासींना सुद्धा चांगलं इनकम मिळवून देतंय