विकिपीडियावरच ज्ञान आपल्या भाषेत देण्यासाठी राजू रात्रंदिवस फुकटात काम करतोय

तुम्ही इंटरनेटवर जा आणि कुठलीही गोष्ट सर्च करा, त्याच्याशी संबंधित कित्येक लिंक्स आणि पेजेस समोर येतील. पण कितीही झालं तरी आपला विश्वास एकाच गोष्टीवर ते म्हणजे विकिपीडिया. जो जगताला सगळ्यात मोठा आणि फ्री असा एन्सायक्लोपीडिया आहे. जो आपल्याला कुठलीही गोष्ट त्याच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळा सकट सगळी माहिती देतो.

या विकिपीडियाबद्दल अनेकांना एक कुतूहल वाटतं कि, हे कसं काम करत, एवढी माहिती कोण देत. तुम्हला पण असे प्रश्न पडत असतील तर स्टोरीच्या खाली आपली बोल भिडूची लिंक देतेय ती वाचून आपल्या ज्ञानात भर टाका.

असो.. तर जोधपूर मधला राजू जांगीड याला सुद्धा विकिपीडियाबद्दल कुतूहल होत. तो २०११ मध्ये आठवीच्या वर्गात शिकत होता. एक दिवस असचं तो बॉलीवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीची बद्दल इंटरनेटवर माहिती शोधत होता. आता जस कि आधी सांगितलं , आपण कुठलीही गोष्ट इंटरनेटवर शोधली कि, त्याचा रिझल्ट आपल्याला आधी विकिपीडियावर दिसतो. 

त्यामुळं राजू सुद्धा जेव्हा अभिनेत्याविषयी माहिती शोधली तेव्हा विकिपीडियाचं पेज समोर आलं. याआधी त्यांनी कदाचित ही  गोष्ट नोटीस केली नसावी, पण नंतर जेव्हा कधी राजूनं कुठलीही गोष्ट इंटरनेटवर सर्च केली, ती त्याला विकिपीडिया पेजवरच दिसायची. त्यामुळं विकिपीडियाबद्दल क्युरॉसिटी तयार झालेली.

त्यांनतर पुढच्या काही महिन्यांमध्ये राजूने विकिपीडियाबद्दल सगळंकाही जाणून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे पेज कोणी तयार केलं, माहिती कशी घेतात, एडिट कोण करत आणि एकून संस्थेबद्दल. त्यावेळी त्याच्याकडं  काही स्मार्टफोन नव्हता, पण घरातल्या कीपॅड हँडसेटवर तो ही सगळी माहिती गोळा करायच्या मागे लागला. त्यात विकिपीडियावर कोणतीही व्यक्ती लिहू किंवा एडिट करू शकत होत, ही गोष्ट राजूला लय इंटरेस्टिंग वाटायची.

विकिपीडियाच्या या सगळ्या गोष्टींबद्दल इंट्रेस्ट वाढण्याचा परिणाम म्हणजे २२ वर्षाचा राजू आज हिंदी विकिपीडियाच्या समीक्षकांपैकी एक आहे. जवळपास १,८८० लेख त्यानं एडिट केलेत, तर ५७,००० पेक्षा जास्त लेख हिंदीमध्ये लिहिलेत. पण एवढ्या मोठ्या लेव्हलवर जाऊन पोहोचणं  सोपं नव्हतं.

कारण राजू हा साध्या शेतकरी कुटुंबातला,आपल्या पालकांना मदत करण्यासाठी त्याला शिक्षण सोडावं लागलं. त्यांच्या कुटुंबाकडे ७.५ एकर जमीन होती, पण त्यातून कुटुंबाचा खर्च भागेल एवढंही उत्पन्न मिळत नव्हतं. त्यामुळं घरच्यांनी राजूला काहीतरी जाऊन कमव असा आग्रह केला. म्हणून पुढे शिक्षण न घेता राजूने दहावीनंतर शाळा सोडली आणि गावात एका सुताराच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली. जिथे त्याला दर महिन्याला सात हजार रुपये मिळायचे.

पण त्याची  विकिपीडियावरची आवड कायम होती. त्यानं आपल्या हिंदी आर्टिकलच्या मदतीनं विकिपीडियासोबत काम करायचं ठरवलं. त्याने स्वतःसाठी आणि त्याच्या भावासाठी एक पेज तयार करून त्याची सुरुवात केली, ज्यामध्ये त्याने त्याच्या गावाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टीही लिहिल्या होत्या. पण, दुसऱ्याचं दिवशी ते सगळं डिलीट झालं. कारण वस्तुस्थितीचे समर्थन करण्यासाठी संबंधित ‘संदर्भ’ नसल्यामुळे एडिटर्सने ते आर्टिकल  हटवून टाकलं.

पण राजू तेवढ्यावरचं थांबला नाही. त्यानं दोन वर्षे सतत आपले आर्टिकल अपलोड करण्याचा प्रयत्न केला, या दरम्यान त्याला २०१३ आणि २०१४ मध्ये तीनदा ब्लॉक केलं गेलं. त्याला सांगितलं गेलं कि, त्याने लिहिलेले आर्टिकल निष्पक्ष आणि तटस्थ असण्याची गरज आहे. एवढंच नाही तर कुठल्या  व्यक्तीची किंवा सेलिब्रिटीची जाहिरात करू शकत नाहीत आणि आर्टिकलच्या विश्वासार्हतेसाठी उदाहरणं आणि संदर्भ देणं गरजेचं आहे.

त्यांनतर राजूनं २०१५ मध्ये नवीन अकाउंट तयार केलं आणि सगळ्या नियम आणि अटींचा वापर करून आर्टिकल लिहिण्याचा निर्णय घेतला. राजुने आपल्या गावच्या आणि  आसपासच्या भागातली तथ्य लिहायला सुरुवात केली आणि त्यांनतर फायनली एडिटरकडून होकार मिळाला. तेव्हा राजूने क्रिकेटबद्दल लिहायला सुरुवात केली. कारण त्याला स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट होता. मग हळूहळू त्यानं भूगोल, इतिहास आणि मनोरंजन यावरसुद्धा लिहायला सुरुवात केली.

राजूची विकिपीडियावर लिहायची सुरुवात झाली, पण अडचण अशी होती कि, त्याच्याकडे स्मार्टफोन नव्हता, त्यामुळं तो १५०-२०० शब्दांपेक्षा मोठं आर्टिकल लिहू शकत नव्हता.  या हँडसेटमध्ये सॉफ्टवेअर क्रॅश व्हायचं, ज्यामुळं सगळे फॅक्टस डिलीट होऊन जायचे. शेवटी कशीतरी जुळवाजुळव करून त्यानं एक स्मार्टफोन विकत घेतला, पण तरी तोच प्रॉब्लम यायचा. या स्मार्टफोनमध्ये त्याला ४०० शब्दांचं आर्टिकल लिहायला  मदत व्हायची. पण, संदर्भ आणि उदाहरणासाठी परत अडचण यायची म्हणून राजूने नवीन टॅब घेतला.

विकिपीडिया सोबत काम करताना पैसे मिळत नाही, त्यामुळं त्यानं सुतार म्हणून करत असलेलं काम सोडलं नव्हतं आणि राजुचा पगार आता १४ हजार रुपयांवर गेला होता. तो १०,००० रुपये त्याच्या आई-वडिलांना द्यायचा आणि बाकीचे पैसे स्वतःच्या खर्चासाठी ठेवायचा. रोज सकाळी ९ ते १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम आणि कामाच्या दरम्यान आर्टिकलसाठी वेळ काढायचा, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत लिहीत बसायचा.

२०१६ मध्ये राजूला पुण्यात झालेल्या हिंदी विकिपीडिया परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी दोन सदस्यांना राजूची आर्थिक स्थिती खराब असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी बाकीच्यांसोबत चर्चा केली. सगळ्यांनी मिळून राजूला लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन देण्यासाठी ‘डोनेट कॅम्प’ सुरु केलं. शेवटी ६ महिन्यांनी राजुला या दोन्ही गोष्टी मिळाल्या आणि तेव्हापासून राजूने हिंदी विकिपीडियावर मोठ-मोठे आर्टिकल लिहायला सुरुवात केली. आणि संपादक ते समीक्षकापर्यंतचा प्रवास गाठला.

२०१७ मध्ये राजूने शिक्षण घेण्यासाठी सुताराची नोकरी सोडली आणि कन्टेन्ट रायटर काम करायला सुरुवात केली. भलेही त्याला विकिपीडियावर लिहून काही पैसे मिळत नव्हते, पण तरीही त्याला त्यात इंटरेस्ट होता. कारण आपलं लिखाण लाखो लोकांपर्यंत पोहोचतंय यात त्याला आनंद होता. त्याच्या याच लिखाणाच्या जोरावर जोधपूरमध्ये त्याला चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा मिळाली आणि विकिपीडियानं त्याला समीक्षक म्हणून निवडलं. आता राजू दुसऱ्यांचे आर्टिकल तपासतो आणि ते दुरुस्त करतो.

भारतात यासाठी फक्त ११ जण आहेत. प्रादेशिक भाषांमध्ये माहिती पोहोचवण्याचं त्याच काम खरचं कौतुक करण्यासारखं आहे. अलीकडेच, राजूने SWASTHA – ‘हेल्थकेअर अ‍ॅफिलिएट्ससाठी स्पेशल विकिपीडिया अवेअरनेस स्कीम’ मध्येही योगदान दिलंय, जी हिंदीमध्ये COVID-१९ विषयी महत्त्वाची माहिती पुरवते.

यासंदर्भात एका वृत्तसंस्थेशी बोलताना राजूने म्हंटले कि, इंटरनेट युजर्सना ज्या विषयांचा अभ्यास करायचा आहे त्याबद्दल खूप सारी माहिती उपलब्ध आहे, पण ती इंग्रजी भाषेत आहे, हिंदीत नाही. त्यामुळं सामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही. म्हणून आपल्या भाषेत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी अनेकांनी समोर आलं पाहिजे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.