DDLJ च्या शाहरुख-काजोलप्रमाणे रेल्वे स्टेशनवर युवी आणि भज्जीची लव्हस्टोरी सुरु झाली.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. कपिल देव यांनी रिटायरमेंटनंतर चंडीगडमध्ये एक अकॅडमी सुरु केलेली. अंडर १५ ची मुलं तिथ शिकायला आलेली. पहिलाच दिवस होता. कपिल देव स्वतः तिथ हजर होते. निवड झालेल्या मुलांना ग्राउंडचे राउंड मारायला लावलेलं. सगळी पोरं धावत होती. काही राउंड झाल्यावर पोरांचा स्पीड कमी झाला.

एक बारीक मुलगा सगळ्यांच्या पुढे धावत होता.

अचानक एक कार मैदानाच्या शेजारी येऊन उभी राहिली. ती कार चालवणारा मुलगा सुद्धा फक्त १३-१४ वर्षांचाच होता. धावणारी मुलं या उशिरा आलेल्या आणि उगाच श्रीमंतीची ऐट दाखवणाऱ्या मुलाकडे रागाने बघत होती. तो कारवाला मुलगा त्या राउंड मारताना सगळ्यात पुढे धावत असलेल्या छोट्या सरदारजीकडे उत्सुकतेने बघत होता. त्याच्या मनात आल,

हा मुलगा धावतोय की फक्त चड्डी धावतीय? इतका बारीक आहे की तो दिसतच नाही.

राउंड पूर्ण झाल्यावर या सगळ्या मुलांना कपिल देव यांच्या समोर नेऊन उभ करण्यात आल. कपिल देव प्रत्येकाची ओळख करून घेत होते. प्रश्न इंग्रजीमध्ये विचारत होते. छोट्या सरदारजीला घाम फुटला. इंग्रजीच एक अक्षर आपल्याला समजत नाही. त्याने शेजारी उभ्या असलेल्या कारवाल्या ला विचारले की काय विचारत आहेत? त्यानं उत्तर दिल की,”पहेले नाम पुछ रहे है और फिर गांव”

सरदारजीने मनातल्या मनात उत्तरं पाठ केली. एकएक करत कपिलपाजी त्यांच्या जवळ आले. योगायोगाने त्यांनी सरदारजीला उलटे प्रश्न विचारले,

“where are you from? ”

उत्तर आलं,”हरभजनसिंग”

हे ऐकून काही मुलं खुदकन हसली. कपिल देवनां पण कळेना काय झालं. त्यांनी त्याला पुढचा प्रश्न विचारला,

“then what is your name? ”

हरभजननं उत्तर दिल,”जालंधर”

तिथ जमलेली सगळी पोरं जोरजोरात हसू लागली. कारवाला मुलगा सगळ्यात पुढ पडून पडून हसत होता.

नंतर कळाल की त्याच नाव युवराज सिंग आहे आणि माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि फिल्मस्टार योगराज सिंग यांचा तो मुलगा आहे. बापाच्या पैशावर ऐट करणाऱ्या फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या युवीबद्दल पहिल्याच भेटीत हरभजनच्या मनात अढी बसली.

दोघे एकत्र खेळू लागले. आता एवढ्या छोट्या मुलांच्या मनातली भांडण किती वेळ टिकणार. काही दिवसात हे सगळे गैरसमज दूर झाले. दोघांचीही घट्ट दोस्ती झाली. युवराज सिंग बट्समन तर हरभजन सिंग स्पिनर. दोघेही खोड्या काढण्यात एक नंबर. या खोड्यांनी त्यांच्यातली  गरिबीश्रीमंतीची दरी नाहीशी झाली.

कपिल देव अकॅडमीचा तो ग्राउंड त्यां दोघांच्या खोड्यांनी दुमदुमू लागला.

प्रॅक्टीस सेशन संपला की सगळे खेळाडू पूर्वी ज्या कारला नाव ठेवत होते त्या युवराजच्या मारुती कारच्या डिक्कीत टेपरेकॉर्डर लावून मनसोक्त नाचायचे. डीजे असायचा युवराज सिंग आणि डान्स स्टेप असायच्या हरभजनच्या.

पुढे पंजाबच्या अंडर १६ क्रिकेट टीममध्ये त्या दोघांचीही निवड झाली. चंडीगड मध्ये आल्यावर भज्जी युवीच्याच घरी उतरू लागला. मचसाठी देशभर फिरण सुरु झालं. कधी बसच्या टपावर बसून तर कधी रेल्वेने त्यांचा प्रवास व्हायचा. सोबत असायची क्रिकेट कीट आणि युवराजचा वॉकमन.

मस्त दंगा करत गाणी गात ते सगळीकडे फिरायचे.

एकदा चंडीगडहून हैदराबादला ते निघाले होते. कुठल्यातरी स्टेशनला हरभजन उतरला. त्याने युवराजबरोबर पैज लावली की मी रेल्वे बरोबर रेस लावणार. त्याला युवीने बराच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण जास्त काही जमल नाही. ट्रेन सुरु झाली. भज्जी ग्राउंडमध्ये राउंड मारल्याप्रमाणे जीव तोडून धावू लागला. सुरवातीला तो चांगला धावला पण जेव्हा ट्रेनने स्पीड पकडला तेव्हा मात्र भज्जीच्या तोंडाला फेस आला.

कसबस युवीन त्याला ओढून आत घेतल. हरभजन म्हणतो,

“युवीने मेरी जान बचायी. तभीसे डीडीएलजेके शाहरुख काजोल के जैसी हमारी लव्हस्टोरी भी शुरू हो गयी.”

आज इतकी वर्षे झाली, दोघे इतके वर्ष एकत्र खेळले, अनेक विक्रम केले-मोडले. जगभरात अनेक देशांना हरवलं. दोन वर्ल्डकप एकत्र उचलला. मात्र त्यांच्या दोस्तीत कधी खंड पडला नाही. युवी-भज्जी लव्हस्टोरी अजूनही सुरु आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.