चहासोबत त्याची भांडी सुद्धा खाता येणाऱ्या स्टार्टअपमधून भिडूनं लाखोंची उलाढाल केलीये

आपल्या इथे ना एक धार्मिक कथा आहे गणपतीची, जी आपण ‘माय गणेशा’ या ऍनिमेशन चित्रपटात सुद्धा पहिली. आता सुरुवातीला वाचून बोर वाटतंय म्हणून लगेच स्टोरी वाचन बंद करू नका. कारण काय माहित पुढची इंटरेस्टिंग स्टोरी तुमचं लाईफ चेंज करेल.

तर, एक दिवस धनाचा राजा कुबेर कैलास पर्वतावर गेला. कुबेराला आपल्या संपत्तीचा मोठा गर्व होता. त्याला आपलं ऐश्वर्य भगवान शंकरांना दाखवायचं होत, म्हणून त्याने गोड बोलून भगवान शंकर आणि पार्वती मातेला आपल्या महालात जेवणासाठी आमंत्रण दिल. आता कुबेराच्या या आमंत्रणामागचा हेतू शंकरांना माहित होता, म्हणून त्यांनी कुबेराचा हा गर्व मोडण्यासाठी गणपतीला महालात जेवायला पाठवलं. 

गणपती आपल्या मूषकराजासोबत कुबेराच्या महालात जेवायला गेले. गणपतींच्या पाहुणचारासाठी कुबेराने पंचपक्वान्न बनवून ठेवलेली. शाही अंदाजात गणपती आणि मूषकराजाचं स्वागत झाल्यावर दोघं पाहुण्यांना कुबेराने जेवायला बसवलं.

आता कुबेराला वाटलं लहान पोर खाऊन खाऊन किती खाणार. पण कुबेराची खोड मोडायची होती म्हंटल्यावर गणपतींनी एकामागून एक करत तयार असलेलं सगळं जेवण संपवलं. कुबेराला जरा आश्चर्य वाटलं पण त्यानं स्वयंपाक्यांना परत जेवण बनवायला सांगितलं पण गणपतीने ते सुद्धा संपवलं. पुन्हा स्वयंपाक करत करत कुबेराचा सगळं धान्य संपलं पण गणपती आणि मूषकराजाची भूक काही संपली नाही शेवटी गणपतींनी कुबेराच्या महालातली भांडी खायला सुरुवात केली. आता कुबेराचा गर्व चांगलाच मोडला आणि त्याने माफी मागितली.

आता आपण ही कथा म्हणून घेतली, बरं कुठल्याही गोष्टीचा गर्व करायचा नाही ही शिकवण सुद्धा घेतली. पण दिल्लीतल्या एका भिडूनं ती भांडी खायची गोष्ट जास्त मनावर घेतली आणि खाणारी भांडी बनवणार स्टार्टअप सुरु केलं. आता ऐकायला जरा विचित्र वाटेल पण हो दिल्लीत रहाणाऱ्या पुनीत दत्त यांनी एडिबल कप आणि भांडी बनवणार ‘अटावेअर’ हे स्टार्टअप सुरु केलंय. ज्यातून लाखो रुपयांची उलाढाल होतेय. 

तर एमबीए ग्रॅज्युएट असणारे पुनीत दत्त यांनी मार्केटिंग आणि व्यवसाय क्षेत्रात बऱ्याच वर्षांपासून काम केलंय. त्यांच्या आयुष्यात सगळं ठीक ठाक सुरु होत. चांगली नोकरी होती, ज्यातून चांगले पैसेही मिळायचे. त्यामुळे कोणती अडचण नव्हती. त्यामुळे व्यवसायाची कुठलीही कल्पना त्यांच्या डोक्यात नव्हती. 

अश्यातच काही वर्षांपूर्वी त्यांचं सगळं कुटुंब दिल्लीहून वृंदावनला जात होत. वाटेत यमुना नदी लागली. आता भारतातल्या नद्यांची अवस्था सगळ्यांनाच माहितेय. पुनीत यांना सुद्धा यमुनेत काहीतरी वाहत जाताना दिसलं. पुनीत याना ती गोष्ट थोडी अनकॉमन वाटली. त्याची लांबी खूप जास्त होती. त्यामुळे ती  गोष्ट पाहण्यासाठी पुनीत तिथेच थांबले आणि बाकीच्या लोकांना निघायला सांगितलं.

नदीजवळ पोचल्यावर पुनीत यांनी पाहिलं की, ती लांबलचक वस्तू थर्माकोल होती. आता देशात कित्येक वर्षांपासून प्लास्टिकमुक्त अभियान सुरू आहे. पण अजूनही कचऱ्याचं, प्लॅस्टिकचं साम्राज्य आहे. ते थर्माकोल पाहून पुनीत  बराच वेळ विचार करत होतो की आजपर्यंत आपण जे काही करत आहोत ते वेस्ट आहे. या समस्या सोडवण्यासाठी कोणी दुसरं येणार नाही, आपण स्वतःच ते दूर करायला पाहिजे. 

असा विचार करून पुनीत वृंदावनात गेले. तिथं भान्डर होता पण सगळ्या प्लेट- डिश संपल्या होत्या. प्रसाद कसा घ्यावा हे समजत नव्हते. मग मी पाहिले की एक बाबा जी पुरी गोलाकार करून त्यात भाजी घालून खात होते. त्यांना कोणत्याही डिशची गरज नव्हती. हीच गोष्ट पुनीत यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली आणि त्यांनी वेगळा प्लॅन बनवला.

 

त्यांनतर पुनीत यांनी खाण्यायोग्य प्लेट्स आणि कप्सवर काम करायला सुरुवात केली. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची माहिती गोळा केली. त्यांची कन्सेप्ट समजून घेतली. खूप रिसर्च केला. त्यासाठी मोठं बजेटही काढण्यात आला. 

आता पुनीत यांच्या लक्षात आले की, जे लोक आधीच खाण्यायोग्य कप किंवा प्लेट्स बनवत आहेत ते खाण्यासाठी टिकाऊ किंवा पूर्णपणे सुरक्षित नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यावर आणखी रिसर्च केला. त्यात त्यांना एकदा एक माणूस भेटला, जो गुळाचा वापर करून बनवलेली इमारत दाखवत होता. सुरुवातीला पुनीत यांना सुद्धा ही गोष्ट विचित्र वाटली. पण तेव्हा सजमले कि, आधीपासूनच गुळापासून अशा वस्तू बनत आल्यात आणि  गुळात असा गुणधर्म आहे की तो गरम वस्तू देखील दीर्घकाळ सहन करतो. आणि  त्यानंतर पुनीत यांनी गुळापासून खाण्यायोग्य कप आणि वाटी बनवण्याचा प्लॅन सुरू केला.

२०१९ मध्ये पुनीतने नोकरी सोडली आणि आटवेअर नावाने स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. गूळ आणि धान्यापासून बनवलेले कप, ताट, चमचे ते बनवू लागले. मग वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून मार्केटिंग सुरू केले. हळूहळू त्यांना चांगला प्रतिसादही मिळू लागला, पण खर्चानुसार कमाई होत नव्हती.

 

त्यांनतर एका संस्थेने पुनीत यांना त्यांच्या प्रदर्शनात बोलवलं. तिथे पुनीत यांनी आपला एक स्टॉल लावला. त्यांचा स्टार्टअप खूप इंट्रेस्टिंग होता म्हणून दिल्लीतल्या एका युट्युबरने पुनीत यांच्या या एडिबल भांड्यांचा एक व्हिडिओ बनवला. पुनीत यांनी या व्हिडिओकडे फारसे लक्षही दिले नाही, पण काही दिवसांतच तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांना एकामागून एक अनेक कॉल येऊ लागले. तेव्हापासून पुनीत यांच्या कामाला स्पीड आला. अनेक मोठ्या कंपन्यांनी पुनीत यांच्या कंपनीशी टायअप केला आणि काही महिन्यांतच पुनीत यांच्या कामाला ओळख मिळाली. 

 पण नंतर २०२० साली कोरोनाचा फटका पुनीत यांच्या व्यवसायाला सुद्धा बसला. कोणतेही उत्पादन बाहेर गेले नाही. एक्सपायर होण्याच्या भीतीने पुनीत यांनी आपली सगळी उत्पादने गोठ्यात नेऊन गायींना खायला दिली. त्यानंतर त्यांनी आपली स्ट्रॅटेजीच बदलली आणि चहाच्या कपवर फोकस केलं.  कारण देशात जर कोणती गोष्ट सर्वात जास्त वापरली जाते तर ती चहाचा कप आहे.

यानंतर पुनीत यांनी मोठ्या प्रमाणात चहाचे कप तयार केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंगवर भर दिला. लवकरच त्यांना ऑर्डर मिळू लागल्या आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा एकदा चालायला झाला. साथीच्या आजारानंतरही त्यांनी दुसऱ्या लाटेत ३ ते ४ लाख रुपयांचा नफा कमावला. त्यानंतर अनेक चहा विक्रेते त्यांच्याकडे आले. मोठमोठे दुकानदार, हॉटेलवाले यांच्याशी त्यांनी डील केली. ज्याचा व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप फायदा झाला.

 

पुनीत यांनी एक वृत्तसंस्थेला सांगितले कि,

 मार्केटिंगदरम्यान आम्हाला चहा विकणाऱ्या दुकानदारांकडून फीडबॅक मिळाला. ते म्हणाले की लोक ग्रुपमध्ये चहा प्यायला येतात आणि वेगवेगळ्या व्हरायटीची मागणी करतात. काहींना आल्याचा चहा लागतो, काहींना इलायची, काहींना नॉन शुगर. अशात त्यांना वेगवेगळ्या फ्लेवरचा चहा बनवण्यात अडचण येते. त्यामुळे मी कपची व्हरायटी वाढवण्याचा निर्णय घेतला जेणेकरून वेगवेगळ्या फ्लेवरचा चहा बनवण्याचे टेन्शन राहणार नाही.

यानंतर त्यांनी ९ वेगवेगळ्या व्हरायटीचे कप बाजारात आणले. त्यात आले, वेलची, कॉफी, व्हॅनिला, तुळस यांसारखे फ्लेवर्स असतात. त्यात सामान्य चहा भरून त्याची टेस्ट कपाच्या चवीनुसार केली जाते.

पुनीत सांगतात कि,

चहा पिऊन झाल्यावर वापरल्यानंतर आम्ही लोकांना कपही खाण्याचा सल्ला देतो, पण अनेकांना ते खायला आवडत नाही. दोन्ही स्थितीत कोणतीही अडचण नाही. खाल्लं तरी चांगलं आहे आणि कुठेतरी फेकलं तरी हरकत नाही. कोणताही प्राणी जो ते खातो त्यांना फायदा होईल. आणि कुजलं तरी त्यामुळे काही नुकसान होत नाही. पण, आम्ही लोकांना तो कप दुसरीकडे फेकण्याऐवजी जनावरांना खाता येईल अशा ठिकाणी फेकण्याचा सल्ला देतो.

पुनीत यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी बनवलेल्या भांड्यात एखादी गरम गोष्ट ५-६ तास ठेवता येते. त्यावर कोणताही परिणाम होणार नाही. इतकंच नाही तर ते ६ महिने वापरता येते आणि ते खाल्ल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही. आणि राहिला प्रश्न किंमतीचा तर एका कपची किंमत १० ते १२ रुपये आहे.

पुनीत यांच्या उत्पादनांना भारताबरोबरच परदेशातही मागणी आहे. दररोज त्यांना शेकडो ऑर्डर मिळत आहेत. यातून ते वर्षाला ७० ते ८०  लाख रुपयांचा व्यवसाय करत आहेत. या स्टार्टअपमुळे त्यांनी ५०  जणांना नोकऱ्याही दिल्या आहेत.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.