युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठ्यामुळे रशिया युक्रेनच्या जीवावर उठलाय
रशिया युक्रेन युद्धात रोजच काही ना काही अँगल समोर येत आहेत. त्यातलंच एक म्हणजे लिथियम. रशिया ज्या युक्रेनच्या जीवावर उठलंय त्या युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठा आणि याचमुळे युद्ध होतंय असं म्हणलं तर अतिशियोक्ती वाटायला नको..युक्रेनमध्ये जमिनीच्या खाली अफाट खनिज संपत्ती आहे. आणि याच खनिज साठ्यावर डोळा असलेल्या रशियाला युक्रेनवर ताबा मिळवायचा आहे. जेणेकरून भविष्याच्या चाव्या रशियाच्या खिश्यात असतील…
असो थेट मुद्द्यालाच सुरुवात करूयात..
रशिया युक्रेनमध्ये करत असलेल्या हल्ल्यामागे अनेक कारणे सांगितली जात असली तरी एक मोठे कारण आहे ते म्हणजे युक्रेनमध्ये असलेला खनिजांचा खजिना. युक्रेनच्या संशोधकांचं असं म्हणणं आहे की, युक्रेन देशाच्या पूर्वेकडच्या भागात जवळपास ५ लाख टन लिथियम ऑक्साईडचा सोर्स आहे. युक्रेनमध्ये असलेला लिथियमचा साठा हा जगातील सर्वात मोठा साठा असल्याचा दावा देखील हे संशोधक करतात. त्यांचा दावा लक्षात घेतला तर बरेच अर्थ त्यातून निघू शकतात.
बरं रशिया करत असलेल्या हल्ल्याचे हे एकच कारण असू शकत नाही, हे ही लक्षात घ्यायला पाहिजे की, रशियासाठी युक्रेनचा खनिज साठा इतका महत्वाचा का आहे ?
रशियाचा युक्रेनवर हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे त्यांच्या देशात असलेल्या खनिजांच्या बळावर क्लीन एनर्जी क्षेत्रात युक्रेनला एक मोठा प्लेयर बनवण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग काय जगभरातील देशांच्या नजरा युक्रेनच्या याच खजिन्यावर गेल्या आहेत….
त्यासाठी हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की या लिथियमचं महत्व काय आहे आणि त्याचा वापर कुठे होतो?
हे तर आपल्याला माहितीच आहे की, पट्रोल- डिझेलच्या गाड्या प्रदूषणासाठी हानिकारक असतात. आणि याचमुळे जगातील सर्वच देश पर्यावरणाला स्वच्छ ठेवण्यासाठी भविष्याचा विचार करून, पुढच्या पिढीचा विचार करून इलेक्ट्रिक वाहनांमध्ये मोठी गुंतवणूक करतायेत. एकट्या चीनने तर २०३० पर्यंत देशात ४० टक्के इलेक्ट्रिक कार्स आणि बाईक्स असतील याचं टार्गेट ठेवलं आहे.
आता विषय येतो या लिथियमचा वापर कश्यात होतो ?
जसं कि आपण बोललो, एकविसावं शतक पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहे. आणि याच इलेक्ट्रिक व्हेइकल्समध्ये जी लॉन्ग लास्टिंग बॅटरी आहे ती बॅटरी बनवण्यासाठी लिथियमचा वापर केला जातो. शिवाय लिथियमची बॅटरी पर्यावरणाला कमी घातक असते.
१८१७ मध्ये लिथियमचा शोध लागला. स्वीडनच्या जोहान अर्फवादसुन व जोन्स बर्झेलिस या दोन रसायनतज्ज्ञांनी या धातूला स्टॉकहोम द्वीपसमूहातील एका खाणीतून शोधून काढले होते. लिथियम हा एक असा धातू आहे जो वजनाने आणि खूपच हलका आहे पण त्याची ऊर्जा साठवून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते.
२०व्या शतकाच्या अगदी शेवटी वजनाने हलक्या व कार्यक्षम लिथियम बॅटरीच्या निर्मितीमुळे मोबाईल क्रांतीची मुहूर्तमेढ रचली गेली. या बॅटरीच्या शोधामुळे इलेक्ट्रॉनिक जगामध्ये एक नवीनच पर्व सुरू झालं. ही बॅटरी पहिल्यांदा मार्केटमध्ये १९९१ साली आली व त्यावेळेपासून साऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा आकार कमी कमी होत चाललेला आहे. आपले मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर्स लॅपटॉप्स..कॅमेरा वजनाने हलके व स्लिम होत गेलेत.
लिथियम हे काय फार दुर्मिळ संसाधन नाहीये पण येणारं भविष्य पाहता आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या वाढत्या मागण्या पाहता लिथियमला खूप डिमांड येईल. गेल्या वर्षभरात लिथियमच्या किमती ६००% टक्क्यांनी वाढल्या आहेत. जेंव्हा जेंव्हा पेट्रोल- डिझेल महाग होतं तेंव्हा तेंव्हा पेट्रोलियम पदार्थाना पर्याय शोधण्याचा प्रयत्न होतो आणि हे आत्ताचं नाही तर अनेक दशकांपासून चालत आलंय.
पेट्रोलियम पदार्थांपासून मिळणारी एनर्जी हि लिमिटेड आहे. कधीही संपू शकते….कोळसाही आपल्याला काय सदासर्वकाळ पुरणार नाहीये.. ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आपल्याला अनेक अपारंपरिक प्रकारच्या उपाययोजना करतच राहाव्या लागणार आहेत आणि त्या गरजेच्या आहेत…आणि हीच गरज लक्षात घेऊन आणि युक्रेनची लिथियम उत्पादनाची क्षमता लक्षात घेऊन रशिया हे साठे आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांचा प्लॅन या युद्धाचं एक महत्वाचं कारण आहे हे मात्र नक्की. आणि यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर मोठा परिणाम होणार आहे.
आणखी एक म्हणजे युक्रेनमध्ये पॅलेडियम आणि निऑन या विशेष सेमीकंडक्टर धातूचं प्रॉडक्शन होतं. साहजिकच आहे युक्रेनमध्ये जे लष्करी हल्ले होत आहेत आणि त्यामुळे या धातूंच्या प्रॉडक्शनवर परिणाम होऊन सेमीकंडक्टर टंचाईचे हे संकट आणखी वाढणार आहे.
हे हि वाच भिडू :
- जगात कितीही राडा होऊ द्या, आपला न्यूट्रल राहण्याचा स्टॅन्ड स्वित्झर्लंड कधीच सोडत नाही
- युद्ध आणि राजकारण सोडा, तुमच्या आमच्या गरजेचे महाराष्ट्रातले हे मुद्दे नजरेतून सुटलेत
- जडेजा १७५ रन्सवर असताना डाव घोषित झाला आणि नॉटआऊट १९४ रन्सवाला सचिन आठवला…