जिची भाकितं वाचून लोक घाबरतात त्या बाबा वेंगाच्या भाकितात किती तथ्य असते?

आज पहिल्यांदाच रील बघायचं सोडून मोबाईलवर बातम्या वाचत होतो. वाचता वाचता एक बातमी समोर आली. ‘२०२३ साल जगासाठी धोक्याचं… वाचा काय महाभयंकर होणार…’ थोडं घाबरत घाबरत बातमी वाचली. बातमी वाचल्यावर आणखी घाबरलो…

कारण बातमीत लिहीलेलं की, २०२३ मध्ये पृथ्वीवर एलियन्स येणार! सौरवादळानं पृथ्वीवासी ग्रासणार! बायो हत्यारांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार! अणू हल्ला होण्याची शक्यता! हे येवढं सगळं २०२३ मध्ये होणार?

मी घाबरलेलो तर खरा पण, म्हणलं एकदा आणखी कुणी अशी बातमी लिहीलीय का बघावं… म्हणून सर्च केलं तर, जवळपास सगळ्याच न्यूज पोर्टल्सनं ही बातमी लिहीली होती. आता माझी चांगलीच टरकली. पण, या बातम्या वाचताना एक नाव मला सगळीकडे दिसलं…

ते म्हणजे ‘बाबा वेंगा’.

आता ही बाबा वेंगा कोण तर, या सगळ्या न्यूज पोर्टल्सनं या बाबा वेंगा या स्त्रीच्या भाकितांनुसारच या बातम्या लिहील्या होत्या… म्हणून मग,या बाबा वेंगाच्या भाकितांमध्ये काय अन् किती सत्य आहे ते शोधावं म्हणून बाबा वेंगा कोण, तिच्या भाकितात किती सत्य? अन् तिची किती भाकितं खरी ठरली ते शोधायचा प्रयत्न केला…

आधी बघुया ही बाबा वेंगा नेमकी कोण आणि कुठली…

आता बाबा म्हणलं तर, ती भारतातली कुणी साधवी असं वाटेल पण, तसं नाहीये. पाश्चात्य देशांतल्या मीडियानुसार, बाबा वेंगा ही एक फकीर होती. बल्गेरीयात ३ ऑक्टोबर १९११ रोजी तिचा जन्म झाला. या बाबा वेंगाच्या वयाच्या १२ व्या वर्षीच तिची दृष्टी गेली. बल्गेरीयामध्ये राहणाऱ्या या स्त्रिचं असं म्हणणं होतं की, तिची दृष्टी गेली असली तरी ती भविष्यात होणाऱ्या घटना स्पष्टपणे बघू शकते.

१९८० च्या दशकाच्या शेवटी-शेवटी ती पूर्व युरोपमध्ये तिच्या ऐकीव क्षमता आणि भविष्य बघण्याच्या शक्तीमुळे प्रसिद्ध झाली होती. झेनी कोस्टाडिनोव्हा यांनी १९९७ मध्ये दावा केला की, लाखो लोकांचा असा विश्वास आहे की तिच्याकडे अलौकिक शक्ती आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिचे ८५ टक्के अंदाज खरे ठरलेत, पण तिचे अनेक दावे फोलसुद्धा गेलेत. असं म्हणलं जातं की, बाबा वेंगा हिला जगाबद्दल जे भविष्य दिसत गेलं ते भविष्य ती सांगत गेली. तिच्या अनुयायांनी ते भविष्य लिहून काढलेलं आहे. पण १९९६ मध्येच तिचा मृत्यू झाला. मरण्याआधी तिने ५०७९ सालापर्यंतचं भविष्य सांगून ठेवलं आहे. तिचं असं म्हणणं होतं की, ५०७९ साली जगाचा अंत होणारे.

या बाबा वेंगाने केलेल्या भाकितांबाबत काय आहे तथ्य?

  • आता मुख्य विषय असा आहे कि, तिने सांगितलेली भवितव्य कुठे लिहून ठेवलीत हे आजवर कुणालाही नीटसं सांगता आलं नाहीये. आता तिचे कोणते दावे खरे ठरले किंवा, किती दावे खरे ठरले यापेक्षा महत्वाचं हे आहे की… तिने केलेले दावे आजवर लिखित स्वरुपात कुणीही पाहिलेले नाहीत.
  • दुसरा महत्त्वाचा विषय असा की, काही वेबसाईट्स आणि अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार हे भविष्य नाही तर, विज्ञान आहे. जसं, ‘पृथ्वीवर जलप्रलय येईल’ हे सांगण्यासाठी काही भविष्य पाहायची गरज नसते. तर, जलप्रलय येणं ही निसर्गाचा आणि पर्यायानं विज्ञानाचा भाग आहे. पृथ्वीवर मनुष्यांनी केलेल्या निसर्गाच्या ऱ्हासामुळे भविष्यात आणखीही नैसर्गिक आपत्ती येणारच आहेत हे सांगण्यासाठी भविष्य पाहता येण्याची गरज नाही.
  • असाही दावा केला जातो कि, ‘एखादी घटना घडून गेल्यानंतर बाबा वेंगाने हे होणार असल्याचं भाकित केलं असल्याचा दावा तिचे अनुयायी करतात.’

जर, बाबा वेंगा हिने केलेली भाकितं कुठेही लिहून ठेवली नसतीलच तर मग… तिने केलेली भाकितं खरी होतात या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीणच आहे. २०२३ला जगावर महासंकट येणार असल्याच्या या बातम्यांवर अनेक लोकांनी विश्वास ठेवला असेल.

पण, मुळात ही भाकितं खरी आहेत की खोटी हे सांगणं कुणालाच शक्य नाही. प्रत्येकाने आपापली विवेक बुद्धी वापरून या भाकितांवर विश्वास ठेवायचा किंवा नाही हे ठरवणं गरजेचं आहे.

हे ही वाच भिडू:

खऱ्या सापाला एकवेळ लोक कमी भीतील पण पत्रिकेतला कालसर्प लय टेन्शन देतो

लहान मुलींना त्यांच्या भविष्याची कल्पना करता यावी म्हणून बार्बीची एन्ट्री झाली

Leave A Reply

Your email address will not be published.