जेव्हा पंडित नेहरूंच्या नातवाला महात्मा गांधींच्या नातवानं आव्हान दिलं होतं

नेहरू-गांधी घराण्याला नेहरूंच्या लीगसी एवढाच गांधी नावाचा फायदा झाल्याचं सांगण्यात येतं. इंदिरा गांधी या नेहरूंच्या वारसदार मग पुढे त्यांना गांधी हे आडनाव लागलं ते त्यांनी फिरोझ गांधी यांच्याशी लग्न केल्यानंतर.  मात्र बऱ्याच काळ भारतातील जनता नेहरू-गांधी घराण्याच्या गांधी आडनावाचा महात्मा गांधी यांच्याशीच संबंध जोडत राहिली. त्यामुळंच नेहरू-गांधी परिवाराला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा राजकीय वारसदार होण्यास मदत झाली असे जाणकार सांगतात.तसेच गांधींच्या वंशजही राजकरणात जास्त कार्यरत नसल्याने त्यांनीही कधी महात्मा गांधींच्या राजकीय वारश्यावर हक्क सांगितला नाही.

 जवाहरलाल नेहरू यांना स्वतः महात्मा गांधी यांनीच राजकीय वारसदार घोषित केला असल्यानं तोच वारसा पुढं इंदिरा गांधी आणि मग गांधी घरण्यातल्या पुढच्या पिढ्यांकडं आल्याचं निरीक्षण नोंदवण्यात येतं.

मात्र १९८९ मध्ये अशी एक निवूडणूक झाली होती की ज्याला लोकं गांधी विरुद्ध नेहरू असा सामना म्हणत होते. तर तो मुकाबला झाला होता महात्मा गांधी यांचे नातू विरुद्ध जवाहरलाल नेहरू यांचे नातू.

 १९८९च्या निवडणुकीत राजमोहन गांधी यांनी  राजीव गांधी यांना अमेठीमध्ये आव्हान दिले होते .

गांधी विरुद्ध गांधी होण्याऱ्या या निवडणुकीकडं अख्या देशाचं लक्ष लागलं होतं.

गांधींचे पुत्र देविदास गांधी हे राजमोहन गांधींचे वडील होते तर चक्रवर्ती राजगोपालाचारी हे राजमोहन गांधी यांचे आजोबा. 

राजकारणात अगदीच नवीन असणाऱ्या राजमोहन गांधी यांनी पंतप्रधानांची हकालपट्टी करणे ही काळाची गरज आहे असं म्हणत राजीव गांधींच्या विरोधात फॉर्म भरला होता.लेखक असणाऱ्या राजमोहन गांधी यांचं राजकारण हे पिंड नव्हतं.

 जेव्हा त्यांना राजकारणात येण्याच्या निर्णयाबद्दल विचारलं गेलं तेव्हा पंतप्रधान राजीव गांधींचे सरकार भ्रष्ट आणि लोकशाही विरोधी आहे आणि त्यासाठीच मी राजकरणात येत आहे असं उत्तर त्यांनी दिलं होतं.

तसेच “मी महात्मा गांधींचा मी नातू आहे हा फॅक्ट आहे आणि ते मी नाकारू शकत नाही,” असंही राजमोहन गांधींनी ठणकावून सांगितलं होतं. व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वखाली लढणाऱ्या विरोधी पक्षाला गांधी विरुद्ध गांधी अशी निवडणूक करून चमत्कार घडेल अशी अपेक्षा होती. जनता दलाचे अनेक मोठे नेते राजमोहन गांधी यांच्या प्रचारासाठी उतरले होते. त्यामुळं निवडणूक चुरशीची होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र जेव्हा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा वेगळंच चित्र पाहायला मिळालं. राजमोहन गांधी यांना ६९,२६९ मतं पडली होती तर राजीव गांधी तब्बल २,७१,४०७ मतं जिंकून विजयी झाले होते.

राजीव गांधी जरी अमेठीमधून जिंकले असले तरी त्यांना सत्ता राखण्यात यश आलं नव्हतं.

राजमोहन गांधी ज्या जनता दलाच्या तिकिटावर उभे तो पक्ष व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत बसला होता.

राजमोहन गांधी पुढे राज्यसभेवर गेले. २०१४ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीकडून लोकसभेची निवडणूक लढवली मात्र तिथंही त्यांना हारच पत्करावी लागली. मात्र आज एक इतिहासकार, चरित्रलेखक आणि स्कॉलर म्हणून राजमोहन गांधी हे मोठं नाव आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.