कॅप्टन विरोधी टीमचा असो किंवा आपला, गंभीरचं डोकं सटकलं की सुट्टी नाही… !

गौतम गंभीरचं नाव ऐकलं की, मातीनं भरलेली जर्सी, मैदानावरचे राडे आणि दोन वर्ल्डकप विजय आठवल्याशिवाय राहत नाहीत. गंभीरची बॅटिंग आणि स्वभाव दोन्ही आक्रमक होतं. शाहिद आफ्रिदी, रिकी पॉन्टिंग, उमर गुल हे प्रतिस्पर्धी खेळाडू सोडाच पण गंभीर त्याचा ज्युनिअर असणाऱ्या विराट कोहलीलाही मैदानावरच भिडला होता. कॅप्टन समोरचा असो किंवा आपला गंभीरचं सटकलं की सुट्टी नॉट!

हाच गंभीर कॅप्टन म्हणून मात्र भारी ठरला होता. 

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाची बांधणी करत त्यानं दोन आयपीएल टायटल्स मारून दिली. शाहरुखच्या नाईट रायडर्सला ‘मैं हू ना’ म्हणत दोनदा जिंकवून दिलं.

कोलकात्याचा आयकॉन प्लेअर होता सौरव गांगुली. आपल्या घरच्याच टीमचं नेतृत्व करताना दादा अपयशी ठरला आणि पहिल्या तीन सिझनमध्ये नाईट रायडर्स तळ्यातनं मळ्यात आलीच नाही. चौथ्या सिझनवेळी दादानं टीम बदलली आणि कोलकात्यानं कॅप्टन.

गंभीरनं टीमची बांधणी करत जरा तरण्याताठ्या खेळाडूंवर भर दिला. त्यानं टीमला काय बूस्टर दिला काय माहित, पण त्याच सिझनमध्ये कोलकात्यानं डायरेक्ट सेमीफायनल गाठली.

पुढच्या वर्षी मात्र गंभीर आणि कंपनीनं पक्ष्याचा डोळा फोडला आणि थाटात ट्रॉफी जिंकली. याचवर्षी गंभीरनं मिस्ट्री स्पिनर सुनील नरायनला ताफ्यात घेतलं. सलग सात मॅच जिंकणारी कोलकाता फायनलमध्ये पोहोचली आणि धोनीच्या चेन्नईचं हॅटट्रिकचं स्वप्न मोडत आयपीएल मारली.

पुढचा सिझन परत खराब गेला आणि कोलकात्याचं विजेतेपद म्हणजे तुक्का लागल्याचं बोललं जाऊ लागलं. २०१४ मध्ये देशात निवडणुकींची लाट होती आणि आयपीएलमध्ये कोलकात्याच्या पराभवांची. पहिल्या चार मॅचेस मिळून गंभीरला फक्त एक रन करता आला होता.

त्यावेळी कोलकात्याच्या टीम रूममध्ये ‘बाझिगर’ पिक्चर लावला असणार, कारण त्यानंतर सलग सात मॅचेसमध्ये कोलकात्यानं पराभवाचं तोंड पाहिलं नाही. फायनलमध्ये पंजाबला धूळ चारली आणि कोलकात्यानं दुसऱ्यांदा आयपीएलची सोनेरी ट्रॉफी उंचावली.

हार कर जितने वाले को, बाझिगर कहते है

असं म्हणाला शाहरुख होता, सिद्ध गंभीरनं करून दाखवलं.

गंभीर ‘अरे ला का रे’ करण्यात दादा, पॉन्टिंग या सगळ्यांच्या पुढे होता. बरं हे करण्याची त्याची पद्धतही जगावेगळी होती. तो काय करायचा, आपलं ज्याच्याशी भांडण झालंय तो प्लेअर बॅटिंगला येण्याची वाट पाहायचा.

एकदा का तो क्रीझवर आला की स्लिपमधून तोंडाचा पट्टा सुरू, त्यात तो आऊट झाला की सासरला निघालेल्या पोरीला सावत्र आईनं टोमणा मारावा असलं काहीतरी बोलणार. सगळ्या टीममध्ये त्यानं असंच थेट नडायची ऊर्जा भरली आणि कोलकात्यानं अच्छे दिन पाहिले.

गंभीरचा महेंद्रसिंह धोनीवर किती जीव आहे, हे सगळ्या जगाला माहितीये.

आयपीएलमध्ये धोनीचा फॉर्म हरवला की टेस्ट प्लेअर, टुकूटुकू मास्टर असलं ट्रोलिंग सुरू होतंय. याची सुरुवात गंभीरमुळंच झाली. त्यानं २०१५ मधल्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात धोनीभोवती सिली पॉईंट, शॉर्ट लेग, लेग स्लिप आणि स्लिप अशी फुल टेस्ट मॅच टाईप फिल्डिंग लावली. धोनी त्यावेळी चार बॉलमध्ये आऊट झाला, पण आपण धोनीसारख्या बॅटरवरही लय बेकार प्रेशर टाकू शकतो हे गंभीरनं सिद्ध केलं.

पुढच्या वर्षी पुन्हा त्यानं असलंच जाळं विणलं आणि धोनीला २२ बॉलमध्ये फक्त आठ रन करता आले.

बाकी कोण रन करत नसलं की गंभीरची बॅट तळपायची. बॅटरवर प्रेशर टाकायचं असलं की तो स्वतः हेल्मेट घालून सिली पॉईंटवर थांबायचा. माघार घेणं बिणं त्याला माहीत नव्हतंच. आपला शेवटचा आयपीएल सिझन दिल्लीकडून खेळताना गंभीरचा परफॉर्मन्स खालावला.

गड्यानं ऑक्शनमध्ये मिळालेली जवळपास तीन करोडची रक्कम परत केली आणि कॅप्टन्सीही सोडली.

क्रिकेटमधून रिटायर झाल्यावर गंभीर राजकारणाच्या मैदानात उतरला आणि भाजपकडून खासदारही झाला. आता कमेंट्री बॉक्समधले काही किस्से, राजकारणातले निर्णय, कधीकधी चूकीची ठरणारी भाकितं यामुळे गंभीर चर्चेत असतो.

एक मात्र आहे, त्याच्यासारखा इन्साईड आऊट फटका आजही कुणीही मारु शकत नाही.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.