भारतानं क्रिकेटची मॅच जिंकली अन् कारगिलमध्ये जवानांना जोश चढला

कारगिल युद्ध. भारतासाठी अभिमानाचं आणि शौर्याचं प्रतीक. देशाच्या सुपुत्रांनी आपलं रक्त सांडवून युद्ध लढलं आणि जिंकलं. आपला तिरंगा झळकताना पाहण्याचं समाधानाचं कधीच शब्दांत वर्णन करता येऊ शकत नाही.

देशभक्तीचं स्फुरण चढवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे खेळ आणि त्यातही क्रिकेट. स्टेडियममध्ये असलेले तिरंगी ध्वज, खेळाडूंच्या टीशर्टवर लिहिलेली ‘INDIA’ ही अक्षरं आणि मैदानावर होणारा वंदे मातरमचा गजर. त्यातही भारत विरुद्ध पाकिस्तानअशी मॅच असेल, तर अंगावर सरसरून काटा आल्याशिवाय राहत नाही.

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचला कायम युद्धाचं स्वरूप दिलं जातं. आता युद्धात लढणाऱ्या जवानांची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. मग क्रिकेट मॅचला हे युद्धाचं स्वरूप का दिलं जातं. प्रत्येक गोष्टीमागं एक स्टोरी असते, तशी यामागंही आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान वर्ल्डकप मॅच कारगिल युद्ध सुरू असताना झाली होती.

तारीख ८ जून, १९९९. सीमेवर कारगिल युद्धाचा भडका उडाला होता आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडले. आतापर्यंतच्या स्पर्धेत भारताचं रेकॉर्ड काही खास नव्हतं, त्यामुळे चाहत्यांना एकच अपेक्षा होती की पाकिस्तानला हरवा. तिकडं पाकिस्तानची टीम सनाट फॉर्ममध्ये होती. वर्ल्डकपच्या सुपर सिक्समधली चौथी मॅच. स्टेडियम ओल्ड ट्रॅफर्ड, मॅचेस्टर.

मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणं सचिन तेंडुलकर आणि सदागोपन रमेशनं चांगली सुरुवात करून दिली. रमेश आऊट झाला, तेंडल्याची फिफ्टी होणारच होती, तेवढ्यात तोही आऊट झाला. पण त्यादिवशी भारतात कुणाचेच टीव्ही बंद झाले नाहीत. जणू प्रत्येकाला खात्री होती, आज आपणच जिंकणार.

अजय जडेजा पटकन गेल्यानं त्याला शिव्या देऊन झाल्या. त्यात अझरुद्दीननं पहिले १६ बॉल टुकूटुकू खेळत रन्सच काढले नाहीत. साहजिक सगळेच टेन्शनमध्ये आले. द्रविड मात्र सुट्टी द्यायच्या मूडमध्ये नव्हता, त्याची शांतता सगळ्यात जास्त आक्रमक असते हे त्यानं त्यादिवशी दाखवून दिलं. सकलेन मुश्ताक, वसीम अक्रम, शोएब अख्तर, अब्दुल रझ्झाक सगळ्यांनी फटके खाल्ले. द्रविडनं खणखणीत पन्नास केला आणि शांतपणे बॅट उंचावली. भारतीय चाहते जरा निर्धास्त झाले तेवढ्यात द्रविड गेला. परत टेन्शन.

कॅप्टनची जबाबदारी पार पाडत, अझरुद्दीननं भारताची घौडदौड कायम राखली. अडखळत सुरूवात करूनही त्यानं अख्तरला दोन चौके मारत फिफ्टी पूर्ण केली. भारत दोनशे पार गेला. अक्रमनं द्रविड आणि अझरुद्दीन दोघांना खोलत भारताला वरचढ ठरू दिलं नव्हतं.

पाकिस्तानला जिंकायला २२८ रन्स हवे होते आणि भारताला १० विकेट्स

व्यंकटेश प्रसाद आणि जवागल श्रीनाथ दोघंही सायलेंट पण जायंट किलर. वेंकी आणि म्हैसूर एक्सप्रेसनं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. लाला आफ्रिदी आणि एजाज अहमदला श्रीनाथनं काढलं आणि धोकादायक सईद अन्वर आणि इनफॉर्म सलीम मलिकला प्रसादनं. अझर महमूद पण गेलाआणि पाकिस्तान ५ आऊट ७८. भारत जिंकतोय असं फिक्स वाटत होतं.

पण क्रीझवर टिकून होता इंझमाम उल हक.

भारताचे बॉलर्स इंझमामला स्विंगवर नाचवत होते. त्यानं लय प्रयत्न करूनही ४१ रन्सच केले. मोईन खानही ३४ वर अडकला आणि प्रसादनं दोघांच्या विकेट्स काढल्या. आता भारतात आनंदाची आणि पाकिस्तानमध्ये टेन्शनची लाट पसरली.

रझ्झाक, मुश्ताकच्या विकेट्स कुंबळे, श्रीनाथनं वाटून घेतल्या. शेवटची विकेट प्रसादसाठी ठेवली. ४६ व्या ओव्हरचा तिसरा बॉल. स्ट्राईकवरच्या अक्रमनं बॉल टोलवला, भारतीय चाहत्यांच्या कपाळावर एक अठी पडली, पापणी बंद होऊन पुन्हा उघडली आणि बॉल कुंबळेच्या हातात!

टीव्हीसमोर बसून मॅच बघणाऱ्या लोकांना सगळं धूसर दिसत असंल, पण एक आवाज मात्र सगळ्यांना ऐकायला आला. सगळ्यांचा आवडता भिडू रवी शास्त्री कमेंट्री बॉक्समधून म्हणाला, ‘India have won by 47 runs.’

त्या दिवशी देशात नेहमीसारखा जल्लोष झाला नाही, पण तरीही एक समाधानाची भावना होती. पुढं जाऊन भारतानं कारगिल युद्धही जिंकलं. त्यादिवशी मात्र देशात जल्लोष झाला, तेही नेहमीपेक्षा जास्त. भारतानं सामना जिंकल्याच्या रात्री जवानांनी युद्धभूमीवर आनंद साजरा केला. युद्धाच्या जखमांना त्या विजयानं फुंकर घातली आणि आत्मविश्वासाला ठिणगीही!

क्रिकेटचं मैदान असो किंवा युद्धभूमी, एक घोषणा अंगावर शंभर टक्के रोमांच उभे करते,

भारतमाता की जय!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.