तेव्हा खरंच भारत जिंकल्यावर पाकिस्तानात फटाके वाजले होते.

२४ ऑक्टोबर २०२१. हा दिवस आपण भारतीय कधीही विसरणार नाही. याच दिवशी टी-२० वर्ल्ड कपमध्ये आपला पाकिस्तानने १० विकेट राखून पराभव केला. गेली अनेक वर्षे आपण पाकला वर्ल्ड कप मध्ये जिंकण्याचा मौका दिला नव्हता. पण बाबर आझमच्या टीमनं हरण्याची परंपरा मोडली. ब्रेक अप पेक्षा मोठं दुःख आपल्याला झालं.

या दुःखाला डागण्या द्यायला सोशल मीडिया होतंच. इतके दिवस आपण पाकिस्तानची मज्जा घेतलेली. त्यात पाकिस्तानने आपली मज्जा घेतली. ट्रोलिंगला ऊत आला. ट्विटर वर तर स्वतः क्रिकेटपटू देखील भांडत होते. अशातच वीरेंद्र सेहवागने ट्विट केलं की

“दिवाळीदरम्यान फटाक्यांवर बंदी आहेत. मात्र भारतातील काही भागांत पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फोडण्यात आले. हो… ते विजयाचा आनंद साजरा करत असतील! पण मग दिवाळीत फटाके उडवल्याने काय नुकसान होतं? असलं ढोंग कशाला? हे सगळं ज्ञान तेव्हाच (सणांच्या वेळेस) बरं आठवतं”, असं ट्वीट वीरेंद्र सेहवागने केलं आहे.

 

मग काय त्या दिवशी फक्त फटाक्यांच्याच चर्चा झाल्या. राजस्थानमध्ये तर एका शाळेतल्या टीचरने पाकिस्तान जिंकल्याचा स्टेट्स ठेवलं म्हणून तिला नोकरीतून काढून टाकण्यात आलं.

माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांनीही फटाक्यांवरून खडे बोल सुनावले आहेत. गौतम गंभीरने शेमफुल हॅशटॅगसह “पाकिस्तानच्या विजयावर फटाके फोडून आनंद साजरा करणारे भारतीय होऊ शकत नाही”, असं ट्वीट केलं.

हे सगळं सुरु असताना पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बट्टने सेहवाग आणि इतर खेळाडूंवर फटाक्यांवर चर्चा केल्याबद्दल टीका केली. तेव्हा त्याने एक आठवण करून दिली. तो म्हणाला,

एकेकाळी भारताने मालिका जिंकल्यानंतरही पाकिस्तानमध्ये फटके वाजवण्यात आलेले. याला स्पोर्ट्समनशीप म्हणतात.

नेमकं काय घडलं होतं तेव्हा?

गोष्ट आहे २००४ सालची.

१९९९ साली झालेल्या कारगिल युद्धाचा भयंकर परिणाम भारत पाकिस्तान या दोन देशांवर झाला होता. दीर्घकाळ दोन्ही देशातले क्रिकेटचे सामने बंदच राहिले, भारतही त्याकाळी पाकिस्तानविरुद्ध एकही मॅच खेळला नव्हता. प्रेक्षकांमध्ये मात्र हे सामने पुन्हा सुरु करण्यात यावे अशी चर्चा आणि उत्सुकता होती.

२००४ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दोन देशांमधील शांततेचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी क्रिकेट हे उत्तम माध्यम आहे असा विचार केला. वाजपेयींनी पाकिस्तानला एक ऐतिहासिक भेट दिली या भेटीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी बोलताना त्यांनी भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट हा एकमेव पर्याय आहे देशांचे संबंध सुधारवण्यासाठी असा प्रस्ताव मांडला. याला दोन्हीकडून संमती मिळाली.

भारत सरकारने सौरव गांगुलीच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाला पाकिस्तान दौऱ्यावर पाच वनडे आणि तीन कसोटी क्रिकेट सामने खेळण्याची परवानगी दिली. अटल बिहारी वाजपेयींच्या या निर्णयाचं दोन्ही देशातून जोरदार स्वागत झालं.

वाजपेयींमुळे ठरलेला हा दौरा इतका गाजला दौऱ्यातील प्रत्येक खेळाडूची इनिंग पाहण्यासारखी होती. वीरेंद्र सेहवागने वैयक्तिक रचलेला ३०९ धावांचा डोंगर असो किंवा सचिन, द्रविड आणि गांगुली यांच्या अविस्मरणीय खेळ्या असो. पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचा भारताने दारुण पराभव केला आणि वनडे, टेस्ट अशा दोन्ही सिरीजवर कब्जा केला.

ज्यावेळी या दौऱ्याचं आयोजन केलं गेलं त्यावेळी भारतीय संघाला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एक बॅट भेट म्हणून दिली होती आणि त्या बॅटवर लिहिलं होतं, खेल हि नहीं दिल भी जितिये. शुभकामनाए.

तत्कालीन भारतीय संघाचे मॅनेजर रत्नाकर शेट्टी एका मुलाखतीत सांगतात कि, भारतीय टीमच्या पाकिस्तान दौऱ्याआधी सुरक्षेची पाहणी करण्यासाठी गेलो असता त्यावेळी पाकिस्तानमधले लोक एअरपोर्टवर, रस्त्यावर आणि पब्लिक प्लेसेसवर अटल बिहारी वाजपेयी यांच्या गौरवाचे आणि कौतुकाचे बोर्ड घेऊन उभे होते. ज्यावेळी शेट्टींनी हि घटना वाजपेयींना सांगितली तेव्हा ते हसून म्हणाले कि आता हि स्थिती पाहून आपण पाकिस्तानमध्ये पण निवडणूक सहज लढू शकतो.

पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याआधी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय संघाला त्यांच्या निवासस्थानी बोलावलं होतं. वाजपेयींनी त्यावेळी भारतीय संघासोबत तासभर चर्चा केली आणि संघाला शुभेच्छा म्हणून बॅट दिली. ज्यावेळी निरोप घेऊन भारतीय संघ जात होता त्यावेळी वाजपेयींनी भारतीय संघाला शुभेच्छा म्हणून हम होंगे कामयाब हे गाणं मोठ्या आवाजात वाजवलं होतं.

पाकिस्तान दौऱ्यावर जाऊन भारताने गांगुलीच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी केली. कधी नव्हे ते भारताने पाकिस्तानला त्यांच्या मातीत डॉमिनेट केले. हा दौरा प्रचंड गाजला. प्रदीर्घ काळानंतर क्रिकेट सामने आणि त्यातही भारताने पाकिस्तानला नामोहरम केले यामुळे देशवासीयांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

सलमान बट्ट म्हणतो त्या प्रमाणे एकदिवसीय मालिका दोन दोनच्या बरोबरीत होती. शेवटचा सामना फायनल मॅच प्रमाणे रंगतदार झाला होता. पीसीबीने तर पाकिस्तान जिंकणार म्हणून स्टेडियमच्या बाहेर फटाके आणले होते. पण गमंत म्हणजे ती मॅच भारताने जिंकली. हा सामना आणि सिरीज भारताने मालिका जिंकली. पण पीसीबीने भारत जिंकल्यावरहि  फटाके वाजवले. पण तेव्हा यावरून वाद झाले नाहीत. या सगळ्यामागे वाजपेयींसारखे उदार मनाचे नेतृत्व आणि त्याकाळची परिस्थिती होती हे नक्की.

भारताने हा दौरा जिंकल्यावर अटल बिहारी वाजपेयी यांनी फोन करून भारतीय संघाची पाठ थोपटली आणि त्यांचं अभिनंदन केलं. भारताचा कर्णधार सौरव गांगुलीसोबतही त्यांनी दौऱ्याविषयी बरीच चर्चा केली.

दोन देशातील संबंध मैत्रीपूर्ण करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी निवडलेला क्रिकेटचा मार्ग चांगलाच चर्चित राहिला आणि वाजपेयीचं पुष्कळ कौतुकही झालं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.