मोहम्मद शमीची मापं काढण्याआधी हे वाच भिडू

भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तान विरुद्धचा सामना गमावला आणि अपेक्षेप्रमाणं ट्रोलिंगला सुरूवात झाली. आता खेळ म्हणल्यावर हार-जीत आलीच. इतकी वर्ष भारत जिंकत आला होता, कधी ना कधी पाकिस्तान जिंकणार होतंच. भारत हरण्यामागं फक्त एकच कारण होतं, पाकिस्तानची टीम आपल्यापेक्षा भारी क्रिकेट खेळली.

खेळाडूंवर हलका-फुलका मीम बनवला. थोडीफार मस्करी केली, तर एकवेळेस चालूनही जातं. पण एक मॅच खराब गेली म्हणून, खेळाडूला धर्मावरून लक्ष्य करणं योग्य आहे का? जात, धर्म, भाषा कुठलीही असो, जेव्हा भारताची जर्सी घालून खेळाडू मैदानावर उतरतात. तेव्हा ते फक्त भारतीय असतात.

विषय असा झाला की, पाकिस्तान विरुद्धची मॅच हरल्यानंतर अनेकांनी भारताचा पेस बॉलर मोहम्मद शमीला ट्रोल केलं. तू मुसलमान आहेस म्हणून तू फिक्सिंग केलीस, असा ट्रोलर्सचा नूर होता. शमीनं ३.५ ओव्हर्समध्ये ४५ रन्स दिले. विकेट काढण्यात त्याला काय कुठल्याच बॉलरला यश आलं नाही. तरीही एकटा शमीच लक्ष्य झाला, तेही त्याच्या धर्मामुळं.

आता एका मॅचवरुन शमीचा धर्म काढणारे, शमीनं आधी केलेली कामगिरी सहज विसरतात.

आपण थेट जाऊ २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये. भारत विरुद्व पाकिस्तान मॅच. विराट कोहलीच्या शतकामुळं भारतानं बोर्डावर ३०० रन्स लावले होते. पाकिस्तानच्या तगड्या बॅटिंगसाठी हे आव्हान काय जड नव्हतं. त्यांना दणक्यात स्टार्ट मिळाला असता, तर भारताचं गणित फिक्स हललं असतं. शमीनं चौथ्याच ओव्हरमध्ये युनूस खानला खोललं. मग मिस्बाह उल हक, शाहीद आफ्रिदी आणि बोनस म्हणून वहाब रियाझ अशा एकूण चार विकेट्स घेतल्या आणि भारतानं मॅच मारली.

त्या विजयाचं जितकं श्रेय विराट कोहलीच्या सेंच्युरीला जातं, तितकंच शमीच्या खतरनाक बॉलिंगला. त्या वर्ल्डकपमध्ये शमीनं १७ विकेट्स घेतल्या. पहिल्याच मॅचमध्ये त्याचा गुडघा दुखावला. सूज इतकी वाढली की, गुडघा आणि मांडी एकाच आकाराची झाली. तरी पेनकिलरची इंजेक्शनं घेऊन शमी खेळत राहिला.

चार वर्षांनंतर, वर्ल्डकप २०१९ मधली अफगाणिस्तान विरुद्धची मॅच. शेवटच्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला जिंकायला १६ रन्स हवे होते. पहिल्याच बॉलला फोर बसल्यानंतर, टेन्शन आणखीनच वाढलं. दुसरा बॉल डॉट गेला, तिसऱ्या बॉलला कॅच आऊट, चौथ्याला बोल्ड आणि पाचव्यालाही बोल्ड. हॅटट्रिकसह भारताला मॅच जिंकवून देणारा बॉलर होता – मोहम्मद शमी.

भारतानं इंग्लंडला लॉर्ड्सवर हरवलं, तेव्हा लंडनपासून कोल्हापूरपर्यंत सगळ्यांनी धुरळा उडवला होता. आता शमीनं खतरनाक बॅटिंग करत फिफ्टी मारली नसती, तर आपण जिंकलो असतोय काय? कदाचित नाही.

शमीचा आणखी एक महत्त्वाचा किस्साय, जो विसरून चालणार नाही. २०१६ मध्ये भारताची न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट मॅच सुरू होती. त्या मॅचमध्ये शमीनं एकूण सहा विकेट्स काढल्या. प्रत्येक दिवशी खेळ संपल्यावर तो हॉस्पिटलमध्ये जायचा, कारण त्याची १४ महिन्यांची मुलगी आयसीयूमध्ये जिवाची लढाई लढत होती. आपल्या मुलीची काळजी कुठल्या बापाला, नसणार शमीलाही होती. पण त्यामुळं त्यानं देशासाठी असलेली कमिटमेंट मोडली नाही.

आता त्याच्यामागं आजी-माजी क्रिकेटर्स उभे राहिलेत, चाहतेही त्याला पाठींबा देतायेत. आतापर्यंत देशासाठी ३५५ विकेट्स घेणाऱ्या शमीला आपली देशभक्ती सिद्ध करण्याची बिलकुल गरज नाही, हे खरं.

आणि हा, आणखी एखादा कडक परफॉर्मन्स दिला की हेच ट्रोलर्स शमीला डोक्यावर घेऊन नाचतील की नाही पाहाच!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.